उपमालंकार - लक्षण ८

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


‘ ग्रीष्यचंडकरमंडल० ’ इत्यादि श्लोक, पूर्वीं वाक्यगता पूर्णा उपमेचें उदाहरण म्हणून दिला होता. त्या श्लोकांत, पावसाळ्यांतील ढगांप्रमाणे असणारा कृष्ण, माझी वेदना दूर करो, असा अन्वयार्थ केला तर, वेदना हरण करण्याचें कर्तृत्व ( हा धर्म ) एकटया कृष्णाकडेच येतें, ( ढगाकडे येत नाहीं; अर्थात्‍, वेदना हरण करणें हा येथें साधारणधर्म होणार नाहीं. ) आणि मग, ढगाशीं सादृश्य दाखविण्याकरिता काळेपणा इत्यादि बाहेरचा एखादा धर्म घ्यावा लागेल, ” असें जर म्हणायचें असेल तर , ‘ ग्रीष्मकर० ’ इत्यादि श्लोकांतही धर्मलुप्ता ( उपमा ) मानावी लागेल. येथील या दोन प्रकारच्या उपमांमधील फरक असा- ‘ ग्रीष्मचण्डकर० ’ इत्यादि श्लोकांत असलेल्या पूर्णा उपमेंत केवळ वृष्णिवरेण्य हें पद उद्देश्य कोटींत ( सदरांत ) घातलें, आणि पावसाळ्यांतील ढगांशीं सादृश्य उत्पन्न करणारा किंवा ह्या ढगाच्या सादृश्याशीं एकरूप ( अभिन्न ) असणारा ‘ वेदनाहरण ’ हा धर्म, विधेय कोटींत घातला तर, ही उपमा विधेय आहे, असा शाब्दबोध होईल. पण ही उपमा धर्मलुप्ता आहे असें मानलें तर, ढगाशीं ज्याचें सादृश्य आहे अशा कृष्णाला उद्देश कोटींत घालावें लागेल, आणि ‘ पीडा हरण करणें ’ एवढाच धर्म ह्या वाक्यांत विधेय समजावा लागेल. म्हणजे ही उपमा उद्देश्य कोटींतील आहे असा शाब्दबोध होईल.
धर्मलुप्ता, आर्थी व वाक्यांत असलेली उपमा ही-
‘ हे सुंदरी, रागांतसुद्धां तुझे तोंड लाल कमळाप्रमाणें दिसतें ( हें ठीकच आहे. ) कारण विकृत स्थितींतही, उत्तमांचा मनोहरपणा नाहींसा होत नाहीं. ”
धर्मलुप्ता समासांत आलेली श्रौती व आर्थी उपमा, आणि तद्धितांत आलेली केवल आर्थी उपमा खालील श्लोकांत आहे-
“ साक्षात्‍ चन्द्र अशा नबाब आसफखानाची वाणी जशी अमृता-प्रमाणें, मूर्ति जशी पृथ्वीप्रमाणें, कीर्ति जशी चंद्राच्या शोभेप्रमाणें, व बुध्दि जशी समुद्राप्रमाणें आहे, तशी पृथ्वीतलावर दुसर्‍या कुणाचीही नाही असें मला वाटतें ” .
‘ कल्प ’ ह्या ( तद्धित ) प्रत्ययाचा ‘ थोडासा कमी ’ असा जरी अर्थ होत असला तरी निराळ्या भाषेंत त्याचा अर्थ सादृश्य हाच होतो.
वाचकलुप्ता समासांतील उपमेचें उदाहरण, ‘ दरदलदरविंद० ’ इत्यादि पूर्वीं उपमेचें उदाहरण म्हणून दिलेल्या श्लोकांत येऊन गेलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP