अभंग ९१ ते १००

संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे.


९१

विठ्ठल पाहुणा आला आमुच्या घरी ।
लिंब लोण करी सावळिया ॥१॥
दुरल्या देशीचा माझ्या आवडीचा ।
भिवराथडीचा नारायण ॥२॥
षड्रस पक्वान्न वाढियेले ताट ।
जेऊ एकवटी बोधला म्हणे ॥३॥

९२

विठोबाचे नाम जीवाचा विश्राम ।
तोडियेला प्रेम संसाराचा ॥१॥
नामाचा महिमा कळला नारायणा ।
लक्ष चौऱ्यांशी भ्रमणा चुकविल्या ॥२॥
बोधला म्हणे साक्ष आली माझे माना ।
सांगतो सज्जना एकभावे ॥३॥

९३

विठोबा सुखाचा विसावा ।
चला विठोबाच्या गांवा ॥१॥
सीण अवघा सांगावा ।
आपल्या जलमत्रीचा ठेवा ॥२॥
मग तो का रे कुरवाळीला ।
कुभाविला ॥३॥
बोधला म्हणे सत्य सत्य ।
जाणाबाप पंढरीचा राणा ॥४॥

९४

विठो सर्वांचा भार ।
हृदयी घ्या रे निरंतर ॥१॥
विठोबा हा काळाचा काळ ।
महा भलासि कृपाळ ॥२॥
सत्य वचन निर्धार ।
शरण जावे रघुवरा ॥३॥
बोधला म्हणे हे सती ।
साक्षे रखुमाईचा पती ॥४॥

९५

विषये पाहे विख । याचे मानाल सुख ।
आवडी खाऊ जाता पुढे ।
भोगसिल दुःख । तुझे तु भोगसिल ।
जन पाहती कौतुक ॥१॥
विषये पाही विख । जे जे सेवित गेले ।
बळेच उडी टाकुनी । आपण बुडाले ।
आपला गळा कापुनि । आत्महत्यारी जाले ।
तेंव्हा कोण सोडवील । येम जाचिते जाळी ॥२॥
विषये पाही विख । नाही हाणित लाता ।
कृपाळु भगवंत त्यासी वाहिला माथा ।
कळिकाळा भय नाही ते नमिती सर्वथा ॥३॥
बोधला म्हणे विषयासि विटलो । कृपाळु त्यासी भेटलो |
विषय जिंकोनिया पाहे । सुर पै जालो ॥४॥

९६

विश्वास धरावा मनी । मग पुरवीत आहे धनी ।
उपमन्यालागोनि । कैसे केले ॥१॥
अज्ञान लेकरु । परि केलासे निर्धारु ।
दिधला क्षीरसागरु । तयालागी ॥२॥
ऐसा कृपासिंधु । अनाथाचा बंधु ।
बहुतांसि आनंदु । केला त्याने ॥३॥
जे जे ऐकत होतो कानी । ते पाहिले नयनी ।
बोधला चरणी विनटला ॥४॥

९७

सकाळी उठोनी हरिचे नाम उच्चारा ।
नाम उच्चारिता तुटे पातक थारा ॥१॥
हरिचे जे नाम ज्याच्या येईल वाचे ।
ते नर सदैव भाग्याचे । ते ऐक जीव दैवाचे ॥२॥
हरिचे जे नाम जे जे उच्चारित गेले ।
हरिरुप होऊन ते नर वैकुंठी ठे ॥३॥
बोधला म्हणे देवा नाम उच्चारित गेलो ।
नाम उच्चारिता विठ्ठल पायी विनटलो ॥४॥

९८

संसार महाझट । तेथे भव खटपट ।
उणे पुरे बोलता रे । कहि न भरे पोट ।
संसार हा महाझट ॥१॥
धन वित्त पुत्र नारी । आवघी मिळोनी धरा ।
दया धर्म न धर त्याने केला मातेरा ॥२॥
सदा हाल हाल मोठी दयाधर्म नाही पोटी ।
प्रपंची वेढिले रे पाहिले माया जाळ मिठी ॥३॥
आता तरी हित करी । स्वहित विचारी ॥४॥

९९

सकळांचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ ।
न कळे त्याचि कळ ब्रह्मादिका ॥१॥
जया जैसा भाव त्यासि तैसा देव योगिया ।
अनुभव घेऊनि राही ॥२॥
उदक पाहे जीवन तेथे ।
वसवी लवण दोहीस भिन्नपण कैचे तेथे ॥३॥
जैसे पाहे कनक अळंकार अनेक ।
तैसा राम मी व्यापक मूर्ख नेणे ॥४॥
देहे पाहे चाळविता बुधि पाहे खेळविता ।
ज्याचा जैसे चिता उपावो करि ॥५॥
ऐसाच भ्रमणी फिरतसे जनिवनी ।
परि बरे वाईट दोन्ही ऐक राम ॥६॥
बोधला म्हणे कळे नकळे त्याचे खेळ ।
कैसा नाटक गोपाळ खेळ खेळ ॥७॥

१००

सकळ सखियास करितसे विनंती ।
समजावुनि द्या मज ॥१॥
रामाचे भेटीला मन हे उदासीन ।
नव्हे समाधान काही केल्या ॥२॥
व्यर्थ माझा देहे। जात असे वाया ।
भेटावया देवराया जिवलगा ॥३॥
मग सकळिका मिळोनी एकरुप जाल्या ।
घेउनी राम आल्या घरा माझ्या ॥४॥
बोधला म्हणे आनंद जाला ।
सेजे पडला राम माझा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP