एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


मयैंव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥३६॥

संपद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम् ।

जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः ॥

वाढल्या सत्वगुणाचा हरिख । त्यातें निर्दळी शुद्ध सत्वविवेक ।

पाठी विवेकेंसीं सत्व देख । हारपे निःशेख निजात्मरुपीं ॥३६॥;

ऐसे निमाल्या तिनी गुण । निमे कार्य कर्म कारण ।

लिंगदेह नाशे संपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥३७॥

तेव्हां कार्य कर्म कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता ।

ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता । याची वार्ता असेना ॥३८॥

ऐसें हारपल्या जीवपण । स्वयें सहजें निजनिर्गुण ।

होऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहंसोहंपण सांडूनी ॥३९॥

यापरी मद्भक्त जाण । ब्रह्म होती परिपूर्ण ।

तेंचि जाहलेपणाचें लक्षण । श्लोकार्धें श्रीकृष्ण सांगत ॥४४०॥;

प्रपंच एक पूर्वीं होता । हे समूळ मिथ्या वार्ता ।

पुढें होईल मागुता । हेंही सर्वथा असेना ॥४१॥

जैसे आंत बाहेरी भाग । नेणे साखरेचें अंग ।

तैसें सबाह्याभ्यंतर चांग । ब्रह्म निर्व्यंग निजानंदें ॥४२॥

ऐसें पावल्या ब्रह्म परिपूर्ण । साधकासी न ये मरण ।

प्रारब्धें देहीं उरल्या जाण । देहाभिमान बाधीना ॥४३॥

बाह्य न देखे दृश्यदर्शन । अंतरीं नाहीं विषयस्फुरण ।

देहींचें न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नांव ॥४४॥;

बाह्य देखे दृश्यप्रतीती । अंतरीं विषयांची आसक्ती ।

या नांव अज्ञानाची स्थिती । अविद्याशक्ती बाधक ॥४५॥

तें निरसावया अविद्याबंधन । अवश्य करावें माझें भजन ।

हें जाणोनी साधुसज्जन । भक्तीसी प्राण विकिला ॥४६॥

माझिये भक्तीपरती । आणिक नाहीं उत्तम गती ।

तेंही भजन अभेदयुक्तीं । तैं चारी मुक्ती कामार्‍या ॥४७॥

हृदयीं विषयाची विरक्ती । वरी अभेदभावें माझी भक्ती ।

तें भजन अनन्य प्रीतीं । त्याचा मी श्रीपती आज्ञाधार ॥४८॥

भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरुपीं निजभावार्थ ।

येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥४९॥

माझिये भक्तीचेनि नांवें । पशु पक्षी उद्धरावे ।

मा मानवी भजनभावें । म्यां अवश्य न्यावे निजधामा ॥४५०॥

यालागीं सांडोनि व्युत्पत्ती । जाणतीं नेणतीं गा समस्तीं ।

भावें करावी भगवद्भक्ती । तैं निजात्मप्राप्ती अनायासें ॥५१॥;

भावें करितां माझें भजन । स्वयें निर्दळती तिन्ही गुण ।

सहजें प्रकटे निजनिर्गुण । हें सत्य श्रीकृष्ण बोलिला ॥५२॥

जेथ उगवली गुणगुंती । तेथ प्रकटे निजशांती ।

हेंचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥५३॥

यालागीं जेथ भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लाभे वृत्ती ।

सहजें प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वतःसिद्ध ॥५४॥

ते निजभक्ति माझी जननी । ज्या पैठा केलों जनार्दनीं ।

एका जनार्दनचरणीं । मिळोनि मिळणीं भजतचि ॥५५॥

पुढिले अध्यायीं कथा गहन । ऐलउर्वशीउपाख्यान ।

ज्या अध्यायाचें करितां पठण । अगम्यागमनदोष हरती ॥५६॥

ज्या पुरुरव्याची विरक्ती । स्वमुखें वर्णील श्रीपती ।

वैराग्यें निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ॥५७॥

त्या वैराग्याचें निरुपण । अतिगोड निरुपी श्रीकृष्ण ।

श्रोतां कृपा करावी पूर्ण । द्यावें अवधान कथेसी ॥५८॥

जे कथेचेनि अवधानें । दुरितदोष होती दहनें ।

ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणें । होऊनि ठाकणें चिन्मात्र ॥५९॥

एवढया निरुपणाची गोडी । पुढिले अध्यायीं आहे फुडी ।

एका जनार्दनकृपा गाढी । परापरथडीप्रापक ॥४६०॥

भावें धरितां जनार्दनचरण । बाधूं न शके बाधकपण ।

एका जनार्दना शरण । रसाळ निरुपण पुढें आहे ॥४६१॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे

श्रीकृष्णोद्धवसंवादे गुणनिर्गुणनिरुपणं नाम पंचविंशोऽध्यायः ॥२५॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

पंचविसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP