मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
हिंदु विधवेचें मन

हिंदु विधवेचें मन

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


सांगु तुम्हांला किती दयाळा ?

न घडे त्याचें नांव कशाला ? ध्रु०

पतित दीन मज पाहुनि दुर्भग

कळवळलें उर, सागर तें मग !

साहसिं सजलां लाथाळुनि जग,

उदारपण का न दिसे मजला ? १

निःस्वार्थाचा कळसचि वाहुनि,

यज्ञिं सुखाची आहुति देउनि,

पापिणिला मज पुसतां विनवुनि,

उत्तर देऊं काय तुम्हांला ? २

"चराचरांचीं मिथुनें जगतीं

सहवासानें" म्हणतां, "जगती"

कळे मलाही, काय परी गति ?

भ्रमण भुतापरि आलें भाला ? ३

नीरस वेलिस फुलें उमलती,

खिन्न नभाला तारे भेटति,

रिक्त सरोवरिं कमळें फुलती "

कां मज कथितां हें विधवेला ? ४

अमरें मजवर दार लोटितां

मर्त्य तुम्ही तें उघडूं झटतां,

सुखमंदिरिं त्या नेण्या झुरतां,

दयाघना' कशि फेडूं ऋणाला ? ५

पतित बहिष्कृत अस्पृश्यापरि

घिरट्या घ्याव्या मीं बाहेरी;

दया करा, जा आंत तुम्ही तरि

घेउनि कुणि अनुरूप सखीला. ६

बहीणा होइन, दासी होइन,

भक्त होइन चरणां पूजिन,

तुमच्या वाटा केशीं झाडिन,

अधिक पत्‍निपणिं काय कृपाळा ? ७

बोल न बोला एकहि यावर,

धैर्याचे ढासळतिल डोंगर,

भलतें जाइल निघोनि उत्तर.

भागिदार नच व्हा नरकाला ! ८

औदार्यास्तव ह्या रात्रंदिन

आळवुनी मी हरिला विनविन,

अभद्र माझ्या मलिन कराहुन

श्रेयस्कर कर देउ तुम्हांला ! ९

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - पादाकुलक

राग - पिलु

ठिकाण - अजमेर

दिनांक - २ एप्रिल १९२२

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP