उपमालंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


( शंका :- ) “ तुझ्या ठिकाणीं ( दिसणारा ) कोप, चंद्रामधील अग्नीसारखा मला वाटतो. ”
ह्यासारख्या वाक्यांतलें उपमान ( चंद्रांतील अग्नि ) अत्यंत असंभवनीय असल्याने त्याचें ( नायिकागत कोपाशीं ) सादृश्य आहे असे मानणें शक्यच नाहीं; मग या वाक्यांत चमत्कार होणार तरी कशा-मुळें ? ” असे तुम्ही ( म्हणजे शंकाकार ) म्हणत असाल तर ( त्यावर आमचें उत्तर ) - ( ह्या ठिकाणीं ) कवीला ( ‘ चंद्रांतील अग्नि ’ असें दोन पदार्थांचें एकत्र मिळून होणारें ज्ञान झालेलें नसून ) चंद्र व अग्नि ह्या दोन पदार्थांचें वेगवेगळें सुटें ज्ञान ( प्रथम ) झालें; आणि मग त्यानें, त्या दोघांची मिळून आपल्या मर्जीप्रमाणें ‘ चंद्रामधील अग्नि ’ अशी, ज्या रूपाचा ( कधींही ) संभव असू शकत नाहीं अशा रूपानें, कल्पना केली. त्यामुळें आतां त्याच्याशीं नायिकेच्या कोपाच्या साम्याची कल्पना करायला हरकत नाही. “ ( केवळ ) कल्पनेनें निर्माण केलेलें, पण ( वस्तुत: ) खरें नसलेलें सादृश्य, चमत्कार करील तरी कसें ? ” असें म्हणू नका. अत्यंत मऊ म्हणून मानलेल्या सोन्यानें जिचें शरीर बनविलें आहे, ( ब ) हिर्‍याच्या दातांच्या प्रभेनें जिनें भोंवतालचा अंधकार दूर केला आहे अशी सुंदरी ( एखाद्यानें ) भावनेच्या बळानें, स्वत:च्या पुढें उभी केली व तिला आलिं-गिले तर, त्याला त्यापासून आल्हाद झालेला आपण पाहतों ( च कीं ). उपमेच्या आमच्या लक्षणांत, ‘ उपमान व उपमेय हीं खरीं ( च ) असलीं पाहिजेत असे शब्द ( आम्ही ) घातले नसल्यानें, ( वरील वाक्यांतील कल्पित उपमानामुळें ) मुळीं सुद्धां बिघडणार नाहीं. आणि म्हणूनच-
“ ( ह्या सुंदरीच्या ) गालावरून तिच्या स्तनप्रदेशावर पडलेली कुरळ्या केसांची बट, चंद्रमंदलावरून ( खालीं ) मेरु पर्वतापर्यंत लोंबणार्‍या सापासारखी दिसत आहे. ”
यासारख्या श्लोकांत, विसंगत असें कांहींच नाहीं. दुसरे ( कांहीं ) लोक, “ ह्या श्लोकांतील कल्पित उपमेचें, ( ह्यांतील उपमेयाला ह्या कल्पित उपमानाखेरीज ) ‘ दुसरें उपमानच न मिळणें ’ हें फळ असल्यानें, ह्यांत ( उपमा नसून ) दुसराच ( कोणता तरी ) अलंकार आहे, ” असेम म्हणतात; पण तें बरोबर नाहीं; कारण यांतील सादृश्य चमत्कारजनक असल्यानें ह्यांतील अलंकाराचा उपमेंत समावेश करणें ( च ) योग्य आहे. ( आणि शिवाय ) “ खर्‍या उपमानानें निरूपित सादृश्य ” असे शब्द ( आम्ही ) लक्षणांत घातलेले नाहीत. आतां ‘ दुसरें उपमान न मिळणें ’ हे ह्यांतील अलंकाराचें फळ आहे, ( आणि म्हणूनच येथें दुसरा अलंकार मानावा ) असें म्हणत असाल तर, तें फळ ( उलट, ह्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची उपमा मानायला ) च अनुकूल प्रमाण आहे; ( ह्याला ) उपमेच्या बाहेर ठेवायला ( अनुकूल प्रमाण ) नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP