उपमालंकार - लक्षण १९

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां उपचरित म्हणजे तसा नसतांना आरोपानें  ( म्ह० लक्षणेनें ) तसा मानलेला साधारण धर्म असलेली उपमा ही-
“ केवळ अमृतानें जिचा देह निर्माण केला आहे अशा तिचा, वज्राप्रमाणें ज्याचें चित्त कठीण आहे अशा मला, ज्यानें मित्र केले, त्या वेडगळ ( मनाच्या ) ब्रह्मदेवालाच नांवें ठेवणें योग्य आहे. ”
सीतेला हाकलून देणार्‍या रामाचें हें आपल्या मनाशींच बोलणें
आहे. ह्यांतील कठीणपणा हा जड पदार्थांचा धर्म आहे; तरी त्याचा चित्तावर ( लक्षणेनें ) आरोप केला आहे.
आतां नुसत्या शब्दरूप धर्माचें उदाहरण हें:-
“ ज्यांत पंडित व पशूसारखा माणूस ह्या दोहोंच्याशीं ( समभावानें व ) मानानें वागणारे सच्छील मंत्री, मुनीप्रमाणें राहतात. ”
[ समाना: ह्या पदाचे (१) समभावानें वागणारे व (२) मानानें वागणारे, असे दोन अर्थ आहेत. ]
ह्या वाक्यांत उपमान व उपमेय ह्या दोहोंच्या धर्मांचा अर्थ एक नसल्यानें, साधारण धर्म ( निव्वळ ) शब्द ( शब्दरूप ) आहे.
वर सांगितलेल्या प्रकारच्या साधारण धर्मांचें एकमेकांशीं मिश्रणहि होऊं शकतें. जसें-
“ हें बाले, कसल्यातरी काळ्या टिळयानें कपाळावर चिन्हित झालेलें तुझें तोंड, ज्याच्या आंतल्या भागांत भुंगे निजले आहेत अशा फुललेल्या कमळासारखें दिसतें. ”
ह्या श्लोकांत कपाळावरचा टिळा व निजलेला भुंगा हे दोन धर्म बिंबप्रतिबिंबभावानें युक्त असून ते क्यड्‍ प्रत्ययाचा अर्थ जो आचार,-जो येथें अनुगामी धर्म आहे-त्याच्याशीं अभेद पावून राहिले आहेत.
अथवा हें दुसरें उदाहरण-
“ शेंदुरामुळें ज्याचा देह लाल झाला आहे अशा गणपतीच्या दांताचा कोंभ, संध्याकाळामुळें लाल झालेल्या आभाळांतल्या नवीन चंद्राच्या कोरेप्रमाणें दिसणारा असा, तुमचें रक्षण करो. ”

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP