संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.

संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.


१०१

संत साधु जन जाणती या खुणा ।
एरवी पीसुणा काये सांगो ॥१॥
ऐसीया उपकाराच्या रासी । तुझ्या तू जाणसी ।
एन्हवी जनासी काये ठावे ॥२॥
बोधला म्हणे या खुणा ठाउक्या भगतासी ।
धन्ये घेती त्यासी पांडुरंगु ॥३॥

१०२

संता वाचुनिया सुख कोठे नाही ।
अमृत ज्याचे पायी नित्य वसे ॥१॥
संताचे संगती होय मोक्ष गती ।
नको बा संगती दुर्जनांची ॥२॥
दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय ।
तेथे कैची सोय तारावया ॥३॥
बोधला म्हणे सत्य हे त्रिवाचा ।
नको अभक्तांचा संग देवा ॥४॥

१०३

संसार दुःखमूळ हे तव भव सबळ ।
यालागी भुलो नको । चित्ती धरा गोपाळ ॥१॥
आरे सावध होई आता । तोडी भवमूळ व्यथा ।
सद्गुरूसी शरण जाई । कृपा करील रे आता ॥२॥
आरे माया कठिन भारी। घाली दुःखाचे घरी ।
दुःख हे सोसवेना । चढे विखाची लहरी ॥३॥
अरे सुख जरी भोगिसील तरी ।
जवळिच आहे विश्वास न धरिसी वरि सांगोन काये ॥४॥
सार्थक करिसील सांगतो वचन ।
दृढ चित्ती धरी तुज विठोबाची जाण ॥५॥
बोधला म्हणे जना का रे हित विचाराना ।
विठाई माऊली देते प्रेमाचा पान्हा ॥६॥

१०४

संसार सागरी बुडलो श्रीहरि ।
तुजविण कोण तारी देवराया ॥१॥
पंढरीचे पारी भवकर्म निवारी ।
शरण जावे हरि पांडुरंगा ॥२॥
तो सकळांचा पाळिता आमचा माता पिता ।
म्हणोनि पंढरीनाथा शरण रिघा ॥३॥
बोधला म्हणे हरिस शरण जाता भये ।
नाही सर्वथा कळिकाळाचे ॥४॥

१०५

सासुची सुन एक पाणिया गेली ।
पाणी फोडुनी तिने घागर आणली ॥१॥
भ्रतार मारुन भावासव गेली ।
बापाची बाइल पुत्रे नेली ॥२॥
ऐक रे खेळिया नवल जाले ।
नाही ते डोळा देखिले रे ॥३॥
बोधला म्हणे गुरुखुण ओळखिले ।
देखोनि जवळ जाले रे खेळिया ॥४॥

१०६

सांडुनी संगत चाललीस पुढे ।
नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥
सांडुनी प्रपंच झालीस निराळी ।
आवडे वनमाळी द्वारकेचा ॥२॥
साधु आणि संतांची घडलीसी सेवा ।
आवडती देवा वैकुंठीचा ॥३॥
बोधला म्हणे भक्ती हरिची करिसी ।
तेणेच पावशी मोक्षपद ॥४॥

१०७

संसारासाठी निघाली हा हा ।
तमाशा पाहिला मोठा रे ॥१॥
होता संचिताचा विक्रा केला ।
सर्वही आटला पोटा रे ॥२॥
असत्याचे माप टाकुनी देई ।
सांडी हरी विक्राई खोटी रे ॥३॥
सत्याची तागडी धरून हाती ।
बसी मुक्ती चौहाटा हे ॥४॥
नामाचे केणे भरी तोचि भला ।
अभागी चुकला करंटा रे ॥५॥
विठोबा पाहुणा जोड झाली बरी ।
मोकळ्या चारी वाटा रे ॥६॥
बोधला म्हणे आम्हा थोर लाभ झाला ।
हाकारिल्या चारी पेठा रे ॥७॥

१०८

सांगड बांधारे भक्तीची ।
रघुनाथ नामाची ॥१॥
लाटा उसळती विषयाच्या ।
भवत्या प्रपंचाच्या ॥२॥
माणकोजी बोधला बोधला ।
हरिनामी रंगला ॥३॥

१०९

हरिभक्त समुदाव आनंदे क्रीडा करी ।
निघाले पंढरी पहावया ॥१॥
दिंडीया पताका टाळांचे गजर ।
वैष्णवांचा भारू क्रीडा करी ॥२॥
धन्ये भीमातिर गर्जते अंबर।
आम्हा हरिभक्ता माहेर जोडी जाली ॥३॥
धन्य ते पंढरी अवघ्या नरनारी ।
उभा विटेवरी पांडुरंग ॥४॥  
धन्य ते पंढरी मोक्षाची नगरी ।
बोधला सुखभरी आनंदरूप ॥५॥

११०

ही तव निर्लज्ज निष्ठुर ।
यासी नाही आरपार ॥१॥
याची संगती धरुन काये ।
आपण जैसे करीत आहे ॥२॥
जैसा संगीताचा गुण ।
याने व्यापिले त्रिभुवन ॥३॥
बोधला म्हणे न साहे दुजियाचा वारा ।
धरी संतांचा आसरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP