अभंग - ८१ ते ९०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


८१

हे देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥

आम्ही देखिलें दुरोनी । होतो डोंगरीं बसोनी । तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥

येरु म्हणे तो असुर । तुम्हां भासला होता ढोर । कंसरायाचा तो हेर । जाता वधुनी सकळांते ॥३॥

ऐसा जाणोनियां निभ्रांता । शांति पावविला तो आतां । तुम्ही भयातें न धरितां । सुखे विचारा मत्संगें ॥४॥

माझिया भजनीं जे राहाती । त्यांचिया विघ्नाची शांती । करुनियां सुखविश्रांती । तया अर्पी सर्व सिध्दी ॥५॥

ऐसें ऐकोनियां हरिवचन । संतोषले सकळी जन । मग नमस्कारुनियां उभय चरण । गोकुळांप्रती चालिले ॥६॥

निळा म्हणे सांगती वडिलां । वनीं वर्तमान जो देखिला । धेनकासुर तो निपातिला । आजी कृष्णें युध्दसंधी ॥७॥

८२

पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन । मतिविस्ताराचे महिमान स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥

माभळभट गेलीया वरी । कागासुर तो माव करी । येऊनियां गोकुळा भीतरी । बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥

म्हणे फोडूनियां दोन्ही डोळे । बाळका करीन मी आंधळे । चुंचचिघातें कंठनाळें । फोडीन वृक्षस्थळीं बैसोनी ॥३॥

काय करील तें लेकरुं । मनुष्य मानवी ते इतरु । आम्हां दैत्यांचा आहारु । कैसेनि येती ते मजपुढें ॥४॥

कंसाचिये आज्ञे भेणें । करितो मनुष्यांची संरक्षणें । आतां तों प्रेरिलेंसे तेणें । आड आलिया निवटीन ॥५॥

आलिया त्याचिया कैवारा । आकळूं झकें मी इंद्रादिसुरां । मज कोपलिया कृतातवीरा । कोण सामोरा येऊं शके ॥६॥

निळा म्हणे ऐशिया मदें । मातला मनेशींचि अनुवादें । कंसा तोषवीन आनंदे । प्रतीक्षा करी कृष्णाची ॥७॥

८३

ऐसें जाणोनियां श्रीहरि । पालखी निजविल्या रुदन करी । न राहे   अंकीही क्षणभरी । निवितां शेजारी तैसाची ॥१॥

काय करुं गे यशोदा म्हणे । कां हे करितीहे रुदनें । दिठावलें माझें तान्हें । निंबलोण उतरी तया ॥२॥

तरी न राहे रुदतां । अधिक् अधिक् आक्रंदतां । यशोदा म्हणे बाहेरी आतां । नेऊं तरी कोणाकडे ॥३॥

मग घेऊनियां कडियेवरी । काग दाविला निंबाबरी । तया देखोनियां हास्य करी । मग ते सुंदरी हरिखली ॥४॥

म्हणे निजऊनियां येथें । करीन कामकाज ऐसें । विचारुनियां चित्तें । म्हणे कागातें अवलोकीं ॥५॥

ऐशापरी निजविला । क्षण एक काजकामीं गेला । तंव काग तेथूनियां उठविला । झडपूं आला गोविंदा ॥६॥

देखोनी यशोदा घाबरी । हाहाकार केला इतरीं । निळा म्हणे तो असूरी हरीचीवरी झेपावला ॥७॥

८४

रुप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक् । पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण व्दिनेत्र ॥१॥

क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं । येरें पक्ष धरिलें करीं । उपटूनियां सांडी पृथ्वीवरी । आपार वातें उसळलें ॥२॥

लोक मिळाले भोवतें । परीं भिताती देखोनियां त्यातें । मग धरुनियां चंचूतें दोन्ही फाळी करुं पाहे ॥३॥

अनंत हस्तांचा श्रीधर । काय ते काउळे किंकर । परी तो मायावी असूर । खग वोडणेंसी ठाकला ॥४॥

कृष्णें लत्ताप्रहारें त्यांसी । पाडियलें तोंडघसी । धरुनीयां निजकेशीं । आपणासीं ओढियेला ॥५॥

दक्षिणकरें मुष्ठीप्रहरीं । हाणितलें त्या शिरावर मस्तक फुटतां मेंदूवरी । शोणित वाहे भडभडां ॥६॥

निळा म्हणे दीर्घपापी । कागरुपिया अति विकल्पी । परी हा परमात्मा पुण्यप्रतापी । मोक्षपदासी पाठविलां ॥७॥

८५

मग धांवोनियां यशोदा । हदयी आळंगी गोविंदा । बारे तूंतें अरिष्टेंचि सदा । जैं पासुनि जन्मलासी ॥१॥

प्रथम पूतनेचा घात । दुजा भटाचा विपरीतार्थ । तिजा कागाचा हा अनर्थ । आम्हीं देखिला समस्ती ॥२॥

यावरी काय काय होईल । नकळे आम्हांते तें पुढील । मागें शकटाचेंहि नवल । मारिलेचि होतें तुज कृष्णा ॥३॥

कैसें रासचि पुसती । नानापरींचे उत्पात येती । काय करुं रे श्रीपती । कैसा वांचसील काय जाण ॥४॥

किती चिंता करुं खेद । मज हें न देखवती प्रमाद । तंव गगनवाणीचे शब्द । ऐकती झाली निज कर्णी ॥५॥

परमात्मा हा पूर्ण अवतार । उतरावया धराभार । तुझियें उदरींचा कुमर । निवटील असुर अपरिमित ॥६॥

जे जे पापी अतुर्बळी । आहेत हे भूमंडळी । तितुकियांसिहि मांडुनी कळी । पाठविल त्या यमपंथें ॥७॥

निळा म्हणे ऐकोनि कानीं । यशोदा संतोषली मनीं । टाळी पिटिली सकळही जनीं । थोर आश्चर्य वाटलें ॥८॥

८६

अवघे करुनि जयजयकार । हषें झाले सुखनिर्भर । म्हणती आतां वारंवार । भय संकोचि न धरावा ॥१॥

तंव यशोदा म्हणे पूर्वीही ऐसें । गर्गाचायें कथिलें विन्यासें । राशिनक्षत्राचेनियां मिसे । उदंड भाषार्थ सांगितला ॥२॥

पुढें वधील कंसासुरा । सोडवील हा मातापितरां । मथुरेसी उग्रसेना नृपवरा । भद्र सिंहासनी बैसवील ॥३॥

करील धर्मांचे पाळण । सकळ पांडवांचे संरक्षण । भीमकीचेंही पाणिग्रहण । करील अरिर्वारां मर्दुनी ॥४॥

वधूनियां भोमासुरा । सोळा सहस्त्र अंत:पुरा । प्रणूनियां हा एकसरा । पुत्रपौत्रीं नांदेल ॥५॥

कौरवां वधील पांडवाहातें । राज्यीं स्थापील हा धर्मातें । उतरुनी भूभारातें । अवनी उत्फुल्लित करील ॥६॥

गोकुळींचियां नगरनारी । रंजवील हा नानापरी । गोवळ गाईचा मनोहरी । क्रीडा करील हा कौतुकें ॥७॥

अतुर्बळिया नारायणु । याशोदे तुझा हा नंदनु । नाटकी कौसाल कान्हु । करील पवाडे अगणित ॥८॥

निळा म्हणे ते प्रसंगीं । स्मरलें अवघें यशोदेलागीं । मग नाना वस्तु पदार्थ चांगी । वरुनी सांडी श्रीकृष्णा ॥९॥

८७

यावरी बगासुराची कथा । विचित्र आहे ते ऐकतां । कृष्णकरें पावोनि घाता । महामुक्तीतें वरील ॥१॥

मग तो बगरुपीया असुर । ध्यानस्थ यमुनातीरी स्थीर । झांकूनियां उभय नेत्र ।  एकाचि पायावरी उभा ॥२॥

कृष्ण घातावरी चित्त मनीं चिुंतूनिया तिष्ठत । म्हणे केव्हां देखेन तो येथ । येतां खेळत जवळी कैं ॥३॥

बाळलीलें येतांचि जवळी । गटकाळीन जेवीं मांसळी । हे जाणोनियां वनामाळी । आला खेळींमेळीं गडियांसवें ॥४॥

तंव तो पक्षिया देखिला कैसा । राजहेस कां सरोवरीचा जैसा । शोभयमान निश्रचळ ऐसा । लेंकरें म्हणती चला धरुं ॥५॥

कृष्ण म्हणे रे पक्षी क्रूर । नका जाऊं त्या समोर । मत्स्याही महा निष्ठूर । पापकर्मा दुरात्मा ॥६॥

तुम्ही राहा एकीकडे । मागेंचि लपोनियां गडे । जाऊनि मी पाहतों पुढें । उघडितो नेत्र कीं नाही ॥७॥

पहा लपत लपतचि जातों । आणी देईल धरुं तरी आणितों । परी तुम्ही करा जें सांगतों । दुरीचि असा पैलाडी ॥८॥

तंव पालवथाचे अवघक लोक । पाहाती कृष्णाचें कौतुक । म्हणत नंदाचा हा बाळक । पहारे कैसा पिलंगतो ॥९॥

निळा म्हणे जैसा चित्ता हरणी देखोनियां तत्वता । सुरके भूमिची आतौता । तैसाचि हाही वेग करी ॥१०॥

८८

त्याचिपरि हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी  । चालतू उदगाचिया परी । तो असुरी लक्षित ॥१॥

येतां देखोनियां कृष्णासी । दैत्य हारीखला मानसीं । म्हणे साधूनियां निजकार्यांसी । जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥२॥

ऐसें विचारुनियां मानसीं ।  पक्ष झाडी अति अवेशीं । म्हणे कंसाचिया पुण्यराशी । झालिया सन्मुख या काळें ॥३॥

आतां गिळुनियां नंदकुमारा । खोवीन मस्तकी यशाचा तुरा । मात जाणवीन रोश्रवरा । मथुरेशर जाऊनि उल्हासें ॥४॥

म्हणोनी आतां राहें सुखी । माझिया बळें तूं इहलोकीं । तोषवीन नृपति पुण्यलोकीं । आम्हां पाळक दैत्याचा ॥५॥

परी हा मृत्यूचि आला हें नेणतु । वृथाचि मनोरथ वाढवितु । आपआपणासीची श्रलाघवितु । महा मूर्ख तो पापराशी ॥६॥

मग अति आवेशें धांविला । कृष्णा झगटावया पातला । तंव तो तेणें आसूडिला । तोंडघशीं पडिला चरणातळीं ॥७॥

पक्ष धरुनियां  दोन्ही हातें । उपटूनियां सांडिले परौतें । लोला करुनियां गोपीनाथें । चरणघातें तुडविला ॥८॥

ऐशियापरी घाबरा केला । चुंचीत धरुनियां घोळसिला । म्हणे मायाविया दाखवीं आला । मायाप्रतापु या काळें ॥९॥

बहुत दिवस मामाचें अन्न्‍ा । भक्षिलें झाडा तो घेईन । आजि मृत्युपंथे पाठवीन । गौरव करुन ताडनाचा ॥१०॥

ऐसें बोलोनियां श्रीहरि । सोडिला तंव तो दीर्घ स्वरीं । गर्जोनियां कृष्णावरी । अति तवकें उठिला ॥११॥

आधींच तंव तो निशाचर । रुप धरुनियां भयंकर । कृष्णा गिळावया सत्वर । मुख पसरुनी धंविला ॥१२॥

हें देखोलि लोक म्हणती । गिळिला गिळिला रे श्रीपती । वेगीं जाऊनियां नंदाप्रती । मात जाणवा दसवंतिये ॥१३॥

ऐसा झाला हाहाकार । कृष्णें तेचि क्षणीं अति सत्वर । ‍िफोडूनि जाभाडें दंतावळि चुर । करुनियां पाडिला ॥१४॥

मग रगडूनियां पादघातें । मुरगाळिली मुंडी होतें । दैत्य त्यागिता निज देहातें । शब्द केला आचाट ॥१५॥

म्हणे धांव धांव कंसासुरा । तुझिये काजीं वेंचलों पुरा । निळा म्हणे मग शारंगधरा । वरुनी प्राणा ओंवाळिलें ॥१६॥

८९

या परी करुनियां त्याची गती । निजधामा पाठविला श्रीपती । लोकही विस्मय पावोनि चित्तीं । न कळे म्हणती हरिलीळा ॥१॥

हाचि ईशाचाही ईश । जगाचा आदी हा जगदीश । येथें दिसतो । मानुशवेश । परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥२॥

याचिया चरित्राची नवाई । एकेक सांगावी किती काई । अगाधपणेंचि बाळत्वही । प्रथ्मचि पूतना शोषिली ॥३॥

Hinduism

पाठीं माभळभटासी पिढेदान । शकट पादघतेंचि उडवून । यावरी कागबग निर्दाळून । रिठासुरा चावून सांडियेला ॥४॥

अघासुरही वनीं चिरिला । वत्सासुर तो धोपटिला । धेनुक प्राणेंसी बिघडविला । तृणावर्त लाविला मृत्युपंथे ॥५॥

ऐशी दिव्य चरित्राचिया खाणी । उघडिलिया येणें बाळपणीं । पुढें जे करील तेंही नयनीं । पाहों आइकों निवाडे ॥६॥

निळा म्हणे ऐसे जन । गोकुळींचे विस्मयापत्र । पुढें केशियाचें आख्यान । तेंही सकळिक आइका ॥७॥

९०

अश्वरुपिया केसासूर । ठाणमाण अति सुंदर । जैसा उच्चैश्रवा रहंवर । देवलोकीं इंद्राचा ॥१॥

शोभिवंत तयाहुनी आगळा । असुई अवलोकितां डोळा । पाहावाचि ऐसा वेळोवेळां । आठवों नेदी आणि ॥२॥

शोधितांही सप्तव्दीपांतरु । नाढळेचि कोठें ऐसा वारु । सुंदराहुनी अति सुंदरु । रुपें नागरु भुलवणा ॥३॥

दांडिमान कळाव्या डोळे । कर्ण जैसे केतकिदळें । गुडघे सुंब मेजागळे । सर्वहि शृंगारमंडीत ॥४॥

खोगिर जीन लगाम तोंडी । इलाखे रिकेबियांची जोडी । गाशा वागदोर दुमाचिया दांडी ।  खुरुस नवरत्न खचितांचे ॥५॥

तंव संवगडियांसी खेळत । आले अकस्मात गोपिनाथ् । वारु देखोनि गडिया म्हणत । पैल पहारे विचित्र तेजी ॥६॥

आम्हा राये कंसासुरें । बैसावया अति आदरें । धडिलें हें वहान खरें । अनुवादिजे गडियासी ॥७॥

आतां यावरी घालुनि स्वारी । पाहो बैसोनियां दुरी । बैसोनि पहावें गोपुरावरी । ऐसें सांगोनियां श्रीहरी । मग सांवरी आपणिया ॥९॥

आइता साज आहे वरी । रुपाकृत ही साजिरी । मायावी हा जाणेनियां हरी । कास कसिली बळकट ॥१०॥

निळा म्हणे मनोगत । आर्त केशियाचे उत्कंठित । वरी बैसलिया कृष्णनाथ । नेईन दिगांता उडवुनी ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP