गीतापद्यमुक्ताहार - अध्याय दुसरा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


संजय --

कृपेने मनी फार तो व्याप्त झाला

जया लोचनी अश्रुचा पूर आला ।

करी खेद चित्ती धरी भीति भारी

अशा अर्जुना बोलला तै मुरारी ॥१॥

श्रीभगवान --

कसा जाहला मोह उत्पन्न अंगी ?

अणीबाणिच्या आजच्या या प्रसंगी ।

करी स्वर्गीच्या प्राप्तिचा नाश भारी

तसा मोह दुष्कीर्तिला साह्यकारी ॥२॥

भीरुत्व हे शूरपणासि झाकी

शोभे न पार्था ! तुज सर्व टाकी ।

दौर्बल्य हे क्षुद्र गणूनि बापा !

सोडी उठे सत्वर शत्रुतापा ॥३॥

अर्जुन --

बहू पूज्य ते भीष्म की द्रोण जाण

कसे त्यावरी सोडु हे तीव्र बाण  ।

कसे त्यांपुढे युद्ध आजी कराया

रहावे उभे सांग मी देवराया ॥४॥

गुरू श्रेष्ठ मानूनी तद्रक्तयुक्त

असेभोग ते भोगणे काय उक्त  ।

गमे फार उत्कृष्ट की ह्याजपेक्षा

जगी मागुनी राहणे शुद्ध भिक्षा ॥५॥

तया जिंकु की होउ आह्मीच नष्ट ?

कळेना , तरी का करा व्यर्थ कष्ट  ।

बरे राहिल्या कौरवांते वधून

करावे आह्मी काय मागे जगून  ॥६॥

सुचेना मला भ्रंशली बुद्धि सारी

ह्मणूनी तुला धर्मरीती विचारी ।

तरी ती खरी सांग कल्याणकारी

तुझा शिष्य मी जाहलो हे मुरारी  ॥७॥

भूराज्य निष्कंटक ते समृद्ध

किंवा मिळो इंद्रपद प्रसिद्ध ।

जो ग्लानि देतो सकलेंद्रियाही

तो शोक जाण्यास उपाय नाही ॥८॥

संजय --

तो शत्रुहंता मग पार्थ राया !

बोलोनि ऐसे जगदेकराया ।

‘ मी युद्ध कृष्णा ! न करीच ’ ऐसे

सांगोनि तो वीर उगाच बैसे ॥९॥

ऐशापरी अर्जुन लोकराया !

लागे मनी शोक बहु कराया !

सैन्यात दोन्ही बहु खिन्न झाला

तै कृष्ण हांसोनि वदे तयाला ॥१०॥

भगवान --

करू नये ते करितोसि शोक

ज्ञानामधे दाविशि फार झोक ।

मेले जिते की बहु आज लोक

ज्ञाते तयांचा करिती न शोक ॥११॥

मी तू चमू की जन सर्व राय

पूर्वी कधी हे नव्हतोचि काय  ।

होणार बापा पुढती हे न का ?

ह्या कोण रोधील अखंड चाका ॥१२॥

जसे पप्राणिया बाल्य येते स्वदेही

क्रमानेच तारूण्य वार्धक्य पाही ।

तसा जाउनी हा नवा येत देह

खरा धैर्यशाली न पावेच मोह ॥१३॥

ही इंद्रिये विषय हे सुख दुःख देती

शीतोष्ण ह्यास्तव तयास विकार होती ।

त्यांनाच की सतत उद्भव नाश पाहे

ते सोसणे ह्मणुनिया तुज भाग आहे ॥१४॥

असो सौख्य की दुःख मोठे जिवाला

धरी तुल्य दोन्ही जुमानी न त्याला ।

व्यथा ज्या न बाधे असा एक जो तो

खरा ज्ञानसंपन्न मोक्षास जातो ॥१५॥

नसे ते कसे ह्या जगामाजि यावे ?

असे जे खरे ते कसे नाश पावे  ।

कळे भेद हा ज्ञानियालागि वेगी

सख्य अर्जुना ! जाण हे अंतरंगी ॥१६॥

जे व्यापुनिया जगतात राहे

ते तत्व - आत्मा - अविनाश आहे ।

ओत अक्षयी ह्यास्तव त्यास जाण

नाशी न कोणी कधिही प्रमाण ॥१७॥

हे नाशती देहच जाण सत्य

देही न नाशे ह्मणतात नित्य ।

बा ! अक्षयी तो न कळेच शुद्ध

पार्था ! करी ह्यास्तव तूहि युद्ध ॥१८॥

आत्मा मरे हे ह्मणती कितेक

हा मारतो बोलति कैक लोक ।

दोघेहि ते अज्ञ परी सुजाणा

आत्मा नमारी न मरेहि कोणा ॥१९॥

जन्मे न आत्मा न मरे कदाही

मागे पुढे होत न जात नाही ।

हा तो पुराणा अज नित्य पाही

त्या देह गेला तरि मृत्यु नाही ॥२०॥

ऐशापरी पुरूष अव्यय आणि नित्य

नाही तयासकधि जन्महि जाण सत्य ।

तो अर्जुना ! मग असा कवणास मारी

की त्यास होइल कसा तरि साह्यकारी ॥२१॥

जसे टाकुनी जीर्ण - वस्त्रासि राया !

नवी नित्य घेतो अह्मी पांघराया ।

शरीरे तशी जीर्ण आत्मा त्यजूनी

नवी नित्य घे ह्याच न्यायेकरूनी ॥२२॥

न शस्त्रे तया तोडिती तीक्ष्ण जी जी

न जाळी तया अग्निही तीव्रतेजी ।

न पाणी करी आर्द्र शीतस्वभावी

न शोषी कधी वायु शुष्कप्रभावी ॥२३॥

तोडावया की भिजवावयास

जाळावया की सुकवावयास ।

अशक्य तो व्यापुनि सर्व राहे

आत्मा अनादि स्थिर नित्य आहे ॥२४॥

निराकार हा बोलती निर्विकार

नये चिंतण्या त्या नसे अंतपार ।

अशी लक्षणे सर्व त्याची विलोक

ह्मणूनी तुला योग्य नाहीच शोक ॥२५॥

बरे जन्म वा मृत्यू येतो तयाला

असे वाटले बा ! जरी त्वमनाला ।

तरी शोक हा योग्य नाहीच तूते

असे वाटते अर्जुना ! मन्मतीते ॥२६॥

जो जन्मला तो मरणार खास

मला तरी निश्चित जन्म त्यास ।

कोणासही जे टळणार नाही

त्याकारणे शोकहि योग्य नाही ॥२७॥

जन्मापूर्वी जीव कोठे रहातो ?

नेणो कोठे मृत्युमागूनि जातो ।

मध्ये भासे अल्पकाले जना या

त्याचा तूते शोक हा काय वाया  ॥२८॥

मानीतसे परम अद्भुत ह्यास कोणी

आश्चर्यरूप वदती कितिएक वाणी ।

कोणी अपूर्व ह्मणुनी परिसूनि जाणे

कोणीहि तत्स्वरूप सत्य परंतु नेणे ॥२९॥

सारे धरी देह ह्मणून देही

तो नित्य कोणासहि वध्य नाही ।

ह्मणून जीवास्तव कोणत्याही

पार्था ! तुला शोकहि योग्य नाही ॥३०॥

स्वधर्माकडे जाउ दे लक्ष बापा !

नको भीति चित्ती धरू शत्रुतापा  ।

तुह्मा क्षत्रिया भूषवी युद्ध भारी

नसे त्याहुनी अन्य कल्याणकारी ॥३१॥

घरी अर्जुना ! चालुनी युद्ध आले

खुले जाण तू स्वर्गिचे द्वार झाले ।

भले आवडे क्षत्रिया युद्ध सर्व

मिळाल्यास त्या होय आनंदपर्व ॥३२॥

असोनी असे युद्ध हा क्षात्रधर्म

करीशी न तू ते तरी तो अधर्म ।

स्वधर्मासि कीर्तिसि टाकूनि बापा !

वृथा दाटुनि जोडिशी आज पापा ॥३३॥

सारे तुझी ही अपकीर्ति लोकी

वर्णून गातील सदा विलोकी ।

संभाविताशी अपकीर्ति पाहे

मृत्युहुनी दुःसह पाहे ॥३४॥

महारथी जे तुज मान देती

गेला धरोनि ह्मणतील भीती ।

तुला असे जे अजि हे महत्त्व

जाऊन ते येइल की लघुत्त्व ॥३५॥

बोलून नये ते तव शत्रू आज

हे बोलता होइल तूज लाज ।

त्वच्छौर्यनिंदा करितील सारे

त्याहून दुःखप्रद काय बारे  ॥३६॥

निमालास युद्धी तरी स्वर्गयोग

परा जिंकल्या पृथ्विचे राज्य भोग ।

तुला लाभ दोन्हीमध्ये सत्य आहे

ह्मणोनी उभा शीघ्र युद्धासि राहे ॥३७॥

तू तुल्य दोन्ही सुख दुःख मानी

जयाजयाते सम , लाभ हानी ।

दोन्ही धरोनीच समानयोगे

तू युद्ध केल्या नच पाप लागे ॥३८॥

सांख्याचा कथिला विचार तुजला म्या येथपर्यंत हा

कोणी ह्यासचि वस्तुतत्त्व ह्मणती अन्वर्थ तेही पहा ।

योगाची कथितोच बुद्धि तुजला आता पुढे अर्जुना !

तेणे सत्वर कर्मबंध तुटती देऊनि ऐके मना ॥३९॥

ह्या कर्मयोगाचरणात काही

पार्था ! क्रमोल्लंघन होत नाही ।

किंवा नसे व्यत्यय त्यांत कोठे

ह्या अल्प धर्मे भय जाय मोठे ॥४०॥

ह्याच्यात एक विजया व्यवसायबुद्धि

उत्पन्न हौनि तिची दृढ होय सिद्धि ।

बुद्धि अनेकविध अव्यवसायिकांना

फाटे अनंत असतात शिवाय त्यांना ॥४१॥

वेदी ककर्मे बहु कथियली वैदिकी यज्ञयाग

ती ती केल्या मिळतिल सुखे संपदा स्वर्गभोग ।

ऐसे पार्था धरुनि हृदयी मूढ वेदाभिमानी

त्यांच्याहुनि इतर जगती ग्राह्य काही न मानी ॥४२॥

भोगैश्वर्यसुखार्थ नित्य असती ज्यांच्या सदा कामना

कर्मे जन्मफलप्रदे प्रिय बहू की स्वर्ग त्यांच्या मना ।

तत्प्राप्तीस्तव यज्ञयाग करुनी नाना क्रिया साधिती

त्यांची कर्मफळे बळे मिळवुनी तद्भोग ते भोगिती ॥४३॥

जया वाटते भोग ऐश्वर्य इष्ट

तयांचे सदा होतसे चित्त नष्ट ।

नसे त्यांस एकाग्रता लेश शुद्धि

समाधीत त्याची शिरेनाच बुद्धि ॥४४॥

बा ! वेद हे तीन गुणे प्रयुक्त

ते सोडुनी तीनहि होय मुक्त ।

निर्द्वंद की सात्विक आत्मभोगी

निष्काम हो तू तरि नित्य योगी ॥४५॥

कार्ये करील डबक्यातील अल्प वारी

डोहामध्ये सहज ती घडतात सारी ।

ब्रह्मज्ञ तेवि मिळवी सहजात बा ! रे !

वेदात जे कथियले सुखसौख्य सारे ॥४६॥

कर्मात आहे अधिकार तूते

नाही तुझे कर्मफलात नाते ।

बा ! तू नको कर्मफलास पाहू

केल्याविणे कर्म नकोच राहू ॥४७॥

टाकी फळे हौनी योगयुक्त

कर्मे करी सर्व जगात उक्त ।

सिद्धी असिद्धीत समान वाग

ह्यालाच पार्था ! ह्मणतात योग ॥४८॥

हे कर्म पार्था ! जगतात नीच

ह्या बुद्धियोगापुढती कमीच ।

दे सोडुनी कर्मफळे न लक्षी

घे ही तुला बुद्धि सदैव रक्षी ॥४९॥

जो बुद्धियुक्त जफ़ती नर अग्रगण्य

नाशी जिताच असता निज पापपुण्य ।

योगांत बुद्धि तव ही ह्मणुनीच ठेव

कर्मात हा कुशल योग असे सदैव ॥५०॥

शास्त्रज्ञ जे का बहु बुद्धियुक्त

होती फले टाकुनि कर्ममुक्त ।

तोडोनि जन्मोद्भव आपदाते

जातात ते निर्मळ सत्पदाते ॥५१॥

अज्ञानमोहमय सागर खोल फार

त्वद्बुद्धि त्यांस उतरून पडेल पार ।

तेव्हा श्रुताश्रुत जगातिल भोग त्याचे

वैराग्य खास उपजेल तुलाहि साचे ॥५२॥

ऐकूनि लोकश्रुतिचे विचार

झाली तुझी चंचळ बुद्धि फार ।

जेव्हा समाधीत ठरेल बा ! ती

तेव्हा तुझ्या योग पडेल हाती ॥५३॥

अर्जुन --

स्थितप्रज्ञ बोले कसा ? केवि वागे ?

समाधी तयाची कशी काय लागे ?

कसा ह्या जगी राहतो तो सुखाने ?

सख्या केशवा ! आयको त्वन्मुखाने ॥५४॥

भगवान --

जो अर्जुना ! काम समस्त सोडी

आत्मस्वरूपी बहु ज्यास गोडी ।

संतुष्ट चित्ते निजसौख्य भोगी

त्याला ह्मणावे स्थिरबुद्धि योगी ॥५५॥

दुःखामुळे होत नसे उदास

इच्छा सुखाची तिळही न ज्यास ।

आशा भय क्रोध समस्त टाकी

बा ! तो मुनींद्र स्थिरबुद्धि लोकी ॥५६॥

आसक्ति कोठे तिळही न ज्यास

जो मानितो तुल्य शुभाशुभांस ।

निंदी न वंदी सकला समान

झाली तयाची स्थिर बुद्धि महान ॥५७॥

सर्वेंद्रिये निग्रह जो करूनी

काढीतसे ह्या विषयांवरूनी ।

आंगे जशी कासव आत घाली

जाणे तयाची स्थिर बुद्धि झाली ॥५८॥

जे जे व्रते सतत पाळिति ज्यांस रोग

सोडूनि देति जन तेहि समस्त भोग ।

पोटांत नित्य वसते परि वासना ही

ती ब्रह्मदर्शन घडेल तयास नाही ॥५९॥

ज्ञान प्रयत्न्यांसहि इंद्रियांस

ह्या आवराया पडती प्रयास ।

की इंद्रिये फार बलिष्ठ होती

ओढून पार्था ! मन सर्व घेती ॥६०॥

त्या आवरी तो बहुयुक्त होतो आत्मस्वरूपीच सदा राहतो ।

स्वाधीन ज्याच्या सकलेंद्रिये ही

योगी खरा तो स्थिरबुद्धि पाही ॥६१॥

चिंती मनी जो विषयांस नित्य

इच्छा तयाला उपजेल सत्य ।

इच्छेमुळे काम मनात वागे

त्याच्या सवे क्रोधहि येत मागे ॥६२॥

क्रोधामुळे प्रबळ मोह उठे मनात

मोहामुळे स्मृतिहि फार पडे भ्रमात ।

होता स्मृतिभ्रमण बुद्धिहि नाश पावे

बुद्धीस नाश घडता मृततुल्य व्हावे ॥६३॥

हाती जया इंद्रियसंघ आला

जो द्वेषरागांतुनि मुक्त झाला ।

आत्मस्वरुपी धरि नित्य नाद

तो सर्वभावे मिळवी प्रसाद ॥६४॥

दुःखे प्रसाद मिळता विलयास जाती

होते प्रसन्न मन ये हृदयात शांती ।

होता प्रसन्न मन हे मम मित्रराया !

नाही उशीर मग ही स्थिर बुद्धि व्हाया ॥६५॥

अज्ञास बुद्धि बघता तिळमात्र नाही

एकग्रता वरिल कोठुनि त्यास पाही ।

एकाग्रता सदन शांतिस फार मोठे

शांतिविणे सुख खरे असणार कोठे  ॥६६॥

ही इंद्रिये भटकती विषयांत जेव्हा

जो मोकळे स्वमन सोडुनि देत तेव्हा ।

तद्बुद्धिची वळविती तिकडेच धाव

वारा जसा ढकलिती जलधीत नाव ॥६७॥

ह्या कारणे आण असे मनात

जो निग्रहाने मन आवरीत ।

ह्या इंद्रियांपासुन जाण वेगी

पार्था ! खरा तो स्थिरबुद्धि योगी ॥६८॥

समस्त जीव ज्यामध्ये निजून राहती उगी

तयांत आत्मसंयमी सदैव जागतो जगी ।

जयामध्ये समग्र लोक जागती जगावरी

मुनींद्र तो खुशाल त्यांत झोप घेत अंतरी ॥६९॥

इच्छा मनी ज्या उठतात कोटी

घेतो नद्या सागर जेवि पोटी ।

तेवी गिळी ; शांति मिळेल त्याला

तो लाभ लाभे नच कामुकाला ॥७०॥

लोकांत होऊन निरिच्छ सत्य

टाकी फलेच्छा करि कर्म नित्य ।

माझे न मी ज्या अभिमानशून्य

होईल तो शांति मिळून धन्य ॥७१॥

ब्राह्मी स्थिती ही मिळते जयाला

हा मोह पार्था ! न शिवे तयाला ।

राहे स्थिती ही जरि अंतकाली

ब्रह्मास तो योग्यच भाग्यशाली ॥७२॥

दुसरा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP