गीतापद्यमुक्ताहार - अध्याय पंधरावा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


भगवान --

खाली डहाळ्या वर मूळ ज्यास

अश्वत्थ की अव्यय नाम त्यास ।

ज्या वेदपर्णे अनिवार्य सत्ता

ती जाणतो तो नर वेदवेत्ता ॥१॥

तच्छाखा ऊर्ध्व खाली बहुत पसरल्या मोठमोठ्या प्रचंड

पोसोनिया गुणांनी फुटति विषय हे कोंभ त्यांना उदंड ।

पारंब्या त्यास खाली रुळति कितिक त्या वासना जाण चित्ती

कर्माची नित्य होते अनुसरुनि तया मृत्युलोकी प्रवृत्ती ॥२॥

ह्याचे स्वरूप न कळे बहु शिष्टशिष्टा

ह्याला न आदि नच अंत असे प्रतिष्ठा ।

ह्याची मुळे बहुत खोल महा विचित्रे

छेदूनि ह्या तरुस तीक्ष्ण असंग शस्त्रे ॥३॥

त्यानंतरे ते पद धुंडणे की

गेल्यास तेथे परते न लोकी ।

त्या लीन व्हावे पुरूषास आद्या

प्रवृत्ति ह्या जेथूनि की अनाद्या ॥४॥

न श्लाघता मोह न संगदोष

निष्काम अध्यात्म जया विशेष ।

द्वंद्वे न ज्यांना सुखदुःखसंज्ञ

ते जाति त्या नित्यपदासि सुज्ञ ॥५॥

दिसाया नको ते रवीचा प्रकाश

नको तारकानाथ किंवा हुताश ।

पुन्हा पावल्या त्या न संसारकाम

असे तेच माझे सख्या ! पुण्यधाम ॥६॥

लोकी सनातन असा मम अंश आहे

व्यापूनि तो सकल जीव सदैव राहे ।

जी इंद्रिये प्रकृतिमाजि सदा रहाती

ओढी मनासहित तो विजया ! सहा ती ॥७॥

ह्यांच्या सवे घे शरिरासि जेव्हा

किंवा निघे त्यांतुनि ईश जेव्हा ।

ही आपुल्या संगति सर्व घेतो

वारा जसा गंध हरूनि नेतो ॥८॥

जिव्हा त्वचा कर्ण धरूनि सांच

हे चक्शःउ की घ्राण मिळूनि पांच ।

राहूनि ह्यांच्यात मनांत तेवी

हा जाण सार्‍या विषयांस सेवी ॥९॥

कैसा निघे हा असतो कसा हा

भोगी कसा हा गुणिही कसा हा ।

न पाहती ह्या जरि मूढ बा ! रे !

सज्ञाननेत्री बघतात सारे ॥१०॥

प्रयत्नी महा अर्जुना ! जाण योगी

तयांना दिसे राहता अंतरंगी ।

अयत्नी तसे अज्ञ की बुद्धिनष्ट

न त्या पाहती केधवाही भ्रमिष्ट ॥११॥

रवीपासुनी तेज जे हे अपूर्व

निघोनि प्रकाशी जगालागि सर्व ।

शशीमाजि की अग्निमाजी नरा जे

असे सर्व ते तेज रे ! जाण माझे ॥१२॥

तसे जाण पृथ्वीमधे मी शिरून

धरी सर्व भूते स्वतेजेकरून ।

नभी चंद्र मी होउनिया रसाळ

जगी औषधी पोशितो सर्वकाळ ॥१३॥

होवोनि वैश्वानर अर्जुना ! मी

राहे सदा भूतशरीरधामी ।

प्राणा अपानास मिळूनि चारी

टाकीत अन्ने पचवूनि सारी ॥१४॥

होवोनि सर्वा हृदयी प्रविष्ट

देतो स्मृति ज्ञान विचार इष्ट ।

मी ज्ञेय वेदे श्रुतिशास्त्रकर्ता

की व्यास तो मी सकलार्थधर्ता ॥१५॥

बा ! दोन जे पुरूष ह्या जगतात ठावे

त्यांना क्षराक्षर अशी असतात नावे ।

भूती वसे सकल तो क्षर हे प्रसिद्ध

कूटस्थ तो परम अक्षर हेहि सिद्ध ॥१६॥

निराळा ह्याहूनी परपुरूष जो उत्तम अती

जयाला लोकी ह्या सकल परमात्माहि वदती

अनादी तो ईश त्रिभुवन सदा व्यापुनि वरी

धरी ब्रम्हांडांते स्थिरचरहि जो पालन करी ॥१७॥

आहे ह्यास्तव वेगळा समज मी पार्था ! क्षरापासुनी

तैसा उत्तम अक्षरांत सगळ्या व्यापुनिया राहुनी ।

ह्यासाठी जगतामधे सतत की वेदांतही सन्मती !

जाणोनी पुरूषोत्तम प्रतिपदी माते सदा बोलती ॥१८॥

ज्ञाता मला ह्या पुरूषोत्तमाला

जो जाणतो टाकुनि मोहजाला ।

पार्था ! भजे तो मजला स्वभावे

सर्वस्व मी मानुनि भक्तिभावे ॥१९॥

ऐसे गूढ जनांस शास्त्र विजया ! हे सत्य जाणे अती

ते सारे कथिलेच पापरहिता पार्था ! तुला संप्रती ।

जाणे स्वस्थपणे महा सुमति जो संपूर्ण हे अंतरी

होतो तो कृतकृत्य सर्व जगती अर्थात सर्वोपरी ॥२०॥

पंधरावा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP