मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत

कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वरील कलमात निरनिराळ्या स्मृतिकारांनी जी निरनिराळी मते सांगितली, त्या सर्वांचे एकंदरीत तात्पर्य पाहू जाता, कन्येचे दान दानाधिकार्‍याकडून योग्य वेळी व्हावे, व तोपर्यंत तिच्या पोषणाचा व तिच्या विवाहाचा खर्च कुटुंबातील मनुष्यांनी दायविभागाच्या नियमाप्रमाणे सोसावा इतकेच काय ते आहे. अर्थात विवाहाचे कृत्य ज्याचे त्याने एकवार अंगाबाहेर करून टाकिले की तो मोकळा झाला, व त्याच्यावर कन्येचे पुढचे ओझे राहिले नाही असा अर्थ समजावयाचा. परंतु कन्येचे हे ओझे कुटुंबाने सोसावयाचे त्याला काही मर्यादा पाहिजे, नाही तर कोणत्याही अडचणीच्या अथवा ऐच्छिक कारणांनी तिचा विवाह वेळेवर न होता लांबला, किंवा दानाची शेवटली इयत्ता टळून गेल्यावर तीन वर्षांनी ती स्वयंवरास प्रवृत्त झाली, तर इतके दिवसपर्यंत तिच्या पोषणाचा खर्च व्हावयाचा तो होऊन जाऊन पुन: विवाहसमयी कन्येचा शुल्क ( देणगी ) घेण्याचा हक्क कायमच असा, प्रकार व्हावयाचा. अशा प्रसंगास उद्देशून मनूने --
अलंकारं नाददीत पितृदत्तं स्वयंवरा ।
मातृदत्तं भ्रातृदत्तं स्तेयं स्याद्यदि तं हरेत् ॥
या वचनात ‘ स्वयंवर करणार्‍या कन्येने पित्याकडून, मातेकडून किंवा भ्रात्याकडून अलंकार घेऊ नये, व घेतला तर ती चोरी होते ’ असे स्पष्ट विधान केले आहे. हे अलंकार घेण्याची तिला मनाई करावयाची, याचा स्पष्ट अर्थ एवढाच की, इतके दिवसपर्यंत कन्येच्या पोषणाचा वगैरे जो काही खर्च झाला तो या अलंकारांच्या किंमतीच्या रूपाने वळवून घेतला ! कन्येला जर दागिन्यांची हौस असेल, तर दुसर्‍या कोणी कसेबसे तरी लग्न लावून दिले असता तसल्या लग्नास तिने मुकाट्याने कबूल झालेच पाहिजे ! एक वेळ लग्न लावून घेतले की लग्नापूर्वी तिने ज्या काही उमेदी मनात बाळगिल्या असतील, त्या सर्व जेथल्या तेथेच जिरून जाणार, व पुढे जन्मभर तिला आपल्या इच्छेविरुद्ध वरलेला पती वागवील त्याप्रमाने वागत राहण्याची पाळीही येणार ! - अर्थात स्त्रीवर्गाला विवाहस्वातंत्र्य द्यावयाचे हा विषय नुसत्या धर्मशास्त्राचा नसून व्यावहारिक दायाचाही आहे; व त्याचा निर्णय पुष्कळ प्रसंगी न्यायासनावर बसून न्याय निवडणार्‍या न्यायाधीशाच्या मर्जीवर अवलंबून राहणारा आहे; व यासाठी हे स्वातंत्र्य स्त्रियांना मिळवून देण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांनी या बाबतील कायद्याची जरूर अशी सुधारणा करून घेण्याची खटपट अगोदर केली पाहिजे हे स्पष्ट आहे. अशी सुधारणा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत रजोदर्शनकालाचा अतिक्रम करून विवाह्य वधू घरात राहू देण्याची प्रवृत्ती लोकांस होणे दुरापास्त आहे. कारण कुटुंबातील पाहिजे तो हक्कदार पाहिजे त्या वेळेस वधूस्वातंत्र्यास कायद्याच्या रीतीची हरकत आणू शकेल, व प्रसंगी प्रत्यक्ष न्यायासनासही ती हरकत मुकाट्याने मान्य करण्याची पाळी येईल.
आजच्या स्थितीत अविवाहित कन्या मोठ्या वयाची राहू द्यावयाची म्हटले असता तिच्या नावाने अधिक हुंडा देण्याची मातापितरांनी तयारी करावयाची, अगर धडपडीत पैशाच्या लालचीने तिचा विवाह एखाद्या मरणासन्न अशा श्रीमंत जरठाशी लावून देण्यासही सिद्ध व्हावयचे, अशी दोन प्रकारची स्थिती लोकसमाजात आपण पाहतो. तिला आळा घालावयाचा म्हटले, तरी आता लिहिल्या प्रकारची काही तशी प्रत्यक्ष सुधारणा कायद्यात करून घेणे इष्ट होईल हे निराळे सुचविणे नकोच.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP