अभंग ११ ते २०
संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.
संत माणकोजी बोधले अभंग – ११
आमच्या संसाराचा घेतला असे भार।
स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥१॥
तुझिया उपकाराच्या जाल्या बहुत रासी ।
त्या तुझ्या तू जाणसी कोणा सांगो ॥२॥
त्रिभुवनी एक दाता तूचि गा समर्था ।
निवरिली व्यथा संसाराची ॥३॥
ऐसा आम्हा दिना का केला अंगिकार ।
तू आमचे माहेर पांडुरंगा ॥४॥
तू आमचा माता पिता सोयरा इष्ट बंधू ।
तुजसि समंधू आमचा देवा ॥५॥
बोधला म्हणे तुज वाचुनी नेणे काही ।
चित्त तुझे पायीही बैसलेसे ॥६॥
संत माणकोजी बोधले अभंग – १२
आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे ।
तुजवांचुनी दुजे नाही कोण्ही ॥१॥
ऐसा करुणानिधी आणिक नाही कोण्ही ।
तु जनक जननी मायेबाप ॥२॥
कृपेचा कोवळा दीन दयानिधी ।
मज येऊनिया आधी सांभाळावे ॥३॥
रात्री दिवस आस लागली मनास ।
भेटी सावकाश द्यावी मज ॥४॥
तुझिया वचनास मज थोर आधार ।
हा शब्द निर्धार सत्य माझा ॥५॥
बोधला म्हणे मना लागलीसे आस ।
पाउले सावकाश पाहिन नयनी ॥६॥
संत माणकोजी बोधले अभंग – १३
आमचा विठोबा विश्वाचा गोसावी ।
कारे तुम्ही जीवी आठवाना ॥१॥
लटकियाचा तुम्ही मानाल भरवसा ।
जातिल दाही दिशा सोडुनिया ॥२॥
माता आणि पिता बंधु या बहिणी ।
अंतकाळी कोणी नव्हती बापा ॥३॥
लटकिया मायेसी धरला जीवेसी ।
जातील परदेशी टाकोनिया ॥४॥
बोधला म्हणे तुम्ही साच जीवी धरा ।
निर्वाणीचा खरा पांडुरंग ॥५॥
संत माणकोजी बोधले अभंग – १४
आलासि कोठोनि जासिल कोठे।
होतात कवणे ठायी रे ॥१॥
मातापिता बंधू सखी म्हणसी सेवटी नव्हे ती काही रे ।
ऐसिया प्रकारे भुलले जन । पावन करित काही रे ॥२॥
सद्गुरुसारिखा मातापिता बंधू ।
भावे शरण त्यासी जाई रे ॥३॥
आशा मनसा तृष्णा कल्पना सर्वही ।
घातल्या पाई रे ॥४॥
ऐसा जाणि जे तो साधी भूत विश्वम्भरा।
मनुषे देह तेथे नाही रे ॥५॥
बोधला म्हणे ऐसा शरण जाई ।
मग तरसिल संदेह नाही रे ॥६॥
संत माणकोजी बोधले अभंग – १५
आवडीचे निजमुख नाम मी गाईन ।
अंतरी पाहिन निजरुप ॥१॥
नोहेसी वेगळा या प्राणा सर्वथा ।
नकळे पंढरीनाथ लीला तुझी ॥२॥
काय उतराई तुझिया उपकारा ।
माझ्या विश्वंभरा पांडुरंगा ॥३॥
बोधला म्हणे देई प्रेमाची उकळी ।
गाईन वनमाळी द्वारकेचा ॥४॥
संत माणकोजी बोधले अभंग – १६
अहो जी विश्वंभरा । विनंती माझी परिसावी ।
मज दिनावर कृपा करा । आपला म्हणोनी ॥१॥
कृपादृष्टी धरावे हाता । मज द्यावी ज्ञानमती ।
तुमचे नाम महिमान वर्णावया ॥२॥
लक्ष चौऱ्यांसी जीव जनी । भोगिता कष्ट जाले यौवनी ।
काही पुण्याची सामुग्री घेऊनी । मनुष्ये देही आलो ॥३॥
आता येवूनिया मनुष्य देहासी । शरण जावे भगवंताशी ।
चुकवावया चौऱ्यांशी । काही प्रयत्न करावा ॥४॥
आता येवूनिया नरदेहासी । शरण जावे सदगुरुसी ।
सांगेल वचन जपा मानसी । सदा अहर्णिसी विसरु पडो ने देवा ॥५॥
सदगुरु सांग जे जे वचन । ते दृढ धरा विश्वास जाणा ।
मग तेचि पावाल खुण । परब्रह्माचि ॥६॥
सदगुरुचरणी धरुनिया आवडी । पाप करावी देस धडी ।
मग तेचि पावाल गोडी । परब्रम्हाचि ॥७॥
इतके जाणावयालागुनी । आपणा जवळच आहे. जाण ।
जव मळिन आहे मन । तव जवळी असता धन। न सापडे तयासी ॥८॥
सदगुरु वचनाचे घालुनी अंजन । मग दृष्टी पडेल ते कांचन ।
मग होईल समाधान कासयासी ॥९॥
मी मी म्हणती सत्य काये । ज्ञानदृष्टी परतोनी पाहे ।
हा तो मृत्तिकेचा देह । मुसी ओतिलास ॥१०॥
सकळ मृत्तिका सोंगे घेतली आणिक। जैसे पाहे रे कनक ।
नामे भिन्न अळंकाराचि ॥११॥
तैसे पाहे ऐक जीवन सरिता । आणिक होय जाणा ।
तैसे रामी रातली आहे मन । पाप केवी राहो सके ॥१२॥
बोधला म्हणे हरि हे विवेकसिंधुची लहरी । परि कर्ता असे हरि तोचि देव ॥१३॥
संत माणकोजी बोधले अभंग – १७
उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा ।
फुली पहाट झाली पक्षांच्या वेळा ॥१॥
होतो वाद्याचा गजर तुरे वाजती कहाळा ।
करी घेऊनिया आरत्या उभ्या गोपिका बाळा ॥२॥
द्वारा उभे भक्तजन दोनी जोडुनी हात ।
तयास द्यावे दर्शन आम्हा करी सनाथ ॥३॥
नारद तुंबर उभे हरिगुण गात ।
छपन्न कोटी यादव ते ही मिळाले समस्त ॥४॥
बोधला म्हणे देवा मस्तकी ठेवा हात ।
जन्मोजन्मी द्वारी उभा हरिगुण गात ॥५॥
संत माणकोजी बोधले अभंग – १८
उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर ।
जडमुढ पाषाण यांचा करा उध्दार ॥१॥
झडकरी उठोनिया कृपादृष्टी त्वा पाहावे ।
आपुले प्रेमसुख आम्हा भक्तासी द्यावे ॥२॥
तोडुनी भ्रांतीचे पडळ शुध्दबुध्द करावे ।
कायाकाशी पूर्णवासी स्नान धाडावे ॥३॥
प्रयाग प्रयागी पिंड देऊनी दान’ ।
सावध होऊनी करी गा हरिभजन ॥४॥
विश्वाचा त्रिकुट शिखरी राहे ।
तयाचे दर्शने जन्म पुनित होये ॥५॥
बोधला म्हणे देवा सकळ तीर्थी मी न्हालो ।
स्वामीच्या दर्शने जन्म पुनित जाहलो ॥६॥
संत माणकोजी बोधले अभंग – १९
उठा उठा हो विठोबा आता उजेड जाहला ।
सांभाळा आपुली बाळे तु बापा विठ्ठला ॥१॥
दिन उगवला बाळे भुकेली जाहली ।
दयाळू माऊली सकळा भोजन घाली ॥२॥
सकळांसी सांभाळूनी घ्यावे त्वा अन्न ।
दयाळू होऊनी लावी आपूले ध्यान ॥३॥
बोधला म्हणे देवा मी तो बाळ अज्ञान अखंड ।
मग देई तुझे नाम स्मरण ॥४॥
संत माणकोजी बोधले अभंग – २०
एक एक म्हणती अवघे लोक ।
एकचित्ते टेक नेणवेची ॥१॥
एक दावुनिया ठाकिती आणिका ।
पदरासी ढका लागो नेदी ॥२॥
बोधला म्हणे ऐशा केवी होये गती ।
कुळासहित बुडती नर्कपाशा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : August 09, 2026

TOP