एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः ।

व्यवहारः संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥६॥

गुणसन्निपातप्रकारु । एकचि जो कां अहंकारु ।

तो गुणसंगें त्रिप्रकारु । ऐक विचारु तयाचा ॥१४॥

वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य ।

मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्विक ॥१५॥

मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता ।

मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥१६॥

मी देहधारि सुभट नर । मीचि कर्ता शत्रुसंहार ।

मी सर्वार्थी अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥१७॥

गुणानुसारें ममता जाण । त्रिविधरुपें स्फुरण ।

तेचि अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥१८॥

माझे हृदयींचा भगवंत । तोचि सर्व भूतीं हृदयस्थ ।

भूतें माझींच समस्त । हे ममता शोधित सत्वाची ॥१९॥

भक्त संत साधु सज्जन । तेचि माझे सुहृज्जन ।

ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्त्वस्थ ॥१२०॥

जीवाहून परती । सद्गुरुचरणीं अतिप्रीती ।

ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चितीं सात्विक ॥२१॥

ज्या देवाची उपासकता । शैवी वैष्णवी दीक्षितता ।

देवीं धर्मी पूर्ण ममता । ते जाण सात्विकता सत्वस्थ ॥२२॥

शैवी वैष्णवी धर्मममता । दंभरहित निष्कामता ।

ते ते सात्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ॥२३॥

निवृत्तिमार्ग मानी लटिक । सत्य साचार लौकिक ।

लोकैषणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥२४॥

प्रवृत्तिशास्त्रीं आवडी । लौकिकाची अतिगोडी ।

नामरुपांची उभवी गुढी । हे ममता रोकडी राजस ॥२५॥

स्त्रीपुत्रें माझीं आवश्यक । शरीरसंबंधी आप्त लोक ।

द्रव्याची ममता निष्टंक । हे बुद्धि वोळख राजस ॥२६॥

ज्या देवाची करितां भक्ती । नाम रुप जोडे संपत्ती ।

तीं तीं दैवतें आवडती । हे ममता निश्चितीं राजस ॥२७॥

काम्य कर्मीं आवडी देख । आप्त मानी सकामकर्मक ।

सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता निष्टंक राजस ॥२८॥

हे रजोगुणाची ममता । तुज म्यां सांगीतली तत्वतां ।

तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥२९॥

आपुल्या देहासी जो हूंतूं करी । कां पूर्वपूर्वजांचा वैरी ।

त्यांच्या लेंकरांसीं वैर धरी । हे बुद्धि निष्ठुरी तामस ॥१३०॥

पुढें लेंकुरांचे लेंकुरीं । वृत्तिभूमि जीविकेवरी ।

आडवा येईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥३१॥

ऐसे पूर्वापर माझे वैरी । मी निर्दाळीन संसारीं ।

यालागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस ॥३२॥

अभिचारिकी जे मंत्रज्ञ । ते मानी माझे आप्त स्वजन ।

शाकिनीडाकिनीउपासन । हे ममता संपूर्ण तामसी ॥३३॥

असो बहुसाल व्युत्पत्ती । एकेक गुणीं अनंत शक्ती ।

हे तिन्ही जेथ मिश्र होती । सन्निपातवृत्ती या नांव ॥३४॥

कफ वात आणि पित्त । तिन्ही एकत्र जेथ होत ।

तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥३५॥

संकल्पविकल्पात्मक मन । पंच विषय पंच प्राण ।

दशेंद्रियीं व्यवहार संपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥३६॥

तेंचि सन्निपातनिरुपण । त्रिगुणांचें मिश्रलक्षण ।

स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । मिश्रगुणसन्निपातू ॥३७॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP