एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सत्त्वाज्जागरणं विद्याद्रजसा स्वप्नमादिशेत् ।

प्रस्वापं तमसा जन्तोस्तुरीयं त्रिषु संततम् ॥२०॥

सत्त्वगुणाचिये स्थिति । नातळे स्वप्न आणि सुषुप्ती ।

जीवीं सदा नांदे जे जागृती । इंद्रियप्रवृत्ती सावध ॥८१॥

रजोगुणाचेनि आधिक्यें । चित्तवृत्तीतें स्वप्न जिंके ।

जागृति सुषुप्ति दूरी ठाके । बैसला देखे स्वप्नचि ॥८२॥

तमोगुण वाढल्या वाढी । जागृति स्वप्न दूरी दवडी।

मग सुषुप्तीची अतिगाढी । आदळे रोकडी जीवाअंगीं ॥८३॥

त्यासी सभे बैसविल्या पाहे । बोलतां बोलतां डुलकी जाये ।

जेवितांजेवितांही पाहे । झोंपीं जाये कडकडां ॥८४॥

क्षणां जागृति क्षणां सुषुप्ती । क्षणैक स्वप्नाची प्रतीती ।

हे त्रिगुणांची मिश्रित वृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८५॥

जागृति स्वप्न सुषुप्ती । तिहीं अवस्थांतें प्रकाशिती ।

यालागीं ते चौथी । तुरीय म्हणती सज्ञान ॥८६॥

जे जागृतीतें जागवित । जे स्वप्नीं स्वप्नातें नांदवित ।

जे सुषुप्तीतें निजवित । त्यातें तुरीय म्हणत उद्धवा ॥८७॥

जे तिहीं अवस्थांआंत । असोनि नव्हे अवस्थाभूत ।

जे निर्गुण निजनित्य । त्यातेंचि म्हणत तुरीय ॥८८॥

जेवीं पुत्राचेनि जाहलेपणें । पुरुषें पिता नांव पावणें ।

तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय म्हणणें वस्तूसी ॥८९॥

वस्तूवरी अवस्था भासे । भासली अवस्था सवेंचि नासे ।

त्या नाशामाजीं वस्तु न नासे । उरे अविनाशें तुरीय ॥२९०॥

तुरीय त्रिकाळीं संतत । यापरी जाणावें एथ ।

आतां गुणवृद्धिभूमिका प्राप्त । तोही वृत्तांत हरि सांगे ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP