उपमालंकार - लक्षण ४१

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


अशाच रीतीनें, ‘ चन्द्रवत्सुन्दरं मुखम्‍ या ’ उपमावाक्यांत, सुन्दरत्व हा धर्म, उपमानाच्या बाबतींत अनुवाद्य होत असला तरी, व उपमेयाच्या दृष्टीनें बिधेय होत असला तरी, ( अनुवाद्यत्व व विधेयत्व हीं त्या सुन्दरत्व
धर्माचीं शब्दप्रतिपाद्य विशेषणें नसल्यानें ) साधारणधर्म होण्यास मुळी हरकत नाहीं. आतां एक शंका:-
“ ह्या मृगनयनेचें निळ्या पदरानें झाकलेलें तोंड, यमुनानदीच्या खोल पाण्यांत, प्रतिबिंबित झालेल्या मृगाड्काप्रमाणें ( म्ह०चंद्राप्रमाणें ) शोभतें. ”
ह्या श्लोकांत उपमान चंद्र आहे व त्या चंद्रांत, योगामुळें म्ह० शब्दाच्या अवयवाचा अर्थ सांगणार्‍या शब्दाच्या शक्तीमुळें, भासमान होणारा जो हरिणरूपी अड्क ( कलंक ) त्याला, ( श्लोकांतील ) जें नयन ( आननरूपी उपमेयाचें विशेषण नयन ) बिंब होत नसल्यानें, त्या हरिणरूप कलंकानें कोणाचें प्रतिबिंब व्हावें बरें ? अर्थात्‍ , हा हरिणरूप कलंक, ह्या श्लोकांत, धर्माचें आधिक्य उत्पन्न करीत असल्यानें, येथें ( आधिक्यरूप ) उपमादोष आहे. यावर कुणी म्हणतील कीं, ‘ हरिणनयनाया: ’ ह्या नायिकेच्या विशेषणांत, हरिणनयनाप्रमाणें असणारा नयन जिचा आहे, ती ‘ हरिणनयना ’ , ह्या बहुव्रीहि समासांतून, नायिकेचें नयन ( रूपी बिंब ) हातीं येतें; तेव्हां, त्या नयनाला बिंब मानून त्याचें प्रतिबिंब, हरिणरूपी कलंकाला मानतां येईल. पण ह्यावर आमचें ( म्ह० मूळ शंकाकराचें ) म्हणणें असें कीं, बहुव्रीहि समासातील हा नयन शब्द, कांतेचें विशेषण म्हणून आला असल्याकारणानें, तो आननाचें विशेषण होऊं शकत नाहीं व त्यामुळें, त्या नयनाला बिंबरूप मानतां येणार नाहीं.
शंकाकाराच्या ह्या शंकेला ( जगन्नाथाचें ) उत्तर असें :-
“ हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. ( प्रस्तुत ) श्लोकांतील नयन हें आननाचें विशेषण म्हणून प्रत्यक्ष शब्दानें सांगितलें नसलें तरी तें नयन, कांतेचें विशेषण ह्या रूपानें आननावरही आहे अशी प्रतीति होत. कारण
कीं, नयन हें आननाला विषय ( विशेषण ) न होतां, केवळ कांतेचेंच विशेषण होऊं शकणार नाहीं. तसें तें विशेषण होईल, असें मानणें हें अनुभवाच्या विरुद्ध आहे. ह्यावर पुन्हां शंका कोणी करील कीं, ‘ नयनाचा आननाशीं साक्षात्‍ संबंध नाहीं ’ ; कारण कीं, खास एकमेकांजवळ दोन शब्द प्रत्यक्ष उच्चारले गेले तरच शाब्दबोधांत त्यांचा परस्पराशीं संबंध मानला जातो. आतां येथें आनन व नयन ह्या दोहोंचा एकत्र ( स्वतंत्र रूपानें व शब्दानें ) उच्चार ( समभिव्याहार ) केला गेला नसल्यानें, नयनविशिष्ट अनन असा शाब्दबोध होणार नाहीं. ” ह्या शंकेवर आमचें ( जगन्नाथाचें ) उत्तर असें :-
“ प्रत्यक्ष शब्दांनीं नयन व आनन ह्यांचा विशेषणविशेष्यभाव येथें सांगितला नसला तरी, संसर्गमाहात्म्यानें त्या दोहोंचा संबंध मानण्यास कांहींही हरकत नाहीं. म्हणजे, नयनविशिष्ट आनन असा संबंध प्रथम मानून, त्याच्या जोरावर, ( त्यानंतर ) नयन हें कांतेचें विशेषण मानणें शक्य आहे. श्लोकांतील उपमेय जें आनन, त्यावर नयन हें विशेषन म्हणून संबद्ध आहे, असें, कोणत्याही प्रकारानें ज्ञान झाल्यास, तें ज्ञान त्या नयनाला, श्लोकांत इष्ट असलेल्या बिंबप्रतिबिंबभावाकरतां, बिंबरूप मानण्याला कारणभूत होईल.
अथवा अन्यरीतीनें ही नयनाला बिंबरूप करतां येणें शक्य आहे तें असें:-
प्रथन नयन ह्याला कांतेचें विशेषन मानून अभिधाशक्तीनें हरिणनयनसदृश कांतानयन असा शाब्दबोध झाल्यानंतर मागून तें नयन
आननाचें विशेषण आहे असा, व्यंजनाव्यापारद्वारां अथवा मानसिक व्यापारद्वारां, बोध होतो, असें म्हणण्यास कांहींच अडचण नाहीं. अशारीतीनें, वरील श्लोकांतील उपमेयवाक्याचें असें ज्ञान झालें असतां, उपमेय जें आनन त्याचें विशेषण म्हणून, हरिणनयनसदृश नयनाचें भान होईल, व त्यामुळें त्याला बिंबरूपता येईल; आणि ती तशी आल्यास त्याला प्रतिबिंबरूप म्हणून चंद्रांतील हरिणरूप कलंकाला घेण्याची आवश्यकता असणारच; आणि मग येथें आधिक्यरूप उपमादोष होणार नाहीं. वरील श्लोकांत आनन व एणांक ह्या दोन शब्दांत ( उपमेय व उपमान ह्यांत ) लिंगभेद असल्यानें तोही उपमादोष आहे, असें म्हणता येईल. पण ( विचार करतां ) तोही दोष येथें मानता येणार नाहीं. कारण कीं, वरील उपमेंतील लिंग-भेद कविसंकेताप्रमाणें मान्यच ठरलेला आहे. म्हणून तो लिंगभेद चमत्काराच्या अपकर्षाला कारणीभूत होत नसल्यानें, येथील लिंगभेदाला उपमादोष मानतां येणार नाहीं. अशाच रीतीनें कविसंकेतामुळें अथवा दुसर्‍या कोणत्याही तर्‍हेनें पूर्वी सांगितलेले उपमादोष चमत्काराचा अपकर्ष करीत नसल्यास, त्यांना दोष म्हणतां येणार नाहीं.
उदाहरणार्थ:-
‘ हे गृहस्थ नव्या नवरीप्रमाणें अंगणांत जातांनासुद्धां कापूं लागतात; पण ही सौराष्ट्र देशांतील बाई, एखाद्या मोठया योद्धयाप्रमाणें फार धीट आहे. ’
ह्याचप्रमाणें इतर दोषांच्या बाबतींत ही समजावें. ”
ह्या उपमा प्रकारणांत ज्या मुद्यांची चर्चा बाकी राहिली आहे ती स्मरणालंकार प्रकरणांत अथवा विकल्प प्रकरणांत आम्ही करणार आहों तेव्हां ( आतां आम्ही ) उपमेचें निरूपण आवरतें घेतों.
येथें रसगंगाधरांतील उपमाप्रकरण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP