उपमालंकार - लक्षण ११

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां , ‘ मृगचक्षुषा ’ ह्या समासाचा विग्रह, ‘ मृगस्य चक्षुषी इव चक्षुषी अस्या: ’ , असा आहे. व ह्या समासाच्या पोटांतील मृगचक्षु:ह्या षष्ठीतत्पुरुष समासांतील उत्तरपद जें चक्षु: त्याचा ‘ सप्तम्युमानपूर्वस्य० ’ ह्या वार्तिकाप्रमाणें लोप झाला आहे. ह्या समासांतील मृगचक्षु: ह्या पदावर मृगचक्षु: सदृश ह्या अर्थाची लक्षणा करावी, असा जो कांहींचा ( म्ह० नैयायिकांचा ) पक्ष, तो मान्य केला तरी, किंवा सबंध समास हाच विशिष्ट अर्थाचा वाचक असतो हा ( वैयाकरणांचा ) पक्ष मान्य केला तरी, ह्या समासांत त्या त्या अर्थाचे ( म्ह० सादृश्य अथवा सदृश या अर्थाचे ) बोधक शब्द नस-ल्यानें, येथें धर्मोपमानवाचकलुप्ता उपमा समजावी.
अशा रीतीनें उपमेचे एकूण पंचवीस प्रकार सांगून झाले.
कुणी उपमेचे आणखीहि दुसरे कांहीं प्रकार सांगतात ते असे-वर, वाचक लुप्तेचे सहा प्रकार सांगितले; पण “ कर्तर्युपमाने ” ह्या सूत्रानें, ‘ णिनि ’ प्रत्यय होऊन एक सातवा वाचकलुप्तेचा प्रकार होत असलेलहि आढळतो. उदाहरणार्थ-कोकिल इव आलपति ( कोकिळासारखी बोलते.)  ह्या अर्थी, कोकिलपिनी ह्या पदांत, वाचकलुप्तोपमा आहे. असाच ह्या वाचकलुप्ता उपमेचा आठवाहि एक प्रकार संभवतो, तो असा-“ इवे प्रतिकृतौ ” ह्या सूत्रानें होणार्‍या कन्‍ प्रत्ययाचा, ‘ लुम्मनुष्ये ’ ह्या सूत्रानें लोप होतो; व चञ्चा इव ह्या आर्थीं चञ्चा शब्द योजला असतां, वाचकलुप्ता उपमा होते. उदाहरणार्थ-
“ जो स्वत:चें हित जाणत नाहीं, तो पुरुष चञ्चासारखा ( म्हणजे गवताचा पेंढा भरून केलेल्या माणसाच्या आकारासारखा ) समजावा. ह्याच
वाचकलुप्तेचा आणखी एक, नववा प्रकारहि, संभवतो तो असा-आचारार्थीं क्किपू केला व उपमेंतील समानधर्म दुसर्‍या एका ( स्वतंत्र ) शब्दांने सांगितला म्हणजे हा प्रकार होतो असे दिसतें. उदाहरणार्थ, ‘ तिचें आनंद देणारें मुख शरद्‍ ऋतूंतील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे भासतें. ’ इत्यादि वाक्यांत.
उपमान-लुप्ता, ही वाक्य व समास ह्या दोन ठिकाणीं होत असल्याचें वर सांगितलें; तिचा तिसराहि प्रकार होतो तो असा-
“ ह्याची व चोरांची गांठ पडणें, आणि त्यांनीं ह्याचा वध करणें, ही गोष्ट अचान घडल्यानें काकतालीय ( च ) झाली. ह्यांतील काकतालीय ह्या शब्दांत मूळचा काकताल हा शब्द सामासिक आहे. ह्यांतील काक शब्दाचा लक्षणेनें काकागमन व ताल ह्या शब्दाचा लक्षणेनें तालपतन हा अर्थ होतो. आणि त्या दोहोंचा ‘ समासाच्च तद्विषयात्‍ ’ या पाणिनिसूत्रा-वरून फलित होणार्‍या ज्ञापकाप्रमाणें, सादृश्य ह्या अर्थी समास झाला व त्याचा, कावळा यायला आणि त्याच्या डोक्यावर ताडफळ पडायला एकच गाठ पडावी, ’ तशी येथें ह्याची व चोराची गांठ पडली, असा अर्थ, ( काकताल या पदाचा ) झाला. नंतर, त्या काकताल शब्दाला पुन्हां सादृश्य ह्या अर्थी छ ( म्हणजे ईय ) हा प्रत्यय लावून शेवटीं काकतालीय हें रूप सिद्ध झालें; व त्या प्रत्ययाचा अर्थ सादृश्य हा असल्यानें, “ ताडाचे फळ पडून कावळ्याचा जसा बध व्हावा, तसा चोरांच्या हातून ह्याचा वध झाला ” असा शेवटीं वरील श्लोकाचा अर्थ झाला. काकतालीय ह्या शब्दांतील प्रत्ययार्थोपमेंत, “ ताडफळ पडून कावळा मरणें ” हें उपमान आहे. तें येथें शब्दाने सांगितलें नसल्याने छ ( ईय ) प्रत्ययाच्या अर्थांत उपमानलुप्ता उपमा आहे असें समजावें.
( प्राचीनांनीं ) वाचक व उपमान ह्याचा लोप असलेली ती वाचको-पमानलुप्ता असा ह्या प्रकारचा नांवानें सुद्धां उल्लेख केलेला नाहीं. पण तो प्रकार काकतालीय ह्या शब्दांतील काकताल हा जो मूळचा समास त्यांत आहे. ( म्हणजे कालतालसमागम हें उपमान लुप्त आहे व उपमावाचक शब्दही लुप्त आहे;  म्हणून काकताल हें वाचकोपमानलुप्तेचें उदाहरण होईल. )

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP