गीतापद्यमुक्ताहार - मंगलाचरण

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


पार्थाला कथिले स्वये भगवते नारायणे त्वत्प्रती

व्यासाने ग्रथिले पुराणमुनिने तूते महाभारती ।

अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी

माते ! त्वत्पदि लीन मीहि भगवद्गीते भवद्वेषिणी ॥१॥

प्रफुल्लपद्माक्ष विशालबुद्धि

साधोनिया भारततैलसिद्धि ।

ज्ञानप्रदीपा धरि विश्वधामी

त्या वंदितो व्यासऋषीधरा मी ॥२॥

उपनिषदततींची कामधेनू पवित्र

मधुर पय तिचे काढिता गोपपुत्र ।

सुमति विजयभोक्ता जाहला वत्सलोभे

अमृत परमगीता दुग्ध हे फार शोभे ॥३॥

झाला जो वसुदेवपुत्र जगती अंकीत सेवका

ज्याने शौर्यबळे क्षणात चाणूरकंसादिका ।

ज्याने तोषविली प्रसादवचने माता स्वये देवकी

वंदी कृष्ण जगद्गुरू सविनये मी तो असा देव की ॥४॥

भीष्म द्रोण तटे , जयद्रथ जली , गांधार पाषाणसे

शल्यग्राहवती , प्रवाह कृप हा , की कर्ण सीमा दिसे ।

अश्वत्थामाविकर्ण नक्र , भवरे दुर्योधनादि वरी

गेले पांडव पार ही रणनदी श्रीकृष्ण अंबेकरी ॥५॥

व्यासाचे वचनारविंद फुलले गीतार्थसद्गंधित

नानासुंदर केसरे हरिकथासंबोधने बोधित ।

होती सज्जनभृंग हर्षित मधु प्राशुनि लोकी पहा

वाटे भारतपद्म हे कलिमलप्रध्वंसकारी महा ॥६॥

करि पटू वचनी दृढ जी मुके , अपद ही चढवी गिरि कौतुके ।

अशि अनंत कृपा नमितो तया , परम सौख्यद माधवराजया ॥७॥

धाता की वरूणेंद्र रुद्र मरुत स्तोत्रे जया बाहती

गाती वेदपदक्रमोपनिषदे ज्या सामवेदी किती ।

योगी ध्यान धरुनि पाहती मनी ज्या नित्य विश्वंभरा

ज्याचा अंत नसे सुरासुरगणा त्या वंदितो ईश्वरा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP