अभंग - ५१ ते ६०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


५१

मग म्हणती अवघ्या जणी धांवोनि पहागे आणा पाणी । डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥

पहाती तंव तो उत्तम अंगे । जेंवि का उठियलें अनंगे । नभापरी अलिप्त संगे । काय करिती अघात त्या ॥२॥

नानापरिंची अक्षवाणें । करी यशोदा वांदी दानें ।  यथाविधी व्दिजभोजनें । केलें जिताणें श्रीहरीचें ॥३॥

म्हणती नवीची रिठियाची माळा । घातली होती त्वां याचिया गळां । ते काय झाली गे याची वेळा । तेंचि अरिष्ट यासी होतें ॥४॥

ऐसा झाला घोषगजर । ऐकोनियां तो कंसासुर । म्हणे बोळविला महावीर । केला चकाचुर रिठाही ॥५॥

करितां उपाय न चले यासी । कंस भयाभीत मानसीं । म्हणे काळ हा जन्मला आम्हांसी । करील संहार काळाचा ॥६॥

निळा म्हणे न चले युक्ती । यापुढें कापटया समाप्ती । सर्वांतरवासी हा श्रीपती । कर्मफळदाता निजसत्तें ॥७॥

५२

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां । वधूनि येईल जो बाळका । त्यासी अर्ध राज्याची टीका । दूईन छत्र सिंहासन ॥१॥

मग तृणावर्त धेनुकासुर । मग केशिया शकटासुर । अघासुर सर्पविखार । चालिले भार दैत्यांचे ॥२॥

कृष्णें ते ते संहारिलें । नवल अदभुतचि वो केलें । निळा म्हणे आहे वर्णिलें । श्रीवेदव्यासें पुराणीं ॥३॥

५३

आतां पुढे बाळचरित्र । कृष्णक्रिडा अति विचित्र । ऐकवां श्रवणी होती पवित्र । गातां वक्र शुचिभूंत ॥१॥

एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता । कैवल्यपदप्राप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥

श्रीकृष्णाची हे बाळलीळा । अदभूत सुखाचा सोहळा । वेधूनियां नरनारी बाळा । गाई आणि गावळा ब्रम्हप्राप्ती ॥३॥

ब्रम्हदिक दर्शना येती । सकळही देव आणि सुरपती । गगनी विमानें वाटती । सुमने वरुषति सुरवर ॥४॥

श्रीकृष्णाचें नामकरण । विधिविधानें व्दिजभोजन । नंदयशोदे उल्हास पूर्ण । सुवासिनी ब्राम्हण सर्व जना ॥५॥

मंगळघोषाचिया गजरीं । निशाणें दुमदुमलिया भेरी । टाळ मृदंग झणत्कारी । नाचती वैष्णव पदें गाती ॥६॥

निळा म्हणे नगरवासी । प्रांतवासी देशवासी । आले व्दिपांतरनिवासी । कृष्ण सोहभ पहावया ॥७॥

५४

रन्तखचित पालख । सूर्या ऐसा निर्भियेला चोख । निरालंबी गोऊनि देख । मोहें उत्साह मांडियेला ॥१॥

महर्षि ऋषिहि सकळिक । आले पहावया कवतुक । अवलोकूनियां यदुनायक । करिती प्राणें कुरवंडिया ॥२॥

आले गौळियांचे भार । नाना याति नारीनर । नानापरीचे शृंगार । लेणीं लुगडीं मिरविती ॥३॥

वाणें घेऊनियां नारी । रत्नजडितें तबकें करी । देवांगना तैसियापरी । कृष्णवैभवें मडिता ॥४॥

पालखीं घालितां चक्रपाणी । नाना आल्हादें गाती गाणी । नाना स्वरें उमटल्या ध्वनी । उठती गगनीं पडिसाद ते ॥५॥

नामें ठेवूनियां पाचारिती । गोविंदा गोपाला यदुपति । सच्चिदानंदा आनंदमूर्ती । जगपति श्रीपति अमरपिता ॥६॥

अच्युता अनंता अपारा । देवकिनंदना दगदोध्दारा । मुनिमनमाहना सर्वेश्रवरा । आत्मया श्रीवरा सर्वगता ॥७॥

सुंदरा राजीवलोचना । जगदादीशा पंकजवदना । योगीमानसमनोरंजना । सुखनिधाना सुखमूर्ती ॥८॥

मधुमाधवा मधुसूदना । त्रिविक्रमा वामना संकर्षणा । मुकुंदा मंदारा शेषश्यना । राजीवाक्षा जनार्दना श्रीकृष्णा ॥९॥

निळा म्हणे ऐशिया नामें । गर्जती गौळणी सप्रेमा प्रेमें । ऐकोनियां ते पुरुषोत्तमें । केलिया संभ्रमे अति वाड ॥१०॥

५५

पुढे ऋषिश्रवरांची मांदी । बैसली होती सभासंधी । तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषी गर्जिन्नले ॥१॥

मंगळतु-यांचे घोषगजर । दुंदभी वाजविती सुरवर । नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥२॥

निगम येउनि मूर्तिमंत । श्रीकृष्णाची स्तवनें करीत ।  कामधेनुही क्षीरे स्त्रवत । तुप्ति सकळांसी दयावया ॥३॥

देवगुरु जे बृहस्पती । तेहि़ अर्शिर्वादें कृष्णातें स्तविती । शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ति । कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥४॥

उमा रमा रेणुका सती । लोपामुद्रा अरुंधती । अक्षवाणें घेऊनिया हाती । आत्मया ओवाळिती श्रीकृष्णा ॥५॥

अनसूर्या परम प्रतिव्रता । अत्रिदेवाची जे कांता । जिचिये उदरी श्रीअवधूता । दत्तात्रय जन्म महामूनी ॥६॥

निळा म्हणे तेहि येउनी । हरातें वोसंगा घेउनी । आशिर्वादें अमृतवचनीं । गौरविती यशोदें ॥७॥

५६

ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्ष होऊनियां निर्भर । नंदयशोदेचें वारंवार वर्णिती भाग्य निजमुर्खे ॥१॥

न संपडे जो योगसाधने । नाना तपें वेदाध्ययने । तो हा सगुणरुपें नारायण । क्रिडा करी याच्या घरीं ॥२॥

यावरी गौळणीही अति सुंदरा । कडिये घेउनी शारंगधरा । नेती उल्हासें निजमंदिरा । चुंबने देऊनि खेळविती ॥३॥

म्हणति कृष्णा रामा मेघ:शामा । योगी मुनिजन मनोरमा । सुलभ झालासी आजि तूं आम्हां । आवडी ऐसा वर्तसी ॥४॥

पूर्वाजिंतें उत्तमें होती । सकृतें त्यांचिया फळनिष्पत्ती । मोडोनी आलिया तुझीं हू मूर्ती । डोळेभरी अवलोकूं ॥५॥

ऐशिया उत्साहे त्या प्रमदा । नेती खेळविती गोविंदा । मग पावोनियां परमानंदा । शयनीं पर्यंकीं निजविती ॥६॥

निळा म्हणे सुख विश्रांति । पावल्या ऐशिया सत्संगती । पुढील कथा अपूर्व ख्याती बाळपणींचीं हरिकीर्ती ॥७॥

५७

कंसा मली भय संचारू । झाला तेणें चिंतातूर । बैसोनियां करी विचारू । कृष्ण्‍वधार्थ् प्रयोग ॥१॥

तें ऐकोनी उत्पात वार्ता । गोकुळींचिया लोकों समस्ता । धैर्य नुपजेचि म्हणती आर्ता । जावें पळोनी दूरदेशा ॥२॥

तंव नंद म्हणे ऐका मात । जावोनी वसो दरकुटी आत । साडुनिया जाता आपुला प्रांण । घरे दारे नुरतील ॥३॥

विचार मानला सकळांसी । गेली पळोनी दरकुटीयेसी । गांवी नाही मुंगी माशी । ऐसे ओस पडियले ॥४॥

उष्णा वारियांचे आघात । साउली न मिळेचि त्या वनांत । तंव देखिल्या अकस्मात । माईक गाडा श्‍कटासूर ॥५॥

यशोदा देखेनियां ते वेळी बाळकृष्ण निजवी गाडियातळीं तंव हा लाघवी वनमाळी । पद घातेंचि उडविला ॥६॥

तेणें तो आक्रंदला । घोष्‍ दणणिला । जाउनी मथुरेमाजि पडिला । कंस म्हणेरे शकटहि गाढा । आजि लाविला मृत्यूपंथे ॥८॥

निळा म्हणे गौळिये म्हणती । गाडा उडाला कैसिया रीती । तळीं होता हा श्रीपती । थेर भाग्यें वांचला ॥९॥

५८

मग ओवाळूनियां मृतिका । घेतलें उचलुनि यदुनायका । यशोदा म्हणे हे बाळका । वरूनि अरिष्ट चुकलें ॥१॥

नव्हे शकटे तो मायावी दैत्य । आला होता करावया घात । कृष्ण ताडिला तो यथार्थ । पूतनेऐशी परी केली ॥२॥

तेणें दिधली आरोळी । न्या हा उठे तो अंतराळी । परी नाही भयाची काजळी । सावध वनमाळी सर्व गुणें ॥३॥

ऐसे क्रमिले कांही दिवस । तंव रायें पाठविलें लोकांस । मग येऊनि गोकुळास । पुनिरपि वस्ती राहिले ॥४॥

कृष्ण खेळतां आंगणी । गडी म्हणती सारंगपाणी । हाराळी नूतन हे कापुनी । चारू वत्सासि आपुलिया ॥५॥

तंव तो तृणावृत दैत्य । हाराळी रुपें होता तेथ । इच्छूनियां कृष्णघात । तंव तो हरीनें ओळखिला ॥६॥

म्हणे पळारे तुम्ही अवघे गडे । येथें दिसत असें हें कुडें । रहा अवघे मागलिकडे । आपण्‍ पुढें संचारला ॥७॥

तेणें देखतांचि श्रीहरी । वदनें काढिली तृणांकुरी । शते सहस्त्र लक्षवरी । रुपें धरुनिया ठाकला ॥८॥

भयानकें अति विक्राळें । दाढा दंत दीर्घ शिसाळे । आवाळुवे चाटीत आवेश बळें । कृष्णा अंगी झगटला ॥९॥

निळा म्हणे कवळूनिया मुष्टी । मुख्य तृणासुराची झोटी । उपटूनियां भूमी नेहटीं । शतचूर्ण करुनि सांडिला ॥१०॥

५९

ऐसे वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हां सारंगपाणी । कंसे ऐकानिया श्रवणी । परम खेद मानिजे ॥१॥

कृष्णजवळी होती मुलें । तिहीं तें आश्चर्य देखिलें । वडिलां सांगती नवल झालें । कृष्णासान्निध तंव ते । तेणें अति लाववें कवतुकें । भूमीसी आपटूनि मारिलें ॥३॥

त्यांची शरीरें पर्वतराशी । पडिल्या आहेत गांवापाशीं । चला दाखवितों तुम्हासीं । म्हणवूनि सकळिकांसी हाकारिलें ॥४॥

तिहीं ते देखोनियां दिठी । भयें कांपती आपुल्या पोटीं । म्हणती अतुर्बळी हा जगजेठी । लेंकरुं कैसा म्हणावा ॥५॥

नंदहि विस्मयापत्र चितीं । म्हणे हे कोठूनि असूर येती । याचिया हाते पावेनि शांती । जाताती मुक्तिपदातें ॥६॥

निळा म्हणे गांवींचे लोक । करिती अवघेंचि कौतुक । परी कंसा अधिकाधिक् । क्षतें उमळती दु:खाची ॥७॥

६०

यावरी कोणे ऐके दिवशी । कृष्णें घेउनी सौंगडियांशी । आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारें देखिलीं ॥१॥

तयामाजी अंति चोखडें । वत्स गाईचे ते पाडे । त्याचि ऐसें धरुनी रुपडें ।  वत्सासुर तेथ उभा ॥२॥

कृष्ण म्हणेरे हो गडिही ऐका । एक एक वत्स धरा नेटका । माही धरितों म्हणवेनि तंव कां । थांबला वत्सासुरावरी ॥३॥

तंव तो मायावी असुर । शिंगे पसरुनि पातला समोर । मागें करित  लताप्रहार । आडवाचि उडे हाणवया ॥४॥

गौळी करीताती हाहाकार । मारिला नंदकुमर । अचपळ हा नव्हेचि स्थिर । कासया वत्स धरुं गेला ॥५॥

याचिये वदनीं निघती ज्वाळ । नासापुटींहुनी धूम्रकल्लोळ । बरें नव्हे हा पातला काळ । प्राण घ्यावया प्रगटला ॥६॥

निळा म्हणे धरिला कर्णी । मुरगाळूनि पाडिला धरणीं । मुष्टीघातेंचि चक्रपाणी । मोक्षपदातें पाठवी त्या ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP