अभंग - १११ ते १२०
निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.
Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.
१११
देशें काळें वर्तमानें । न धरीं संकोच कांही मनें । मी तो ऐसाचि हें शहाणे । जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥१॥
तंव तो आला अकस्मात । नारदमुनी गात नाचत । वंदूनियां श्रीकृष्णनाथ । कीर्ति विर्णित कृष्णाची ॥२॥
म्हणे उध्दरिलें विमलार्जुन । शापदग्ध हे कुबेरनंदन । भविष्य जाणोनियां दर्शन । घ्यावया तुझें पातलों ॥३॥
परात्पर तूं परत्पर तूं परमानंद । योगी हत्कमळींचा मकरंद । सगुणरुपियां सच्चिदानंद । यशोदेअंकी क्रीडसी ॥४॥
स्तवितां तूतें भागल्या श्रुती । मग त्या ठेलिया निवांती । त्या गापिकारुपें गोकुळा येती । तुजसी अंगसंग करावया ॥५॥
मग नमुनी यशोदेप्रती । म्हणे तूं वों भाग्यवंती । परमात्मा हा विश्रवतोमूर्ती । तुझिये अंकीं विराजला ॥६॥
निळा म्हणे वदोनी ऐसें । नारद गेला निज उददेशें । यशोदा ऐकोनियां निज मानसें । परम संतोष पावली ॥७॥
११२
पुढें गांईची खिल्लारें । मागें गोवळ आपण भारें । मुरलीवादन सप्तस्वरें । करीत चालत आनंदे ॥१॥
पांवयाच्या तलालोरी । डफहुडूक त्या भीतरीं । शंख कहाळा वाजवित कुसरीं । गोवळ नाचती भोंवतें ॥२॥
गाइ| चरती पांगोनी वनीं । मुख संतोष चारा वदनीं । कृष्णा दृष्टीं अवलोकुनी । तृप्त जीवनीं यथाकाळें ॥३॥
शीतळ छाया देखती जेथें । विलासे नाचत ठाकती तेथें । टिपरी रुमाल घेउनी हातें । मोडिती अंगे नानापरी ॥४॥
हुतुतु हमामा विटी दांडू । सुरकठया लगोरिया घेउनी चेंडू । झोंबिया घेऊनि दावती वाडू । आपुलिया निजशक्ति ॥५॥
नाना उमाणीं उगवितीं कोडीं । सांगती काहाण्हीया कडोविकडीं । गाणी गाती अति आवडी । करिती उध्दार रागांचे ॥६॥
निळा म्हणे माध्यान्हकाळीं बैसोनी कळंबावे तळीं । काढिल्या शिदोया माजीं वनमाळी । करिती आरोहणा स्वानंदें ॥७॥
११३
गोवळ देती उष्टावळी । म्हणती गोड हें वनमाळी । घालूनियां श्रीमुख त्या कमळीं । परम संतोषें स्वीकारी ॥१॥
आवडीचें तेचि तें गोड । भाव देखे ज्याचा वाड । त्याचेचि घे येरा निचाड । दांभिका अभिमानायाचें वोसंडी ॥२॥
ऐसा करिती गदारोळ । घालिती येरयेरा मुखीं कवळ । ब्रम्हानंदाचा सुकाळ । हास्यविनोदें जेविती ॥३॥
नाना लावणशाखांच्या परी । नाना पत्रशाखा वाढिल्या वरी । नाना अन्नाअन्नाच्या कुसरी । जेविती मुरारीसमवेंत ॥४॥
म्हणती आजच्या जेवणा । आम्हां श्रीहरी हा पाहुणा । न म्हणे उच्छिष्ट शिळें कोणा । अवघियांचे स्वीकारितु ॥५॥
ऐसें जूउनियां घाले । तंव गाईचे कळप देखिले । पाहती तंव नवल वर्तलें । बुजल्या पळती जीवधाकें ॥६॥
निळा म्हणे उठिला पाळा । अवलोकिती जो अवघे डोळां । तंव त्या देखिल्या ज्वाळा । वणवा जळत चौफेरीं ॥७॥
११४
पळवाया न दिसे मार्ग । पक्षी जळताती भुजंग । श्रवापदांचे कोंडले तुंग । मृग व्याघ्रें कालवती ॥१॥
वृकवराह पंचानन । ससे जंबुक सामर भेवन । रानम्हैसे रोही हरिण । जीव धाकें मिसळति ॥२॥
ज्वाळा लागती आकाशीं । धूम्रें कोंडिले रवि शशी । वृक्ष जळताती तेणें त्यांसी । तडक फुटती सर्वांगी ॥३॥
प्रचंड वाताचिया लोरी । तुटती तेणें गगनोदरी । शिखा आंदोळती अंबरी । तेणें फडत्कार वाजति ॥४॥
देखोनिया भ्याले सकळ । गवगविले अवघे गोंवळ । म्हणति आला अंतकाळ । गाईगोधनांसमवेत ॥५॥
ठिणगिया उडती असंख्यात । इंगळ येऊनी पडती आंत । आतां कैचा गोकुळप्रांत । मार्गचि नाही पळावया ॥६॥
निळा म्हणे घालिती कंठी । येर येरांचिया धांवोनि मिठी । हें देखोनियां तो जगजेठी । म्हणे रे कोणी भेऊं नका ॥७॥
११५
अग्नीची व्हावया शांती । उपाय आहे तुमच्याचि हातीं । लावोनियां बैसा पातीं । डोळेचि झांकुनी बळकट ॥१॥
उघडे ठेवितां चेतले वन्हीं । मग तो नाटोपे आम्हां लागुनी । सांडील अवघीयांसीच जाळुनी । झांका म्हणउनी निज नेत्र ॥२॥
गोवळ म्हणती कैसे डोळे । झांकउनी मारवितोसी रे सकळे । येरु म्हणे तुम्हां हें नकळे । तोटका या काळें ऐसाची ॥३॥
येथें न धरितांचि विश्वास । जळाल अवघेही नि:षेश । ऐसें सांगोनिया त्यांस । डोळे निज करें धरविले ॥४॥
मग आपण वाढोनियां श्रीहरी । जाहला विराटरुपिया गगनावरीं । मुख पसरोनियां श्वासेंची करी । वोढिल्या अग्निज्वाळा ॥५॥
पोटीं घालूनियां दावानळ । जाहला पहिल्याचि ऐसा गोपाळ । हें देखोनी अवघेची गोंवळ । बोटांसंघीं लक्षितां ॥६॥
तयां म्हणे उघडा नेत्र । ऐकोनी बोलती ते सर्वत्र । म्हणती देखिलें हें चरित्र । तूंचि गगनवरी वाढलासी ॥७॥
निजमुखें गिळिलें ज्वाळ । तूंचि तूं काळाचाहि काळ ॥ आजी देखिला तुझा खेळ । आम्हीं आपुल्या निजदृष्टीं ॥८॥
निळा म्हणे बोलोनी ऐसें । लोळतीं पायावरी उल्हासें । मनीं जाणोनियां विश्रवासें । हाचि परमात्मा ईश्वर ॥९॥
११६
नेत्र झांकविले ते हरी । कारण इतुलेंचि अभ्यंतरी । मज विराट झालियावरी । छळतील हे देखतां ॥१॥
तंव तें भावार्थी चोखडे । त्याणीं देखिलें तें निवाडें । मग नाचती कृष्णापुढें । कीर्ति त्याची वर्णित ॥२॥
म्हणति मागेंही याचिपरी । केलीं चरित्रें तुवां हरी । शेषिली पूतना निशाचरी । अघाबकांतें चिरिलें तें ॥३॥
तुझिये अंगीं सर्व कळा । नेतां ब्रम्हायानें आम्हां सकळां । तैसेंचि होऊनियां गोपाळा । दोहीं ठाई रक्षिलें ॥४॥
आजीं कळला तुझा महिमा । नेणतिया गोवळां जी आम्हां । करीं अपराध आमुचें क्षमा । तुज उच्छिष्टें चारिलीं तें ॥५॥
बेटया म्हणोन बोभाइलें । शिव्या देउनी आळविलें । खेळतां डावहि मागितले । भांडण केलें नेणतां तुज ॥६॥
निळा म्हणे सहस्त्रवरी । नमस्कार केले ऐसे हरी । तेणेंचि तोषोनियां उत्तरीं । बोले तुम्ही सखे माझे ॥७॥
११७
म्हणती आजि वांचिलों जीवें । जवळी श्रीहरी होतां सवें । तंव ते गांईचे मेळावें । वाडियाकडें मोहरले ॥१॥
मग ते चालिले गोवर । वाजवीत वादयें खेळत खेळ । शिंगें कहाळा घागरघोळ । चांदिवे ध्वज उभारुनी ॥२॥
ऐशिया परमानंदकल्लोळीं । गाई आलिया वाडिया जवळी । तंव त्या गौळणी सकळी । आलिया दुडिया घेउनी ॥३॥
गौळी वत्सां पाचारिती । गोधना दुहावे ते करिती । गाई सुरवाडें दुभती । वत्सांही पाजिती तृप्तीवरी ॥४॥
संवगडे म्हणती चला घरां । जाऊं आतां शारंगधरा । मग मोहच्छायें मंदिरा । चालले गजरें मिरवत ॥५॥
तंव त्या तलगा गौळणी नारी । नानापरीच्या आरत्या करीं । घेऊनियां आत्मया श्रीहरी । ओवाळिती निजभावें ॥६॥
विचित्र पुष्पांचियां माळा । आवडी घालिती हरीच्या गळां । ऐसे मिरवित आले राउळा । येतां यशोदा देखिलें ॥७॥
तिणें करुनियां अंक्षवाणें । ओवाळिले जिवें मनें । तंव गोवळ बोलति बोलणें । जालें अपूर्व वनीं तें ॥८॥
निळा म्हणे तें ऐकवया । निवाडें बैसली यशोदा माया । गोवळ सांगती लगोनि पाया । थोर कौतुक देखिलें ॥९॥
११८
माते बळिया शिरोमणी । कृष्ण नाटक हा विंदानी । आम्हां जळतजळतां वनीं । येणें रक्षिले निमिषाधें ॥१॥
आम्हां जाळित आला ओणवा । विराटरुपी हा झाला तेव्हां । मुखचि पसरुनीयां अघवा । प्राशन केला दावानळ ॥२॥
आम्हीं देखिलें तें नयनीं । दिव्य रुप याचें अवघ्या जणीं । ऐसें ऐकोनियां ते जननी । परम आश्रचर्यातें पावलीं ॥३॥
घरोघरीं हेचि वार्ता । विस्तारली गोवळ सांगतां । एक म्हणती हो श्रीअनंता छ न म्हणावें मानव यावरी ॥४॥
जे जे याचे अचाट खेळ । देखिले ऐकिले तुम्हीं ते सकळ । कृष्ण हा परमात्मा केवळ । आम्हीं मानुं आपुलाचि ॥५॥
सकळांतरी याचा वास । वसविले ते येणेंचि देश । याविण रिताचि अवकाश । न दिसे कोठेंही धुडितां ॥६॥
निळा म्हणे प्रतीत ऐशी । बाणली गोवळां आदि सकळांसी । मग ते तयातेंचि मानसी । ध्याती पूजिती सर्वदा ॥७॥
११९
येरे दिवशीं घेउनी सवें । गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे । खेळ खेळती विचित्र ॥१॥
म्हणे यारे चेंडूफळी । खेळों अवघे मिळोनी बळी । ऐसें बालोनियां वनमाळीं । कास घालित नेटकी ॥२॥ चें
डू घेऊनियां श्रीहरी । हाणे डाव मागें वरी । कानपिळा मग ते सारी । पाठीवरी बैसोनी ॥३॥
न सोडिचि पायातळीं येतां । मग तो हो कां कोणीहि भलता । म्हणे विचारुनियां तत्वत्तां । खेळा खेळ अवघेही ॥४॥
चिंतूनियां बरव्यापरी । चेंडू टाकिला कंळबावरी । अडकलासा देखोनी हरी । अभ्यंतरीं संतोषला ॥५॥
होतें आघींचि आर्त मनीं । काळया आणावा नाथुनी । मग म्हणे म्हणती गडे । डोहो तळीं वृक्षही अवघड । न धरीं कृष्णा याची चाड । करुं दुसरा नवा घरीं ॥७॥
१२०
तंव त्यां म्हणे रे गडिहो ऐका । उतरुनी हाचि आणूं निका । असेल चपळ गडी जो नेटका । तेणें चढावें वृक्षावरी ॥१॥
तंव ते म्हणती नहो बाहेरी । आम्ही बळकट चढावाया वरी । वृक्षही उंच गगनोदरीं । डोहो भ्यासुर अक्षोभ हा ॥२॥
म्हणे गडीहो तरी तळींचि रहा । आणितों जाऊनि चेंडु पहा । ते म्हणती रे अचपळा रहा । निमित्य आम्हावरी आणूं नको ॥३॥
एका दोन कामीं वांचलासी । तैसेचि येथेंही पाहतोसी । परी हे बुध्दि नव्हे ऐसी वेळा सारखिया नसताती ॥४॥
पाय निसरोनियां जाईल । अथवा खांची उपटी उपटे । हांसे इतरांचे होईल । आपणही जिवें घातावें ॥५॥
ऐसें न करिती शहाणे । विचारुनी पहाती सर्वगुणें । मग हितावह तोचि घरणें । दृढ निश्रचयें मानसीं ॥६॥
निळा म्हणे सांगतां ऐसें । न मानिजे कृष्ण मानसें । मनींचें कार्य जें अनारिसें । तें नेदीचि कळों कोणासी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : August 21, 2026

TOP