संत चोखामेळा - उपदेश

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१६०) देही देखिली पंढरी । विठू अविनाश विटेवरी ॥१॥
रुक्मिणी अंगना । आत्मा पुंडलिक जाणा ॥२॥
आकार तितुका नासे । निराकार विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसें गुज ठायीचा ठायी । चोखा म्हणे लागा पायी ॥४॥

१६१) दु:खरूप देह दु:खाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥
कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती । दु:ख होतां जाती आपोआप ॥२॥
सोयरे धायरे कवणाचे कवण । अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा  । सोडवी भवपाशा पासोनिया ॥४॥

१६२) धिक् तो आचार धिक् तो विचार । धिक् तो संसार धिक् जन्म ॥१॥
धिक् तें पठण धिक् तें पुराण । धिक् यज्ञ हवन केलें तेणें ॥२॥
धिक् ब्रम्हाज्ञान वाउग्या ह्या गोष्टी । दया क्षमा पोटी शांति नाहीं ॥३॥
धिक् ते आसन जटाभार माथा । वायांचि हे कंथा धरिली जेणें ॥४॥
चोखा म्हणे धिक् जन्मला तो नर । भोंगी नरक घोर अंतकाळीं ॥५॥

१६३) न करीं सायासाचें काम । गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांही नेणें । आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें । नाहीं उरलें दु:खातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार । नामें पैलपार तरेन ॥४॥

१६४) निर्गुणा अंगी सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गबाळा अवघी कहाणी ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले । निर्गुण सगुण त्याही गिळियेलें ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥

१६५) नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगतों । निचेष्ट निरूतें  भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हाती । मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांही ॥४॥

१६६) नेणों कोणे काय देवासी दिधलें । मागत वाहिलें तयापाशीं ॥१॥
पेरावें जें शेती तेचि फळप्राप्ती । वाया काय गुंती आपुले मनीं ॥२॥
तेव्हां घ्यावें हेंचि पूर्वापार । पुराणी विचार हाचि आहे ॥३॥
चोखा म्हणे उगें देवासी रुसती । आपुलें मनाप्रती प्रसती ना ॥४॥

१६७) पांडुरंगी लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

१६८) फुलाचे अंगीं सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥
मृत्तिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांझण माथण घागरी ॥२॥
विराली मृत्तिका फुटले घट । प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाही । विवेकी तिये ठायीं न गुंतेची ॥४॥

१६९) बावरे मन रात्रंदिवस झालें । नावरे वाहिलें काय करूं ॥१॥
येणें माझा कैसा घेतिलासे लाहो । आतां कोठे जावो देशांतरीं ॥२॥
न धरीं तयाची संगतीची गोडी । झाली वोढावोढी साच दिसे ॥३॥
चोखा म्हणे याचा न तुटे संबंध । येणें मज बाध लाविलासे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP