गीतापद्यमुक्ताहार - अध्याय तिसरा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


अर्जुन --

कर्माहुनी ज्ञान अगाध फार

ऐसा तुझ्या बुद्धिस ये विचार ।

या घोर कर्मी तरि सांग आता

का योजितोसी मज लोकताता ॥१॥

संदिग्ध वाक्ये वदसी दयाळा

बुद्धीस तेणे भ्रममात्र झाला ।

सांगे तरी निश्चय एक साचा

होईल माझ्या बहु जो हिताचा ॥२॥

भगवान --

निष्ठा जगी या असतात दोन

पूर्वीच मी सांगितल्या ह्मणून ।

सांख्यास ती ज्ञान असेच युक्त

योग्यसही कर्म दिसे सयुक्त ॥३॥

कर्मास आरंभ जरी न केला

नैष्कर्म्यता ये न तरी नराला ।

जो स्वस्वकर्मासि उगाच टाकी

पावे तयाला नच सिद्धि लोकी ॥४॥

कोणी न केल्याविण कर्म राहे

विश्रांति कोणा क्षण एक नाही ।

माया गुणांनाच भुलून लोक

ही सर्व कर्में करिती विलोक ॥५॥

कर्मेंद्रिये सकल आवरि अल्पकाले

चित्ती परी विषयचिंतन नित्य चाले ।

तो नेणता विषयलंपट मूढ खास

लोकांतही ह्मणति दांभिक सर्व त्यास ॥६॥

जो अर्जुना नित्य मनेकरून

ह्या इंद्रियांना धरि आवरून ।

निष्काम कर्में करि इंद्रियांही

तो थोर सार्या जगतात पाही ॥७॥

कर्में जगी या करि तू यथेष्ट

त्यागाहुनी कर्म असे वरिष्ठ ।

केल्याविना स्वल्पहि कर्म काही

ही दहेही रक्षण होत नाही ॥८॥

यज्ञार्थाच्या वाचुनी कर्म जे ते

लोकांना ह्या बंधना योग्य होते ।

यज्ञासाठी कर्म आशा फलाची

सोडोनिया तू करे सव्यसाची ॥९॥

यज्ञांसवे सृजुनिया जगतात लोक

पूर्वी तया विधि असे वदला विलोक ।

यज्ञेचि वृद्धि तुमची किति त्यांस वानू

म्या ही तुह्मांस दिधली जणु कामधेनू ॥१०॥

देवांस यज्ञेकरूनी भजावे

प्रसन्न होती तरि ते स्वभावे ।

दोघांसहि ह्यांतच सौख्य होय

कल्याणकारी उघडा उपाय ॥११॥

देवांस यज्ञे जन पूजिताती

तेही तया इच्छित भोग देती ।

खातो न देता उपकारि देवा

कृतघ्न तो चोर खरा ह्मणावा ॥१२॥

जे यज्ञशेष अवघे जन नित्य खाती

ते पापमुक्त नर मोक्षपदासि जाती ।

जो स्वोदरार्थ शिजवून नवान्न खातो

तो पाप खाउनि बळे नरकासि जातो ॥१३॥

प्राणी अनापासुनी जन्मती हे

पर्जन्याने अन्न ते होत आहे ।

यज्ञाने तो सर्व पर्जन्य येतो

तैसा कर्मापासुनी यज्ञ होतो ॥१४॥

वेदामुळे कर्म मनात आण

ते वेद ही अक्षरभूत जाण

ह्याकारणे व्याप्त करी जगाते

यज्ञांत ते ब्रह्म सदा राहते ॥१५॥

जे चालते चक्र परंपरा हे

जो चालवीना जन पाप लाहे ।

तो पतकी जन्म उगाच वाहे

जो इंद्रियांधीन सदैव राहे ॥१६॥

आत्मस्वरूपात निमग्न राहे

जो आत्मलाभांतचि तृप्त आहे ।

आत्म्यात जो मानव तुष्ठ झाला

कर्तव्य काहीच नुरे तयाला ॥१७॥

कर्मामध्ये लाभ काही न मानी

नाही त्याला टाकिता कर्म हानी ।

व्हावा प्राण्यांपासुनी लाभ काही

ऐशी इच्छा लेशहि त्यस नाही ॥१८॥

ह्मणोनि सदा होय निष्काममुक्त

करी कर्म तू जे करायास उक्त ।

करी कर्म निष्काम होऊनि लोकी

तरी पावतो ब्रह्म तो की विलोकी ॥१९॥

कर्में करूनी जनकादि राजे

बा ! पावले सिद्धिस आत्मतेजे ।

सन्मार्ग लोकांस कळावया की

हे कर्म आहे तुज योग्य लोकी ॥२०॥

की श्रेष्ठ जैसा जगतात वागे

त्याच्याच जाती जन सर्व मागे ।

दे तो जसे नेम तया करून

सारे जगी चालति ते धरून ॥२१॥

कर्तव्य हे म्हणुनिया मज आज काही

पार्था ! पहा त्रिभुवनातहि लेश नाही ।

कैशी मिळेल अमकी मज वस्तु नामी

ऐसे नसे तरि सदा करि कर्म हा मी ॥२२॥

पार्था ! प्रयत्न जरि सोडिन मीहि आज

टाकूनिया सकल लौकिक कामकाज ।

तो मार्ग ह्या सुलभ होउनि मानवास

माझ्या समान करितीलच तेहि खास ॥२३॥

केले न मी सकल कर्म मुळीच बा ! रे

हे भ्रष्ट की तरिहि होतिल लोक सारे ।

की कर्म ते करीन मी जरि अन्य धर्में

होतील हे पतित लोक तरीहि कर्में ॥२४॥

अज्ञान आशा धरुनी फलाची

कर्में करीती जन सव्यसाची ।

ज्ञानीहि तैसा करितो स्वभावे

लोकांस की शिक्षण हे मिळावे ॥२५॥

लोकात अज्ञ असती जन कर्मसक्त

तद्बुद्धिभेद करणे न कधीच उक्त ।

तत्वज्ञ युक्त पुरूषे करुनी स्वकर्मे

घ्यावी जनाकडुनी करवून धर्में ॥२६॥

मायागुणांनी सगळी विलोकी

कर्में जगी या घडतात लोकी ।

पोटी अहंकार धरूनि साचा

मी मूढ कर्ता म्हणतो तयांचा ॥२७॥

कर्तृत्व ते न अपुले , गुणकर्मभागा

जाणूनि सुज्ञ विजया ! असतोचि जागा ।

की तो मनात समजे विषयेंद्रिये ही

आपापल्याच विषयी रमतात पाही ॥२८॥

जे मूर्ख ते प्रकृतिच्या भुलुनी गुणांना

होतात लुब्ध सगळे विषयेंद्रियांना ।

अल्पज्ञ मंद जन ते समजोनि त्यांस

जावे कधी न विबुधे खवळवयास ॥२९॥

अध्यात्म चित्ते करुनी स्वकर्में

अर्पीं मला तूहि निरिच्छ धर्में ।

सोडोनि आशा ममताहि दोन्ही

युद्धास हो सिद्ध सुखेंकरोनी ॥३०॥

माझे असे हे मत नित्य जाण

देता न दोषा धरुनी प्रमाण ।

जे एकनिष्ठे जन आचरीती

ते कर्मबंधांतुनि मुक्त होती ॥३१॥

आरोपुनी दोष मतावरी या

स्वीकार याचा करिती न वाया ।

त्या ज्ञान नाही मतिमंद नष्ट

की जाणते मूर्ख महा विशिष्ट ॥३२॥

ज्ञानीही तो पूर्वसंस्कारयोगे

लोकी मायाधीन होऊनि वागे ।

प्राणी मायाधीन सर्वांस ठावे

कैसे तेथे निग्रहाने करावे  ॥३३॥

ठेवीती इंद्रिये ही सुखकर गमते त्यावरी प्रीति मोठी

जे जे वाईट त्याचा सहजचि करिती सर्वदा द्वेष पोटी ।

हा राग द्वेष दोन्ही असति रिपु महा उग्र सर्वांस ठावे

ह्यासाठी सुज्ञ लोकी कधि न वश तया धैर्य टाकूनि व्हावे ॥३४॥

कसाही धर्म होवो कठिणहि अपुला तोच कल्याणकारी

अन्यांचा सेवितांना सुलभ जरि तरीहोतसे नाश भारी ।

गेला स्वप्राण वेळी जरि तरि बरवा आपुल्या धर्मकाजी

बाबा ! धर्मी पराच्या भय बहु असते सत्य हे शूर गाजी  ॥३५॥

अर्जुन --

प्रेरितसे कोण जिवास बापा

हा जो बळाने करवीत पापा ।

चित्तांत इच्छा नसता मुरारी !

हा नेमिलासे जणु कार्यकारी ॥३६॥

भगवान --

हा काम हा क्रोधचि फार दुष्ट

रजोगुणे उद्भवला बलिष्ठ ।

खादाड मोठा बहु पापकारी

हा शत्रु लोकी जननाशकारी ॥३७॥

धुराने जसा अग्नि वेष्टून जातो

मळाने जसा आरसा लिप्त होतो ।

जसे बांधुनी नाळ गर्भास राही

तसा काम हा व्यापितो सर्व काही ॥३८॥

असे झाकिले ज्ञान कामेच साच

सदासर्वदा ज्ञानिया शत्रु हाच ।

कधीही नसे अर्जुना ! तृप्ति ह्याशी

दुजा अग्नि हा कामरूपे अधाशी ॥३९॥

मनोबुद्धि की इंद्रिये हेच साचे

अधिष्ठान बा ! बोलती सर्व त्याचे ।

तयांच्या बळे वेष्टुनी ज्ञान देही

सदा नेउनी घालितो हाच मोही ॥४०॥

अशाकारणे इंद्रिये जिंक आधी

तई अर्जुना ! नाशती ह्या उपाधी ।

सदा ज्ञानविज्ञान नाश्सि मूळ

खणूनेच हा काम काढी समूळ ॥४१॥

स्थूलाहुनी अधिक की सकलेंद्रिये ही

त्या इंद्रिया परिस हे मन थोर पाही ।

त्याही मनाहुनि पहा अति थोर बुद्धि

आत्मा तिच्यापरिस थोर असे प्रसिद्धि ॥४२॥

असा श्रेष्ठ तो बुद्धिने ओळखोनी

धरी त्यास तू अर्जुना ! आवरोनी ।

महा दांडगा काम जो शत्रु बापा !

तया जिंकुनी टाक हे शत्रुतापा ॥४३॥

तिसरा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP