अभंग - १३१ ते १४०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


१३१

प्राणीमात्र पर्वतातळीं । राहिले ते निजानंद मेळीं । नित्य हरिकीर्तीची नव्हाळी । श्रवण मनन करिताती ॥१॥

सप्तअहोरात्रीवरि । पर्जन्यवृष्टी केली भारी । विजुवा कडाडिती गगनोदरीं । तेणे  ब्रम्हांड फुटों पाहे ॥२॥

मुसळधाराखळखळाटें । नदियां पूर वाहति नेटें । पवन वातें झडझडाटें । पाषाण जाति उडोनिया ॥३॥

परि तया पर्वतातळीं । पर्जन्य वात नपवेचि बळी । हिंपुटी होऊनियां जवळीं । गेलि इद्रां सांगती ॥४॥

सप्त अहोरात्रे पाडिलों वरी । खाणोनि सांडिली ते नगरी । खडका वांचूनियां दुसरी परी । नुरोचि मृत्तिका ऐसें केलें ॥५॥

ऐकोनियां हरिखले सुरपती । बहूत मानवाला त्याचे शक्ति । परी गोकुळींच्या लोकांप्रती । नाहींची आढळला पर्जन्य वात ॥६॥

निळा म्हणे हरी दादुला । सकळिकां म्हणे बाहेरीं चला । अवघा मेघ ओसरोनि गेला । उन्हें पडिली खडखडाट ॥७॥

१३२

लोक सकळहि बाहेरी येती । तंव निर्मळ गगन शुध्द गभस्ती । नवा चारा धेनुवा चरती । आणि दुभती यथेष्ट ॥१॥

तंव गडी अवघे मस्तकावरी । धरुनियां होते गिरी । गर्वारुढ ते अंतरीं । आम्ही पर्वत उचलिला ॥२॥

कृष्ण येथें टाळाटाळी । करुनियां म्हणावी आपणा बळी । ओझीं आमुचिया निढळीं । आपण मोकळा फुल झळका ॥३॥

कृष्णें जाणोनी मनोगत । म्हणे रे गडीहो काढा हात । येरु म्हणती तूंचि त्वरित । जांई येथूनी वेगळा ॥४॥

ओझें आमुचीया निढळीं । उगीचि टेकिली तुवं आंगोळी । यश घेऊनियां वनमाळी । वाउगाचि मिरविसी आम्हांत ॥५॥

मग त्यातें म्हणे श्रीहरी । मस्तक तुम्हीं काढा तरी । सोडुनी पाहतां नखाचि वरी । धरिला देखती सकळही ॥६॥

मग म्हणती उतरां आतां । एकल्या नुरवेचि तत्त्वतां । चौफेरी मस्तकीं धरितां । कृष्णें काढली आंगोळी ॥७॥

तंव ते दडपिली त्यांच्या भारें । मेलों मेलों म्हणती पोरें । कृष्ण म्हणे तुम्ही बळिये कीं रे । धरा उचलुनि निज शक्ती ॥८॥

निळा म्हणे पुरुषोत्तमा नेणवे म्हणती तुझा महिमा । धांव धांव रे मेघ:श्यामा । आम्हां वांचवी खचता हा ॥९॥

१३३

मग तो उतरुनियां गिरी । आले गोकुळा भीतरीं । तंव धावोनियां नरनारी । लोटांगणे घालिती ॥१॥

मेघीं सांगता सूरपती । आनंदला होता चित्तीं । तोचि आला गोकुळाप्रती । निज नयनीं पहावया ॥२॥

तंव तों गोंवळ पहिलियाची ऐसे । केळवती का नोवरे जैसे । गाई चौताळताती हर्षे । तैसेचि गोकुळींहिं स्वानंदें । गौळी गौळणी मिरवती ॥४॥

इंद्र देखोनियां ते  दृष्टी । विस्मयापन्न झाला पोटीं । म्हणे  संवर्तकाचिये वृष्टी । पुढें कैसी वांचली हीं ॥५॥

तस्मात परमात्मा हा श्रीहरी । कृष्णवेषें महीवरी । अवतरला जाणेनियां अंतरीं । स्तवन करी निज मूखें ॥६॥

निळा म्हणे शरणांगत । म्हणवी घाली दंडवत । त्राहें त्राहें म्यां महिमा नेणत । केला अपराध क्षमा कीजे ॥७॥

१३४

इंद्र म्हणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा । कळसूत्रीं तें विश्रवलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥१॥

निर्मिला तुवां चतुरानन । आपुलिये नाभीं देऊनि स्थान । तुझिया सत्ता माही गगन । पंचमहाभूतें वाढलीं ॥२॥

तूं या आदिचिही आदी । विश्रवीं विश्रवात्मा तूं त्रिशुध्दी । तुजवांचूनियां मना बुध्दी । कैचें बोधव्य मंतव्य ॥३॥

तुवां अंतरिक्षी धरिलें गगन । तुझिया आज्ञे विचरे पवन ॥ तु‍झिया तेजें प्रकाशे रवी । तुझिया आज्ञे विचरे पवन । तुझिया सत्ता देदीप्यमान । सर्वदा हुताशन नवेचि ॥४॥

तुझिया तेजें प्रकाशें रवी । तुझिया क्षमा अचळ पृथ्वी ॥ तुझिया द्रावें सदा टवटवी । आपांपती गंगोदकां ॥५॥

समर्थां समर्थ तूं ईश्रवर । होउनी नंदाचा कुमर । केला पवाडा हा थोर । गोवर्धन उचलिला ॥६॥

आम्हीं तुझीं म्हण्यागतें । महिमा नेणोनियां येथें । पाठविलें जे पर्जन्यातें । त्या अपराधा क्षमा कीजे ॥७॥

कोणा नेणवे तुझी लीला । देवत्रयां तूं आगळा ॥ निजानंदाचा पुतळा । सगुणरुपीया श्रीहरी ॥ निळा म्हणे ऐशी वाडमय पूजा । करुनियां कृष्णा विराटध्वजा । आज्ञा वेउनियां अमरराजा । गेला आपुलिया भुवनसी ॥९॥

१३५

यावरी कंस भयाभीत । कृष्णभयें उव्दिग्नचित्त । बैसला असतां निजमंदिरांत । तंव आला अकस्मात रजक बळिया ॥१॥

वस्त्रें आणिलीं घोवट । उंच धोऊनियां चोखट ॥ म्हणे राया राय तूं वरिष्ठ । शोभती विशिष्ट तुज अंगीं ॥२॥

मग ते लेवूं जों बैसला । तंव तो झगा पोकळ झाला । म्हणे थोर हा बेतियला । व्यर्थचि नासिला ये शिवणारें ॥३॥

राजा हांसूनि बोले त्यांसी । शिवणारें काय करील यासी । ॥३॥

राजा हांसूनि बोले त्यांसी । शिवणारे काय करील यासी । चिंतें व्यापिलें शरीरासी । तेणें हें कृशत्वासीं पावलें ॥४॥

गोकुळीं नंदाचिये घरीं । बाळ वाडे आमुचा वैरी । पहा तो भाचाचि निर्धारी । परी मुळावरी आमुचिया ॥५॥

तया वधलियावांचून निश्रचळ नव्हे आमुचें मन । रजक बळिया तें ऐकोन । म्हणे न करी चिंता महाराजा ॥६॥

निळा म्हणे गर्वीरुढ । मंद बुध्दी जल्पवाड । म्हणे मी वारीन हें सांकड । एकदां डोळां मल दावीं ॥७॥

१३६

जरी तो येईल येथें हरी । तरी मी सहसा विलंब न करीं । धोपटूनिया शिळेवरी । तेच क्षणी टाकीन ॥१॥

काळासम तुल्य माझें बळ । काय तें करील कृष्ण गोवळ । लागों नेदितां एकही पळ । निमिषाधेंचि उपटीन ॥२॥

गोकुळाचिये वाटेवरी । धुणें माझें निंरतरी । परि आलाचि पाहिजे वैरी । तुझा आणि माझाही ॥३॥

मागें पाठविले असुर । मायावी ते निशाचर । ते काय  बापुडे किंकर । माझिये बळ शक्तीपुढें ॥४॥

राया येथें एक वेळां । आणवीं पां तया गोवळा । मग तूं कौतुक पाहें डोळां । मृत्युपंथे लावीन ॥५॥

आम्ही तुझे अंगलग । सेवक आणि बळिये चांग । रोखूनियां असों मार्ग । माझे धुणें त्याचि पंथे ॥६॥

निळा म्हणे ऐशा वचनीं । राजा संतोषविला मनीं । मग तो उचितातें घेउनीं । आला आपुलिया मंदिरां ॥७॥

१३७

राजा म्हणे रजकहि गाठी । आहेत पांचशे आणिक जेठी । मातंगकुळवई ही उग्रदृष्टी । सोडितां वरी झगटेल ॥१॥

परी तो येथें येईल कैसा । आलिया कदाचित करील वळसा । ऐसें विचारी जंव मानसा । तंव प्रधानहि पातले ॥२॥

राजा तयातें विचारी आणवितां कैसे येथें हरी । तंव ते म्हणती युक्ती माझारीं । हेंचि उत्तम दिसतसे ॥३॥

येथें आपुले सैन्यक । अपार काळाहुनी अधिक् । कृष्ण्‍ा येईल एकला एक । चारी अर्भकें घेउनी ॥४॥

तयां मागें कैची सेना । गोवळ गाईचा राखणा । करिती घरींचि चार नाना । येथें काय बळ त्यांचें ॥५॥

येतांचि आपुले शिवेआंत । शस्त्रपाणी करिती घात । ऐसाचि साधावा कार्यार्थ । विचार हाचि मानिला ॥६॥

निळा म्हणे आणिती काळ । घरां प्रार्थूनियां ते सकळ । ओढवलिया निदान वेळ । अघटितचि सहज घडे ॥७॥

१३८

म्हणती पाठवावा अक्रूर । कृष्णीं त्याचा मित्राचार । त्याचें नुलंघी तो उत्तर । सहसा प्राण गेलिया ॥१॥

देऊनियां उत्तम रथ । मूळ पाठवावा तो त्वरित । सांगावें भेटीसी उदयत । मामा तुझे कंसरावो ॥२॥

अक्रूरा सांगावा हाचि अर्थ । जरी तूं नाणिसी कृष्ण येथ । तरी मम हस्तें तुझा घात । होईल जाण तेंच क्षणीं ॥३॥

रायें अक्रर पाचारिला । रथ देऊनियां गौरविला । म्हणे जाऊनियां आतां वहिला । भाचा आणीं भेटीसी ॥४॥

तयालागीं प्राण फुटे । घटिकां पळहि निमिष न लोटे । नणिता लावीन मृत्युवाटें । तुज हें निर्धारें जाण पां ॥५॥

आजींचि घेऊनियां तूं येसी । जरी कां आपुल्या निजमित्रासी । तरि देऊनियां निज भाग्यासी । गौरवीन तुज बहुमानें ॥६॥

निळा म्हणे अक्रूर मनीं । म्हणे हा पापी पापियाहुनी । आणवितो कृष्ण निदानीं । आपुलिया प्राणा घातावया ॥७॥

१३९

कृष्ण बळियामाजि बलिष्ट । कृष्ण अवघियां देवां श्रेष्ठ । तैसाचि बळिरामही उध्दट । भरील घोट देखतां ॥१॥

एक नवनागसहस्त्रबळीं । दुजा तंव ते कल्पांत शुळी । येतांचि येथें निमिष मेळीं । करितील संहार कंसाचा ॥२॥

कृष्ण परमात्मा ईश्वर । अनंतकोटीब्रम्हांडधर । मायानियंता परात्पर । तया हा पामर आणवितो ॥३॥

पतंगा वडवानळेसीं खेळणें । दर्दुर शेंषातें गिळूं म्हणे । उलुकें रवितें संघटणें । केंवि जीवे प्राणी वांचिजेल ॥४॥

तैसिचि परी झाली यातें । जेंवि खदयोत झगटूं पाहे रवितें । अरण्यमृगें शार्दूलातें । कैसेनि भेटीसी आणिजे ॥५॥

परी येथें प्रारब्धचि बळी । घडवील घडावें तें तत्काळीं । पहा त्या हिरण्यकश्यपें आपुलियेचि नळीं । बसविला नृसिंह पाचारुनी ॥६॥

निळा म्हणे होणार होईल । बुध्दीही तैसीच प्रवर्तवील । क्रियाहि शरीरीं उमटेल । भोगणें भोगवील प्राचीन ॥७॥

१४०

आठऊनियां श्रीकृष्णचरण । अक्ररें रायातें पुसोन । चालिला रथावरी बैसोन । मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥

गोकुळा पाठविला अक्रूर । परि कंसामनी दचक थोर । तेणें पाचारुनियां धनुर्धर । चौकिये बाहेर बसविले ॥२॥

म्हणे येतां देखोनियां कृष्णासी । युध्द करावें अति आवेशीं द उतरुनी त्याचिया मस्तकासी । मजपाशीं आणावें ॥३॥

रजका सांगे निजमुखें । कृष्णा येतांचि धोपटीं सुखें । तुझिये पाठिसि हे आसिकें । सावध ठेविले धनुर्धर ॥४॥

मग बोलाऊनियां मल्लजेठी । बैसविले ते दारवंटी । मातला हस्ती त्याचिये पुष्टीं । कुळवई ठेवियेला ॥५॥

तया भोंवते आणिक कुंजर । उभे केले ते दळभार । तंव इकडे जाऊनियां अक्रूर । भेटला नंद यशोदेसी ॥६॥

निळा म्हणे पुसे कृष्णा । तंव ते म्हणतीं गेला राना । मग रथ तेथेंचि ठेऊनी जाणा । चालिला दर्शना कृष्णाचिया ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP