मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य

आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


आता कोणाही मनुष्यास कोणत्याही एखाद्या गोष्टीचा किंवा आचाराचा दीर्घकाळ सहवास किंवा दृढ अभ्यास घडल्यास तो बहुधा त्याच गोष्टीस किंवा आचारास चिकटून राहण्याचा प्राय: यत्न करितो ही गोष्ट खरी आहे; तथापि त्याने जर खरोखरी मनापासून पुष्कळ काळपावेतो प्रयत्न केला, तर तो ती पूर्ववर्तनाची शृंखला तोडून टाकू शकणार नाही असे मात्र म्हणता येत नाही. वाईट कर्म केले असता जर अधमता येते, तर चांगले कर्म करण्याने उच्चता का न यावी ? अन्य जन्मी जर शूद्राचा ब्राह्मण किंवा ब्राह्मणाचा शूद्र केवळ कर्मबळेकरुन होऊ शकतो, तर तो या एकाच जन्मी तसा का न व्हावा ?
जगात सर्वच मनुष्यांच्या अंगच्या सामर्थ्याचा किंवा बुध्दीचा विकास नेहमी सारख्याच प्रमाणाने किंवा नियमित वेळी होतो असे नाही. कोणाचा अगोदर व कोणाचा मागून असे आपण अनेक वेळा पाहतो. लहानपणी जे मूल पंडुरोगी किंवा निर्बुध्द वाटत असते, तेच मूल योग्य जोपासनेच्या किंवा सहवासाच्या योगाने चांगले सशक्त किंवा बुध्दिमान निवडते. जगात केव्हा केव्हा याच्या अगदी उलटाही उदाहरणे दृष्टीस पडतात. लहानपणी चांगले सशक्त व टुमटुमीत असलेले मूल क्षयाची भावना घेते, किंवा लहानपणी तरतरीत दिसलेला मनुष्य तो मोठेपणी महामूर्ख होऊन जातो. आता आईबापे स्वत: बुध्दिमान किंवा सशक्त असली, तर त्यांना आपली संततिही तशीच बुध्दिमान  सशक्त असावी अशी इच्छा असणे साहजिक आहे; परंतु क्रियेचे यथायोग्य साहाय्य नसेल त्र नुसती इच्छा काय कामाची !
हाच दृष्टान्त वर्णव्यवस्थेत अक्षरश: लागू पडण्याजोगा आहे. कोणी ब्राह्मण चांगला सदाचार संपन्न व विद्वान असला, तर त्याने आपला मुलगा तसाच चांगला असावा म्हणून इच्छा करणे हे सहाजिकच व क्षम्य आहे; पण तो चांगुलपणा नुसत्या इच्छेने प्राप्त होत नसतो. मुलगा ब्राह्मणाचा, पण शेवटपर्यंत अक्षरशून्य; वीर क्षत्रियाचा बच्चा, पण जन्मात कधी शस्त्र धरण्यास प्रवृत्त होत नाही; बाप व्यापार - उदीम करणारा, पण मुलगा पाहावा तर त्याला हिशेबाचे काडीइतकेही ज्ञान नाही, असे शेकडोशे प्रकार आपण पाहतो. हे असे प्रकार का असावे ? उलटपक्षी बाप मूर्ख, पण मुलगा मात्र कवी; नुसते झुरळ पाहिले की बाप पळून जाणारा, पण त्याचच मुलगा रणशूर ; साहसी व महापराक्रमी ; बापाला फाटलेले धोतर नुसते शिवता येण्याचीही मारामार; पण मुलगा पाहावा तो अनेक प्रकारची यंत्रे शोधून काढणारा, कलाकौशल्यात निपुण इत्यादी प्रकारचा , - अशी उदाहरणेही आपण केव्हा केव्हा पाहतो, याचे कारण काय ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP