संत चोखामेळा - अभंग ३१ ते ४१

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


३१) अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोभलें किरीट कुंडलें । तेंचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पितांबरी कांसे सोनसळा विराजे । सर्वांगी साजे चंदनउटी ॥४॥
मिरवलें कर दोनीं कटावरी । ध्यान ते त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनी । सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी । चोखा परोपरी नाचतसे ॥७॥

३२) इनामाची भरली पेठ । भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळवंट । संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी । वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
चोखा जातो लोटांगणी । घेत पायवणी संतांची ॥४॥

३३) जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो । न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिना
चे माहेर । तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥

३४) टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीचा हाट कउलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जय जयकार भीमातीरीं ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥

३५) न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥
पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखासरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥

३६) पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥

३७) पुंडलिकें सूख दाखविलें लोकां । विठ्ठल नाम नौका तरावया ॥१॥
जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥
अवघा पर्वकाळ तयाचिये पायीं । नको आणिके ठायीं जाउ वाया ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गांठीं । जावोनिया मिठी पायीं घाला ॥४॥

३८) बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥

३९) विठ्ठल विठ्ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरीकीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

४०) वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रूप हें सांवळें गोड तें गोजिरें । धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥

४१) सुखाची सुखराशि पंढरीसी आहे । जावोनियां पाहे अरे जना ॥१॥
अवघाचि लाभ होईल तेथींचा । न बोलावे वाचा मौनावली ॥२॥
अवघिया उद्धार एकाचि दरूशनें । भुक्तिमुक्ति केणें मिळे फुका ॥३॥
प्रत्यक्ष चंद्रभागा अमृतमय साचार । जडजीवा उद्धार पहातां दृष्टी ॥४॥
चोखा म्हणे आनंदें नाचा महाद्वारीं । वाचे हरि हरि म्हणे मुखें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP