उपमालंकार - लक्षण १०

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


ह्या श्लोकांत, सुधापायम्‍ ह्या पदांत सुधेसारखें ह्या अर्थी, कर्मणि णमुल्‍ आहे. आणि ‘  उपमाने कर्मणि च ’ या पाणिनि सूत्रांतील चकारानें निजर्रावासम्‍ ह्या पदांत, देवासारखें, ह्या अर्थी कर्तरि णमुल्‍ झाला आहे.
धर्मोपमानलुप्ता उपमा, वाक्यांत व समासांत असल्याचीं उदाहरणें हीं-
“ सारे वन धुंडाळलें; सर्व वृक्ष न्याहाळून पाहिले: तरी पण, हे आम्रवृक्षा, सार्‍या जगांत तुझ्यासारखा एकही वृक्ष भुंग्याला सापडला नाही. ”
( हें झालें वाक्यांतील लुप्तोपमेचें उदाहरण. ) आतां, ह्याच श्लोकांत ‘ तथापि ते समम्‍ ’ हे शब्द काढून व त्याऐवजीं ‘ भवत् समम्‍ ’ हे शब्द घालून, शुद्ध आर्या तयार केली तर, हाच श्लोक, समासांतील लुप्तोपमेचें उदाहरण, होईल.
क्किपू प्रत्ययाचे द्वारां होणार्‍या वाचकधर्मलुप्ता उपमेचें उदाहरण हें-
“ हे राजा, तुझ्या कीर्ति स्त्रियांच्या पुष्ट स्तनांवर, अलकानगरींत, व समुद्राच्या पुळणींत, अनुक्रमें हारासारख्या, शंकरासारख्या व हिर्‍यासारखा चमकतात. ”
ह्या श्लोकांत हार, हर व हीर हे शब्द, आचारार्थीं क्किप्‍ प्रत्ययाचा लोप होत असल्यामुळें, धातूंचीं रूपें समजावीं. ह्या ठिकाणीं, “ हार वगैरे शब्द लक्षणेनें हार वगैरेंचें सादृश्य हा अर्थ दाखवितात व क्किप्‍ प्रत्ययाचा लोप झाला असतांही त्याचें स्मरण झाल्यानें, तो प्रत्यय ‘ आचार ’ हा अर्थ दाखवितो, ” हें मत मान्य केलें तर, ह्या श्लोकांत वाचकाचा व आचार या धर्माचा लोप स्पष्टच आहे. “ हार वगैरे शब्द ( स्वत: च ) लक्षणेनें, ‘ हारादिकांचें जें सादृश्य त्याच्याशीं अभिन्न असा आचार ’ इतक्या अर्थाचा बोध करतात, ” हा पक्ष ग्राह्य मानला तरीसुद्धां, केवळ
सादृश्य व केवळ धर्म यांचा वाचक शब्द येथें नसल्यानें ह्या ठिकाणीं वाचकधर्म लुप्ता उपमा तर खरीच.
समासांतील वाचकधर्मलुप्ता उपमेचें उदाहरण हें-
‘ हे सुंदरी, कमळासारख्या तुझ्या वदनावर, तुझ्या सुंदर दंतपंक्तीच्या प्रभा, तुझ्या लाल अधराच्या प्रेभेशीं मिसळल्यामुळें, कमळाच्या लालसर तंतू प्रमाणें शोभत आहेत. ॥
ह्या ठिकाणीं वदन व अंबुज ह्या दोहोंत अभेद सांगण्याच्या हेतूनें जर वदनांबुज हा विशेषणसमास ( कर्मधारय ) केला तर, दंतपंक्तींची प्रभा ‘ कमलतंतूंप्रमाणें शोभत आहे, ’ हें म्हणणें, जुळणार नाहीं. कारण कीं, वदन व अंबुज ह्यांचें तादात्म्य साधण्याकरतां दंतप्रभेचें कमलतंतूंशी तादात्म्य मानणें भाग आहे. कमलतंतूशीं सादृश्य हें त्या वदनांबुजाच्या तादात्माला साधक नाहीं; पण वदनांबुज हा उपमितसमास घेतला म्हणजे वदन व अंबुज ह्या दोन धर्मीमध्यें सादृश्य प्रतीत होईल; आणि मग त्या धर्मींचे जे केसर व दंतप्रभा हे धर्म, त्यांमध्यें सादृश्य सांगणें योग्यच होईल. म्हणून ‘ वदनांबुजे ’ ह्या अधिकरणविशिष्ट ( म्हणजे सप्तमी विभक्तींत ) असलेल्या सामासिक पदांतील उद्देश्य कोटींत असलेल्या उपमेला घेऊनच आम्ही वाचकधर्मलुप्तोपमेचें हें उदाहरण दिलें आहे. विधेयकोटींतील, ‘ केसरा इव ( कान्तय:  ) काशन्ते ’ ही उपमा तर पूर्णाच आहे.
क्यच्‍ प्रत्ययांतील वाचकोपमेयलुप्ता उपमा, तसेंच समासांत होणारी धर्म, उपमान व वाचक, ह्या तिघांच्या लोपानें होणारी उपमा अशा दोन लुप्तोपमांचीं उदाहरणें, पुढील एकाच श्लोकांत आहेत-
“ तिलोत्तमेसारखी असलेल्या व हरणाच्या पाडसाच्या डोळ्याप्रमाणें डोळे असणार्‍या अशा तिच्या सहवासांत मला हा मर्त्यलोक स्वर्गासारखा वाटला. ”
तिलोत्तमीयन्त्या ह्या पदाचा विग्रह ‘ तिलोत्तमामिव आत्मानं आचरन्त्या ’ ( तिलोत्तमेसारखी स्वत:ला वागवणारी म्हणजे करणारी ) हा असून, ह्या ठिकाणीं आचार या अर्थीं क्यच्‍ प्रत्यय झाला आहे. आणि तिलोत्तमा-पदाची, तिलोत्तमेचें सादृश्य ह्या अर्थावर लक्षणा केली आहे; त्यामुळें सादृश्याचा वाचक इव शब्द ह्या ठिकाणीं स्पष्ट दिसत नसल्यानें, आणि
‘ आत्मानम्‍ ’ हें उपमेय येथें शब्दानें सांगितलें नसल्यानें तिलोत्तमीयन्त्या ह्या पदांत वाचकोपमेयलुप्ता ( उपमा ) समजावी. कुणी म्हणतील, “ स्वत: नायिका हीच येथें उपमेय घ्यावयास काय हरकत आहे ? ” ह्याला उत्तर हें की , ‘ आचरन्ती म्ह० वागवणारी ’ ह्या क्तियेचें कर्म जी स्वत: म्ह०आत्मा म्ह० नायिका हीच येथें उपमेय आहे. येथील तिलोत्तमीयन्ती ह्या शब्दाच्या विग्रहांतून निघणारें ‘ आत्मा हें पद उपमेय म्हणून घेतां येणार नाहीं. ( कारण तें पद आचरणें या क्तियेचें कर्म म्हणून गुंतल्यानें, त्याला उपमेय म्हणून घेतां येणार नाही ) शिवाय, तिलोत्तमां व आचरन्ती ह्या भिन्न विभक्तींत असलेल्या शब्दंचा उपमनोमेयभाव जुळणार नाहीं; तेव्हां तो जुळण्याकरता आत्मानं हेंच अध्याह्लतपद येथें उपमेय म्हणून मानणें भाग आहे. ( आणि तें पद तर श्लोकांत नाहीं; म्हणून येथें उपमेय लुप्त असलेली उपमा आहे. )

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP