एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एताः संसृतयः पुंसो गुणकर्मनिबन्धनाः ।

येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः ॥३२॥

भक्तियोगेन मन्निष्ठो मद्भावाय प्रपद्यते ।

सत्वादि तिन्ही गुण एथ । केवळ आणि मिश्रित ।

पुरुषातें संसारी करीत । गुणकर्मी निश्चित बांधोनी ॥६॥

त्रिगुणकर्मांस्तव जाण । जीवासी झालें दृढ बंधन ।

जेवीं घटामाजील जीवन । दावी आडकलेपण रविबिंबा ॥७॥

घटीं भरल्या समळ जळ । त्यामाजीं रवि दिसे समळ ।

घटींचें डोलतांचि जळ । कांपे चळचळ रविबिंब ॥८॥

तेवीं त्रिगुणांचें कर्माचरण । शुद्धासी आणी जीवपण ।

तें छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावें ॥९॥

जितावया गुणबंधन । रिघावें सद्गुरुसी शरण ।

तेथ मद्भावें करितां भजन । वाढे सत्वगुण अतिशुद्ध ॥४१०॥

पायीं जडली लोहाची बेडी । ते लोहेंचि लोहार तोडी ।

तेवीं सत्वगुणाचिया वाढी । त्रिगुणांतें तोडी गुरुरावो ॥११॥

तेथ प्रवेशावया गुणातीतीं । अवश्य करावी गुरुभक्ती ।

जे गुरुभजनीं विश्वासती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥१२॥

ज्यासी गुरुचरणीं भगवद्भावो । त्याचे सेवेसी ये ब्रह्मसद्भावो ।

तेथ ब्रह्मसद्भावेंसी पहा हो । मी देवाधिदेवो सबाह्य तिष्ठें ॥१३॥

जो गुरुचरणीं अनन्य शरण । तो सहजें होय ब्रह्मसंपन्न ।

गुरुरुपें करितां माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥१४॥

उद्धवा ऐसें माझें भजन । समूळ जाणशी तूं संपूर्ण ।

यालागीं ’सौम्य’ हें विशेषण । स्वमुखें श्रीकृष्ण संबोधी ।१५॥

भाग्यें नरदेह पावल्या जाण । अवश्य करावें माझें भजन ।

येचि अर्थीचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण प्रतिपादी ॥१६॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP