सेवकधर्म - समास १

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


ऐका प्रपंचविचार । आपली करनी उतरे पार । येथें नाहीं उत्तर । श्रेष्ठाकडे ॥१॥
पूर्वी दरिद्रें पीडिले । ते समर्थ अंगीकारिले । शिकवूनि शिकवूनि शहाणे केले । नाना प्रकारें ॥२॥
पहिला होता नाचार । श्रेष्ठीं वाढवोनि केला थोर । या वचनीं अनादर । होतां बरवें नव्हे ॥३॥
जो आपुलें हित न करी । तो आपुला आपण वैरी । येथें कांहीं कोणावरी । शब्द नाही ॥४॥
श्रेष्ठांचे मनोगत राखेना । बळेंच करी बल्गना । युक्ति प्रयुक्ति नाना । प्रकारें करी ॥५॥
श्रेष्ठांचे केलें मोडावें । आपुलेंचि पुढें प्रतिष्ठावें । तरी मग लागे भ्रष्टावें । वैभवापासूनि ॥६॥
पुढें पुढें काम करी । मागें कांहींच न करी । कार्यातें नसतां उरी । कांहींच पुढें ॥७॥
उगाच गर्वै मेला । मागील दिवस विसरला । स्वार्थचि करूं लागला । म्हणजे गेलें ॥८॥
वडिलंसि बुद्धि शिकवी । युक्तिबळें जाणीव दावी । तया मूर्खासि पदवी । प्राप्त कैंची ॥९॥
जो सदांचा चोरटा । जो सदांचा कळकटा । कठीण शब्दें बारा वाटा । मनुष्यें केलीं ॥१०॥
आपला इतबार राखावा । मग तो सर्व धणी जाणावा । उदंड वैभवाचा हेवा । करूं नये ॥११॥
कार्य करितां कांहीं न मागे । तयाची चिंता प्रभूस लागे । ऐसें जाणूनि विवेक जागे । म्हणिजे बरें ॥१२॥
आपणास जपू लागला । श्रेष्ठांचे मनींचा उतरला । येणें कोण स्वार्थ जाला । विचारावा ॥१३॥
स्वामींनीं जें जें बोलावें । तेंचि सेवकी प्रतिष्ठावें । वेळ चुकवूनि बोलावें । विनीत होऊनि ॥१४॥
श्रेष्ठापुढें शहाणपण । हेंचि केवळ मूर्खपण । मूर्खपणें नागवण । आली घरा ॥१५॥
कळेल तरी सांगूं नये । वडि-लांची बुद्धि शिकवूं नये । नेणपणेचि उपाय । विवेकीं करावा ॥१६॥
पुढें पुढें निघूं नये । आज्ञेवेगळें वर्तूं नये । न मानितां अपाय । नेमस्त आहे ॥१७॥
आधीं वडिलांसी पुसावें । किंवा आपणचि करावें । समय पाहू नि वर्तावें । विवेकी पुरुषें ॥१८॥
आधीं निश्चय करितो । मग उगोचिं पुसतो । इतका विचार करी तो । शहाणा कैंचा ॥१९॥
मी करितों ऐसें पुसणें । तें पुसणें न पुसणें । करूं न करूं हे विचारणें । हे उत्तमोत्तम ॥२०॥
मी शहाणा ऐसें कळलें । तरी स्वतंत्र पाहिजे केलें । स्वतंत्र होतां मिरवले । न शहाणपण ॥२१॥
हें मनींचे मनीं समजावें । प्रकट कासया करावें । घेऊं ये तरी ध्यावें । चातुर्यासी ॥२२॥
न्याय मानील तो न्यायी । न्याय न मानील तो अन्यायी । दगलबाज चिडाई । सुटेल कैसी ॥२३॥
ज्याचे अंतरीं स्वार्थबुद्धि । तेथें कैंची असेल शुद्धि । शुद्धि सांडितां अवधि । दु:खासी होय ॥२४॥
ज्याकरितां प्राणी वाढले । त्यासीच आडवूम लागले । ते कैसे म्हणावे भले । नीतिवंत ॥२५॥
सेवकीं सेवाचि करावी । स्वामी आसूदकीं द्यावी । तरीच पाविजे पदवी । कांहींएक ॥२६॥
समर्थांचें मनोगत । तसैसेंचि वर्तणें उचित । तेथें चुकतां आघात । नेमस्त आहे ॥२७॥
सेवक तोचि अडेना । शब्द भूईस पडेना । काम चुकलें हें घडेना । कदाकाळीं ॥३८॥
उंच अश्व वेळेस अडे । तरी पादच्छेद करणें घडे । ऐसें कळोनियां वेडे । अडोचि लागे ॥२९॥
मनोगत राखतां श्रेष्ठ वोळे । मनोगत चुकतां खवळे । ऐसें जयासी न कळे । तो जाणता कैसा ॥३०॥
स्वामीस जें अवश्य व्हावें । तैसें सेवकें न व्हावें । होऊनि आडवावें । कोण्या विचारें ॥३१॥
आपस्वार्थ उदंड करणें । आणि स्वामिकार्य बुडविणें । ऐसीं नव्हेत की लक्षणें । सेवकाचीं ॥३२॥
सेवकपणाचें मुख्य वर्म । कांहीं नसावें कृत्रिम । कृत्रिम केलिया संभ्रम । कैंचा पुढें ॥३३॥
धनिकाजी जितुका सावधान । सर्वकाळ परिछिन्न । त्यासी चोरितां निदान । बरें नव्हे ॥३४॥
थोडी बहुत लालूच करणें । आणि महत्कृत्य बुडविणें । महत्त्व जातां लजिरवाणें । जनामध्यें ॥३५॥
ऐसे बहुत ऐकिलें । कांहीं दृष्टीस देखिलें । देखत ऐकत चुकलें । तें मनुष्य कैसें ॥३६॥
कार्य करिताम उदंड देतो । चुकतां तो महत्त्व घेतो । ऐसें कळोनि वर्ते तो । प्राणी कैसा ॥३७॥
सेवक विश्वास दाविती । वैरियाकडे मिळोनि जाती । या चांडाळांसी गति । कोठेंचि नाहीं ॥३८॥
सकळ लोक स्वामियाचे । मागें पुढें अवज्ञेचे । सेवक उगेचि मूर्ख नाचे । शब्द बोले ॥३९॥
धूर्तपणें अंतरसाक्षी । नानाप्रकारें परीक्षी । दूरी गेला परी लक्षी । सर्व कांहीं ॥४०॥
म्हणोनि ऐसें न करावें । करणें तें नेमस्त करावें । नानाकारणें धरावें । अंतर प्रभूचें ॥४१॥

इति श्रीसेवकधर्मनिरू-पणं नाम प्रथम समास समाप्त ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP