उपमालंकार - लक्षण २८

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां केवलशुद्धपंरपरित उपमा ही-
“ सर्व धर्मांचा आश्रय असा युधिष्ठिर नांवाचा राजा,  वृक्षाप्रमाणें असणार्‍या लोकांना चैत्र मासासारखा वाटला. ”
मालारूपशुद्धपरंपरित उपमा ही-
“ हे राजा, हरिणाप्रमाणें असणार्‍या सर्व राजांच्यामध्यें सिंहा-सारखा; वृक्षांप्रमाणें असणारांच्यामध्यें चंदनवृक्षासारखा व नक्षत्रांप्रमाणे असणारांच्यामध्यें, तूं ह्या पृथ्वीवर चंद्रासारखा आहेस. ”
ह्या श्लोकांत परंपरित उपमा जी सांगितली ती, उपमान व उपमेय ह्या जोडयांचे परस्परांशीं आनुकूल्य असून एक उपमा दुसर्‍या उपमेला उपाय झाली आहे, अशा परिस्थितींत, सांगितली गेली आहे.
आतां दोन उपमानें व दोन उपमेयें ( अनुक्तमें ) परस्परांशीं प्रतिकूल झालीं असून ही, त्यामुळें एक उपमा दुसर्‍या उपमेला उपाय झाली आहे, अशा परंपरित उपमेचें उदाहरण हें-
“ सर्व प्राण्यांना भयंकर वाटणारा दुर्योधन नांवाचा राजा, दिव्या-प्रमाणें असणार्‍या सज्जनांना वादळी वार्‍यासारखा वाटला. ”
ह्यांतील पहिली उपमा दिव्याप्रमाणें असणारे सज्जन ही. ही उपमा वादळी वार्‍यासारखा दुर्योधन ह्या दुसर्‍या उपमेला ( प्रतिकूल असूनही ) साधक झाली आहे. ( ह्यांतील पहिली उपमा अंग व दुसरी उपमा अंगी. )
ह्या ठिकाणी दिवा व वादळी वारा ही दोन उपमानें दोन उपमांत आलेलीं असून त्यांची परस्परांशीं प्रतिकूलता आहे. त्याचप्रमाणें दोन उपमेयें-सज्जन व दुर्योधन-ह्यांच्यांतही परस्पर प्रतिकूलता आहे. तरी पण ह्या अंग व अंगी झालेल्या उपमा एकच जातीच्या ( म्हणजे दोन्हीही प्रति-कूलतेवर उभारलेल्या ) असल्यानें, परस्परांना अनुकूल आहेत. व म्हणूनच त्यांपैकीं एक उपमा दुसरीची उपाय झाली आहे.
आतां ह्या ( प्रतिकूलतेवर उभारलेल्या ) परंपरित उपमेच्या माला-रूपाचें उदाहरण हें-
“ कमलाप्रमाणें असणार्‍या सज्जनांना शिशिर ऋतूंप्रमाणें ( विनाशक ) असणार्‍या, ह्या ( दुष्ट ) राजानें, दर्भाप्रमाणें असणार्‍या सर्व धर्मांच्या बाबतींत विदर्भ देशाप्रमाणें ( म्ह० दर्भरहित असलेल्या देशाप्रमाणें ) आचरण केलें आहे. ”
ज्या उपमेंत उपमेयें आपापल्या उपमानांचीं उपमानें न होतां, पुढील उपमेयांचीं उपमानें होतात. तिला रशनोपमा म्हणावे. उदाहरणार्थ-
ह्या राजाची मूर्ति वाणीप्रमाणें सुंदर आहे, कीर्ति मूर्तीप्रमाणें अत्यंत निर्मळ आहे आणि, मति कीर्तीप्रमाणें जगांत सर्वांनीं स्तुति करावयास योग्य अशी आहे. ”
ही रशनोपम साधारण धर्माच्या बाबतींत प्रत्येक वाक्यांत भेद असणारी आहे. ( म्हणजे ह्यांतील प्रत्येक उपमावाक्यांत निरनिराळे साधारण धर्म आहेत. )
आता प्रत्येक उपमावाक्यांत, एकच साधारण धर्म असणारी रशनोपमा ही:-
“ ह्या राजाचे माजलेले हत्ती, पर्वताप्रमाणें, पुत्र, माजलेल्या हत्ती-प्रमाणें व योद्धे, पुत्रासारखे अत्यंत धिप्पाड शरीराचे आहेत. ह्यांतील परमोन्नतविग्रह हा धर्म तीनही उपमावाक्यांना साधारण आहे ? ”
ह्याच उदाहरणांतील परमोन्नतविग्रह हा साधारण धर्म काढून टाकून, ‘ तस्य ’ ह्या शब्दानंतर, ‘ भटा इव युंधि प्रजा: ’ असे शब्द घातले तर, हेंच धर्मलोपा रशनोपमेचें उदाहरण होईल.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP