अभंग ३१ ते ४०

संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.


३१

घ्यावो सुखाचे फुकाचे ।
नाम माझ्या विठोबाचे ॥१॥
घेता बहुत आहे सोपे ।
भरा आपुलाली मापे ॥२॥
येथे दुजा नाही कोणी ।
घेता बहुत आहे धनी ॥३॥
न लगे हे जकाती ।
छाया आपुलाले हाती ॥४॥
बोधला म्हणे वर्णन केली ।
जनी ठेवी धरा आली ॥५॥

३२

चरणी घागऱ्या घुळ घुळर ।
त्यापरि वाकि वाजति मंजुळ रे ॥१॥
कैश्या गोपिका शोभति दोहि भागि रे ।
आपण कृष्ण खेळता कैसा रंगि रे ॥२॥
कैसा गोपाळास देतो शोभा रे।
बोधला म्हणे हा उभा भीमातिरी ।
कैसा सवंगड्या वाटितो सिदोरी रे ॥३॥

३३

चलो रे प्राणि मन राम सुलावू ।
राम रे ऐक राम विना कुछ पाऊ ॥१॥
किनका बेटा किनकी बेटी ।
ऐक राम बिन फजिती झुटी ॥२॥
किनका बित किनका गात ।
ऐक राम बिना कछु पाना गत ॥३॥
किनक्या गाया किनक्या म्हैसी ।
एक राम बिना हे महिर सोपरदिसे ॥४॥
किनकी छेत्री किनकी घोर ।
ऐक राम बिना सब झुटा पसार ॥५॥
कहे बोधला ये राम है सखा ।
राम बिना सब जग परिखा ॥६॥

३४

चालता पंढरीची वाट ।
पाप पळती हातोहात ॥१॥
मिळाला वैष्णवाचा भार ।
आनंदे करिती जयजयकार ॥२॥
लोळणि घालुनिया पायावरि ।
फुका मोक्ष देतो हरि ॥३॥
बोधला म्हणे सत्य जाणा ।
बाप पंढरीचा राणा ॥४॥

३५

चालता पंढरीची वाट ।
पुण्ये जोडली अनंत कोटी ॥१॥
मग पावलिया पंढरीसी ।
अनंत कोटे पुण्यरासी ॥२॥
देता हरिनामाची हाक ।
महा पातके घेती धाक ॥३॥
हाती वाजलिया टाळी ।
रंगी नाचतो वनमाळी ॥४॥
बोधला म्हणे आनंद जाला ।
विठोबा आपोआप आला ॥५॥

३६

चंद्र चकोरांचा । पाळिता तयाचा ।
तैसा देव आमचा पांडुरंग ॥१॥
माऊली बालका घडिघडी पाहे देखा ।
तैसा आमचा सखा पांडुरंग ॥२॥
सकळ आमचा भार चालवितो दातार ।
काये उपकार सांगो आता ॥३॥
बोधला म्हणे देवा तुज मग नायक आहे ।
जन्मोजन्मी पाय दावी मज ॥४॥

३७

जगा सुख भोगणे आहे ।
सेवा विठोबाचे पाय ॥१॥
शुध्द करा तुमचे मन ।
लावा विठोबासी ध्यान ॥२॥
दुष्टबुध्दी दुर करा ।
तोडा अविद्येचा थारा ॥३॥
निवळ करा अंतःकरण ।
तुम्हा जवळी नारायण ॥४॥
बोधला म्हणे भाव धरा ।
तारु निर्वाणीचा खरा ॥५॥

३८

जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा ।
पतीत केशवा जन्मा आलो ॥१॥
सदाचा अवगुणी नावडे जनासी ।
तरी तुवा हृषीकेशी आंगीकारिले ॥२॥
अनंतकोटी आमच्या पातकांसी रासी ।
त्या घातलिया पोटासी पांडुरंगा ॥३॥
माता पितियाची उपमा तुझे देता ।
लाज माझीया चित्ता वाटताहे ॥४॥
पीतीयाचा पुत्र अपराध करिता ।
गणती नको दाऊ आमुख आम्हा ॥५॥
ऐसीयाची उपमा तुजलागी न सहे ।
तुजवाचुनी कोण आहे थोर देवा ॥६॥
बोधला म्हणे देवा तुवा जगी उध्दारीले ।
पतीत पावन जैसे केले नाम साचे ॥७॥

३९

जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी ।
त्याचि तो धावणि केली बापा ॥१॥
गजेंद्र जडजीव स्मरला तुझे नाव ।
ऐकोनिया धाव घेतली कैसी ॥२॥
भक्ताचा भाव देखोनि पंढरिरावो ।
करितसे उपाव नाना परि ॥३॥
बोधला म्हणे देव भावाचा भोक्ता ।
येन्हवी सर्वथा नावडे काही ॥४॥

४०

जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ ।
करितसे सांभाळ रात्री दिवस ॥१॥
तरि तू आमचा मातापिता ।
सोयरा सर्वथा निवारिली वेथा जन्मांतरिची ॥२॥
फेडियेले रिण तोडियेले हिण ।
कैसी मोहियेले मन पांडुरंगा ॥३॥
अनंत कोटी आमच्या पातकाच्या रासि ।
त्या तु हृषीकेशी दुर केल्या ॥४॥
नाही विचारिले दोष आमचे काही ।
बांधलेस पायी बोधला म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP