अभंग ३४९ - ३५०
डॉ. दा. बा. भिंगारकर यांनी संपादित केलेले संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग.
३४९
आलीया जन्मासी शरण जावें विठोबासी ॥१॥
तेणें सुफळ संसार हो का नारी अथवा नर ॥२॥
व्रत करा एकादशी नाम कथा अहर्निशी ॥३॥
हो पापांचे निर्मूळ वंशी सुखाचे सोहाळे ॥४॥
न लगे योग याग तपें तुम्हां सांगितलें सोपें ॥५॥
हेचि तुम्हांसी विनंती । म्हणे दासी धरा चित्तीं ॥६॥
३५०
आलें व्रत एकादशी। जनी गेली राउळासी ॥१॥
बुक्का घेऊनिया माळा पाणी भरोनी भोपळा ॥२॥
येतां दुरोनी देखिली। अवघी घामाघूम झाली ॥३॥
होईल देवासी विटाळ जाली फराळाची वेळ ॥४॥
फुलें–माळा विखुरली । तुंब्याची ते गत जाली ॥५॥
देहीं प्रेमाचें भरीत देवा जोडी दोन्ही हात ॥६॥
नेत्रीं असूचिया धारा केला संकल्प सारंगधरा ॥७॥
जनी बाहेर घातली धोर गहिवरें दाटली ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : August 10, 2026

TOP