गीतापद्यमुक्ताहार - अध्याय दहावा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


भगवान --

हे अर्जुना ! वचन एक परंतु नामी

सांगेन ऐक तरि तेहि तुला पुन्हा मी ।

माझा सखा म्हणुनि तू प्रियभक्तराज

मी सांगतो तव हितास्तव तेहि आज ॥१॥

देवादिकांस नकळे मम जन्मभाव

लागे कधी मुनिवरांस न मूळठाव ।

की देव सर्व अथवा ऋषिंचेही कूळ

मी आदिकरण तया सकलांस मूळ ॥२॥

मी हा अनादि मजला नच जन्म खास

जाणे मला सकललोकमहेश्वरास ।

निर्मोह तोच मनुजांत सदैव युक्त

होतो समस्त दुरितांतुनि तोच मुक्त ॥३॥

क्षमा शांती चित्ती भय अभय की ज्ञान परम

सुखे किंवा दुःखे सरल मति की इंद्रियदम ।

दिसे जे जे सत्य प्रगट अथवा जन्म बरवा

असंमोहप्राप्ती गहनतर जो नाश अथवा ॥४॥

तुष्टी तसेच तप की समता अहिंसा

की दान मान अपकीर्ति बरी प्रशंसा ।

हे भूतभाव जरि भिन्न अशा प्रकारे

होतात तेहि मजपासूनि जाण सारे ॥५॥

सप्तर्षि माझ्याच मनःप्रभावे

निर्माण झाले प्रथम स्वभावे ।

तैसेच चौघे मनु हेहि पाही

तेथून झाली सगळी प्रजा हे ॥६॥

हा योग माझा अथवा विभूती

जाणेल जो तत्त्व धरूनि चित्ती ।

होईल तो निश्चळ योगपात्र

नाहीच की संशय लेशमात्र ॥७॥

माझ्याच पासून समस्त झाले

माझ्याच योगे जग सर्व चाले ।

ज्ञाते सदा जाणुनि हेच साच

सद्भक्तिभावे भजती मलाच ॥८॥

अर्पूनिया मम पदी निजजीवकृत्य

जे एकमेक करिती उपदेश नित्य ।

घालूनि वेळ सगळा मम कीर्तनात

संतोषवृत्ति धरूनी रमती मनात ॥९॥

माझ्याच ठायी धरूनी मनाते

एकाग्र चित्ते भजतात माते ।

येतील ते सत्वरि मत्पदास

देतो अशी बुद्धिहि मीच त्यास ॥१०॥

द्यावा अनुग्रह बरा म्हणुनी तयांस

तद्बुद्धिमाजि शिरुनी करि नित्य वास ।

मी ज्ञानदीप बहु लावुनि तेजधारी

अज्ञानजन्य तम दूर तदीय सारी ॥११॥

अर्जुन --

अत्यंत पावन असा अज आदिदेव

तू ब्रम्ह तू परम धाम पहा सदैव ।

आहेस तू पुरूष शाश्वत दिव्य लोकी

व्यापूनिया सकल विश्व सदा विलोकी ॥१२॥

ऐसे तुला म्हणति की ऋषि पुण्यवंत

देवर्षिही सकल नारद साधुसंत ।

व्यासादि की असित देवलही सुखाने

तूही तसेच कथिले अपुल्या मुखाने ॥१३॥

कथिशि मजशि जे तू केशवा ! शब्द नित्य

पटति बहु मना ते वाटती सर्व सत्य

अजि तव भगवंता ! रूप जे व्यक्त होते

तिळधरि न कळे ते आसुराते सुराते ॥१४॥

देवाधिदेवा ! जनपालकारे !

भूताधिपा ! सौख्यकरा ! मुरारे ।

जाणावया स्वरूपास हेतू

आत्मप्रकाशे पुरुषोत्तमा ! तू ॥१५॥

विभूतीने ज्या ज्या सकल भरला तूच अससी

जगाते वापोनी असुर सुर लोकांत वससी ।

विभूती त्या सार्‍या सकल तुझिया दिव्य मजला

कृपेने सांगाव्या श्रवण करण्या दास सजला ॥१६॥

कसा येशि योगेश्वरा तू मनात

तुला सांग घ्यावा कसा चिंतनात ।

धरू ध्यान की चित्त हे लावु कामी

स्वरूपी तुझ्या कोणत्या कोणत्या मी ॥१७॥

जनार्दना ! हा तव योग सारा

की जो विभूती भरला पसारा ।

सांगे पुन्हा विस्तृत मन्मताने

तृप्ती नव्हे त्वद्वचनामृताने ॥१८॥

भगवान --

विभूती मला माझिया दिव्य सर्व

कथाया तुला होतसे हर्षपर्व ।

असंख्यात त्या अर्जुना ! अंत नाही

तरी त्यांतुनी मुख्या सांगेन काही ॥१९॥

भूतांचा मी मध्य की आदि अंत

सर्वांनाही व्यापुनी मी अनंत ।

आत्मा जो का अंतरी सर्व भूती

मोठी पार्था ! तीच माझी विभूती ॥२०॥

मी विष्णू आहे अदितीसुतांत

भानू असे मी तरि तेजसांत

वायूंत मी जाण असे मरीची

मी चंद्र तार्‍यांतही सव्यसाची ॥२१॥

वेदांत मी साम असेच जाण

देवांत मी इंद्र धरी प्रमाण ।

की इंद्रियींही मन मीच आहे

चैतन्य भूतांतहि मीच राहे ॥२२॥

रुद्रांत मी शंकर अर्जुना हे !

यक्षांमध्ये मीच कुबेर आहे ।

आहे तसा पावक मी वसूत

मेरू गणावा मज पर्वतात ॥२३॥

असे स्कंद मी जाण सेनापतीत

पुरोहीत जे मोठमोठे तयांत ।

गुरूस्थान वाचस्पती मी सुराते

तडागांमधे अंबुधी जाण माते ॥२४॥

मोठ्या रूषीत विजया भृगु मीच आहे

वाणीमध्ये प्रणव अक्षर मीच पाहे ।

यज्ञामध्ये सकलही जपयज्ञ मीच

की स्थावरांमधि हिमालय मीच उंच ॥२५॥

बा ! मीच तो समज पिंपळ पादपांत

देवर्षि जे सकल नारद मीच त्यांत ।

गंधर्व चित्ररथ जे नृप मी तयांचा

सिद्धांमधे कपिल मी मुनिराज साचा ॥२६॥

उच्चैःश्रवा अश्वगणांत तो मी

क्षीराब्धेच्या पासुनि होय नामी ।

ह्त्तींत ऐरावत रत्न मीच

किंवा नरांमाजि नरेंद्र मीच ॥२७॥

मी आयुधी वज्र कितीक वानू

धेनूत मी सुंदर कामधेनू ।

संतानहेतू धर मीच काम

सर्पी मला वासुकि हेच नाम ॥२८॥

नागांमधे सकल मीच अनंत गाजी

तैसा असे वरुण मी जलजंतुमाजी

मी अर्यमाच पितरांत मनांत आण

की संयम्यांत यमराजहि मीच जाण ॥२९॥

प्रर्‍हाद मी सकळ दैत्यगणात नामी

की चालकांत तरि काल खराखुरा मी ।

मी श्वापदांत सगळ्या तरि सिंह जाण

पक्ष्यांमधे गरुड मी विजया ! प्रमाण ॥३०॥

पवित्रकर जे जगी सकल त्यांत मी मारूत

धनुर्धर तयांत रे ! विजयि राम मी निश्चित ।

जली सकल मत्स्य जे मकर त्यांत हे सद्रथी ! ।

समस्त सरितांमधे विमल मीच भागीरथी ॥३१॥

आद्यंत ह्या मी सगळ्या जगास

की मध्यही मी विजया ! तयास ।

अध्यात्म विद्येत समस्त मीच

सत्तत्त्व वादांतिल तेहि मीच ॥३२॥

मी अक्षरांमाजि अकारवासी

मी द्वंद्व आहे सगळ्या समासी ।

मी अक्षयी काळ असे विधाता

नेमूनि मी कर्मफलासि देता ॥३३॥

मी मृत्यु जो का करि सर्वघात

मी जन्म तो सर्वहि जन्मत्यांत ।

कीर्ति क्षमा श्री स्मृति आणि वाचा

नारीत प्रज्ञा धृति मीच साचा ॥३४॥

आम्नायांत वरिष्ठ साम म्हणती तेथे बृहत्साम मी

गायत्री विजया ! मनात समजे छंदांमधे सर्व मी ।

तैसा मी वर मार्गशीर्ष महिना मासांत सार्‍या जनी

आहे सर्वऋतूत मुख्य मधु मी हे तत्त्व आणी मनी ॥३५॥

बा ! द्यूत आहे कपटांत मीच

की तेजयुक्तांतहितेज मीच ।

व्यापारही मी जय मीच तत्त्व

सत्वस्थ जे त्यांतिल मीच सत्व ॥३६॥

श्रीकृष्ण मी सर्वहि यादवांत

की मीच तो अर्जुन पांडवांत ।

मुनीमध्ये व्यासहि मीच धन्य

की मीच तो शुक्र कवीत मान्य ॥३७॥

बा ! दंडकर्त्यांतहि मीच दड

वीरांमधे नीतिहि मी उदंड ।

गुह्यांमधे मौन सदैव मीच

ज्ञान्यांमधे ज्ञान अखंड मीच ॥३८॥

भूतांस ह्या अखिल बीजहि मीच सत्य

पार्था ! असे समज तूहि मनांत नित्य ।

सोडोनिया मज चराचर भूत पाही

कोणी कधी चुकुनि एकहि होत नाही ॥३९॥

माझ्या विभूती भरल्या अनंत

त्या दिव्य त्यांना विजया ! न अंत ।

विस्तार जो मी कथिला तयांचा

संक्षेप आहे तरि तोहि साचा ॥४०॥

श्रीमंत किंवा बहु भाग्यवंत

किंवा जगी जे जन साधुसंत ।

माझ्याच अंशेकरुनी प्रमाण

निर्माण झाले स्वमनात आण ॥४१॥

सांगो किती ज्ञान असे अपार

ध्यानात घे एकच मुख्य सार ।

म्या एक अंशेकरुनी जगास

ह्या निर्मिले जाण सदैव खास ॥४२॥

दहावा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP