मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
अंगाई गीत

अंगाई गीत

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


जो जो जो जो रे ! ध्रु०

निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा,

निज रे लडिवाळा !

बाळ गुणी, झोप नेलि रे कोणी ?

जो जो जो बाळा ! १

घरटीं ती फांद्यांमधुनी झुलती,

निजले चिउकाउ;

निजवीती झुळका गाउनि गीती;

गाणीं किति गाऊं ? २

हम्मा ही दूदू देउनि पाहीं

निजली गोठ्यांत;

रे छबिल्या, राघूमैना निजल्या

अपुल्या पिंजर्‍यात. ३

या वेळीं निजलीं झाडें वेली;

निजला चांदोबा;

रात्र किती चढली काळी भवतीं

आला बागुलबा ! ४

शुक्ल गडे झालें जिकडे तिकडे;

झोप न तुज बाळा !

खिंदळशी, खुदुखुदु खुदुखुदु हसशी,

एकच हा चाळा ! ५

लडिवाळा, रुणझुण घुंगरवाळा

पायीं वाजविशी,

कशि बाळा, झोप शिवेना डोळां ?

अफु आली तुजशी ! ६

सटवाई षष्ठिदेवि जोखाई,

सांभाळा याला.

न शिवो तें पाप अमंगल भलतें

माझ्या छबिल्याला ! ७

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - चंद्रभागा

राग - सारंग

ठिकाण - अजमेर

दिनांक - २ मे १९२२

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP