गीतापद्यमुक्ताहार - अध्याय चौदावा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


भगवान --

ज्ञानामध्ये उत्तम फार एक

ते ज्ञान सांगेन फिरोनि ऐक ।

जे ऐकूनी कैक मुनींद्र सिद्ध

होवोनि झाले विजया ! प्रसिद्ध ॥१॥

ज्ञानास ह्या धरूनि जो करि सर्व सोय

सायुज्यता मिळवुनीममरूप होय ।

नाही तया जनन सृष्टि फिरूनि होता

की दुःखही नच तयास लयास जाता ॥२॥

महद्‍ब्रम्ह ते जाण माझीच माया

तिथे गर्भ मे ठेवितो भक्तराया ।

जगी जन्मती सर्व तेव्हाच भूते

सख्या ! अर्जुना सांगतो मर्म तूते ॥३॥

योनीमध्ये अर्जुना ! सर्व काया

ज्या ज्या येती जन्मुनी त्यांस माया ।

उत्त्पत्तीचे स्थान हे बोलतात

मी द्वीजा पेरिता जाण तात ॥४॥

हे सत्व की रजतमोगुणरूप दोर

होतात्की प्रकृतिपासुनि तीन थोर ।

देही जरी परम अव्यय आणि शुद्ध

पार्था ! तयास तरि हे करतात बद्ध ॥५॥

आहे प्रकाशक तयांतिल एक सत्त्व

निर्दोष ते बहुत की धरि निर्मलत्व ।

ते ज्ञानसंग सुखसंग करूनि जाण

देह्यास बांधित असे विजया ! प्रमाण ॥६॥

प्रेमस्वरूप समजे गुण तो रजाचा

तृष्णेसवे उदय होत असे तयाचा ।

देह्यांस ह्या समज तोचि करून बद्ध

कर्में समग्र करवी विषयार्थ शुद्ध ॥७॥

अज्ञानजन्य समजे तम सर्व तेही

पाडूनि मोह भुलवीत समस्त देही ।

निद्रा प्रमाद घडवूनि सदा विलोकी

की आळस करुनिया करि बद्ध लोकी ॥८॥

सत्त्वामुळे सौख्य मिळे अपार

तैसा रजापासुन कर्मभार ।

वेष्टूनिया ज्ञान सदैव पाहे

निर्मी प्रमादा तम अर्जुना ! हे ॥९॥

आच्छादुनी रज कधी तमही स्वभावे

देहांत सत्त्व सरसावुनि वृद्धि पावे ।

झांकून सत्व तम की रज फार वाढे

लोपून सत्त्व रज वा तम होय गाढे ॥१०॥

देहाचीया इंद्रिये हीच दारे

त्यांच्या योगे ज्ञान सर्वत्र बारे ।

पार्था ! जेव्हा सुप्रकाशे , प्रमाण

सत्त्वाचेही वाढते खास जाण ॥११॥

आरंभ कर्मी बहु लोभ वित्ती

उद्योग की व्याप अपार चित्ती ।

इच्छा करी नित्य अनेक बुद्धि

झाली रजाची तरि जाण वृद्धि ॥१२॥

पार्था ! तमाची जइ होय वृद्धि

टाकूनिया जाय विवेकशुद्धि ।

उद्योग जातो सगळा लयास

दुर्लक्ष्य की मोह जडे मनास ॥१३॥

जरी सत्व वृद्धीमधे देह टाकी ।

तरी शीघ्र तो जातसे दिव्यलोकी ।

जिथे राहती ब्रम्हवेत्ते सदैव

तयाचे तिथे नेतसे त्यास दैव ॥१४॥

किंवा घडे मृत्यु जरी रजांत

जन्मूनि ये तो तरि कर्मठांत ।

जातो तमोवृद्धित जो निघोनी

तो येतसे घेउनि मूढयोनी ॥१५॥

सत्कर्म जे म्हणति सात्विक ते पुण्य

त्याचे पवित्र फल सात्विक अग्रगण्य ।

जे दुःखदायक असे फल ते रजाचे

अज्ञान ते फल असे सगळे तमाचे ॥१६॥

सत्वामुळे ज्ञान मिळे अपार

तैसा रजापासुन लोभ फार ।

पार्था ! तमापासुन मोह येतो

दुर्लक्ष्य अज्ञान अरास देतो ॥१७॥

जाती सदा सात्विक स्वर्गलोकी

की राहतीराजस मृत्युलोकी ।

दुर्वृत्ति जे तामस लोक नीच

त्यांच्या कपाळांत अधोगतीच ॥१८॥

कर्ता गुणावाचुनि अन्य नाही

आत्मा गुनांच्या परता सदाही ।

द्रष्टा असे जैं बघतो विवेके

तेव्हाच तो मत्स्वरुपासि टेके ॥१९॥

ह्या शारिरीक नर तीन गुणांस मागे

टाकूनि जो सतत ह्या जगतांत वागे ।

त्याला जरा जनन मृत्यु न रोग बाधे

अंती तया परम मोक्षहि नित्य लाधे ॥२०॥

अर्जुन --

होतो प्रभो ! त्रिगुण टाकुनि पार अंगे

तल्लक्षणे तरि कशी मज सर्व सांगे ।

तो आचरे जनि कसा करि काय काय

की कोणता नविन योजितसे उपाय ॥२१॥

भगवान --

अज्ञान की ज्ञान असो तरीही

यो कर्म की द्वेष जयास नाही ।

सोडोनि गेली जरि सर्व त्यास

इच्छी न पार्था ! तरिही तयांस ॥२२॥

राहे उदासीन असा मनाने

नोहे कधी चंचल जो गुणाने ।

कार्ये करीती गुण हे सदाही

जाणूनि राहे न करीच काही ॥२३॥

दुःखे सुखे इष्ट अनिष्ट मान ।

की आत्मनिंदा स्तुति ज्या समान ।

जो आत्मनिष्ठा धरि ज्यास भेंडा

वाटे मनी हेम तसाच धोंडा ॥२४॥

हो शत्रु की मित्र जया समान

की तुल्य ज्याला अपमान मान ।

आरंभ ज्याच्या न शिरे मतीत

त्याला गुणाच्या म्हणती अतीत ॥२५॥

भक्तीत जो अव्यभिचार ठेवी

जो भक्तियोगे मज नित्य सेवी ।

लंघूनि तो तीन गुणांस जातो

की ब्रम्हभावासहि पात्र होतो ॥२६॥

ब्रम्हाचा की अक्षयी मोक्ष त्याचा

ज्याची लोकी शाश्वती धर्म त्याचा ।

एकांताचे सौख्य त्याचाहि वांटा

सर्वांचा ह्या जाण बा ! मीच साठा ॥२७॥

चवदावा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP