अभंग ८१ ते ९०

संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.


८१

येई गा बापा हरि तू बा कृपानिधी ।
दिनालागी आधी सांभाळावे ॥१॥
आले म्हणुनी कृपादृष्टी पाही ।
उचलूनि घेई ये कडी बापा ॥२॥
तूंचि आमची माता तूंचि आमचा पिता ।
तुजविण सर्वथा नेणे काही ॥३॥
बोधला म्हणे देवा मी तुझा दिन ।
माझा अभिमान आहे तुज ॥४॥

८२

राम माझा बाप । राम माझी माये ।
राम निजसोय दाखविली ॥१॥
राम माझ भाव। राम माझी बहिण ।
राम अंत:करणी । सदा वाये ॥२॥
माये आणी बाप । भाऊ या बहिणी ।
गोवियेले यांनी मायाजाळी ॥३॥
कोण्ही न विचारी । माझे काही हित ।
भुलविले चित्त नानापरी ॥४॥
बापे पांडुरंगे कैसी कृपा केली ।
त्याणे माझी केली काढाकाढी ॥५॥
बोधला म्हणे देवा । मी तुझे अनाथ ।
उध्दरी पतित पडिलो द्वारी ॥६॥

८३

राम हृदयी आठवावा ।
आवडी प्रीतीने गावा ॥१॥
तोडी अविद्या समुळ ।
सुख होईल प्रबळ ॥२॥
पाहता संसार हाचि सार ।
याणे उतरु पैलपार ॥३॥
नलगे करणे सायास ।
हाचि सोपा उपदेश ॥४॥
बोधला म्हणे दृढ धरा ।
तारु निर्वाणीचा खरा ॥५॥

८४

रामकृष्णहरि मुकुंद मुरारी ।
नाम हे गोजिरी साज तुज ॥१॥
भव मूळ छेदक पंढरीनायेक ।
देतो प्रेमसुख भक्तालागी ॥२॥
जिवीचि जीवनकळा आठवी वेळोवेळा ।
केधवा देखेन डोळा आत्माराम ॥३॥
बोधला म्हणे देवा कळली तुझी लीळा ।
व्यापक गोपाळा खेळसील ॥४॥

८५

राम नांदतो सर्वांच्या अंतरी ।
बाहेर मी तरी तोचि एक ॥१॥
प्रकृतीच्या मुळे झाकुळला पाही ।
तेणे तुम्हा काई न दिसे ॥२॥
दर्पणीचा मळ काढोनि टाकिले ।
तेणे दाखविले रुप तुझे ॥३॥
देहीचा मळ काढोनि सांडी ।
राम तेथे मांडी जगदरुप ॥४॥
मग जे इच्छीसी ते तु फळ पावशी ।
कल्पतरु तुजपाशी जवळी आहे ॥५॥
कल्पियले फळ नित्य देत आहे ।
सत्य आपुले पाहे जतन करी ॥६॥
सत्यासी साहाय भगवंत आहे ।
कामधेनु पाहे दुधे तेथे ॥७॥
बोधला म्हणे सत्य सांगतो वचन ।
वाहतसे आण विठोबाची ॥८॥

८६

वरिले उपरि उभे राहुन हरि ।
वेणु वाजवी नाना परि रे कान्हया ॥१॥
पवयाचा नाद गोपिंकाचे कानी ।
तयामाजी धन्य रखमाई रे कान्हया ॥२॥
प्रती आगळी तरीच जवळी ।
करी धरिली गोपाळी रे कान्हया ॥३॥
भावार्थ मोठा तरीच वाटा ।
अर्धांगी शोभे रखमाई रे कान्हया ॥४॥
सकळा मिळोनि प्रीतिया लाविती ।
रखुमाईचा पती रे कान्हया ॥५॥
अवघी मिळेनी बेदाद झाला ।
रखुमाईने अंती नेला रे कान्हया ॥६॥
साही आती अठरा चारी ह्या भांडती ।
न कळे तयाची कोण गती रे कान्हा ॥७॥
बोधला म्हणे रखुमाई ।
कृपाळु जाली आम्हा पाही रे कान्हया ॥८॥

८७

वरिले माळी एक बहुधा व्याली ।
फळलिया विण पाच पिळती सजाकी ॥१॥
ते मुखविण दुध प्याली रे ।
पायाविण वापरली रे ।
ते दावियाविण बांधली रे ॥२॥
बोधला म्हणे गुरुखुणे ओळखिली ।
ते संतांचे वाडी कोंडिली रे ॥३॥

८८

वर्षाचा दिन आनंद झाला ।
आनंदाचे सुख संतमेळा मिळाला ॥१॥
वर्षाचा सण आम्हा नित्य दिवाळी ।
भावे भक्त ओवाळी साधुसंत ॥२॥
सेवा मुख आम्हा नित्य ते भोजनी ।
आम्ही तुष्ट मनी जेविता सदा ॥३॥
बोधला म्हणे आम्हा जाहला निरोप ।
पंढरपूरी आहे आमुचा मायबाप ॥४॥

८९

वासना बड़ी छिनाल । फिरती चारोराज ।
मेरी बात सुनती नहि । बहुत किये हैरान ॥१॥
एक दिन मै पडि हात। दीओ पेडु परळात ।
शरण आयी पेट मे । निकली दाढी पकडी हात ॥२॥
बिगिटिगिना खेलुंगी सुनोतु मारी बात ।
धती हमारा खुसी हुआ बडी किये शामत ॥३॥
कहे बोधला रजात लब दिये हमार हात ॥४॥

९०

व्यापक हा हृषिकेशी । आहे तुम्हा पाशी ।
विश्वास मानसी धरा थोर ॥१॥
चालविता बोलविता । सकळ त्याची सत्ता ।
त्या वाचुनी कर्ता नाही कोण्ही ॥२॥
खास सुत्रधारी । खेळविता दोरी ।
नाचवी नानापरि । बाहुलिया ॥३॥
बोधला म्हणे मीपण सांडा जाण ।
कर्ता नारायण पांडुरंग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP