मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५९२१ ते ५९३०

जनांस शिक्षा अभंग - ५९२१ ते ५९३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९२१॥
सुसुत्र नामाचा । घोष न करी कां वाचा ॥१॥
ताटा तारूण्याचा आंगीं । श्रेष्ठपण भोगी जगीं ॥२॥
चालतो उताणा । पुच्छेविण बांडा सुना ॥३॥
तुका ह्मणे फुगे । सान ताठलीं सर्वागें ॥४॥

॥५९२२॥
तारुण्यें मातला । विद्यागर्वे ताठा आला ॥१॥
काय म्हणावें तयासी । खर उकरडया राशी ॥२॥
नेणे वेळ ते अवेळ । दुष्ट भुंके सर्वकाळ ॥३॥
तुका ह्मणे कर्म । कधीं न साहवे श्रम ॥४॥

॥५९२३॥
जातीचे ओशाळे । कधीं न सांडिती चाळे ॥१॥
ऐशी अभाग्याची मती । नर्का कळोनियां जाती ॥२॥
नेणें कांहीं हीत । बळें आणितो अघात ॥३॥
तुका ह्मणे वेळ जाय । मग करी हाय हाय ॥४॥

॥५९२४॥
नेणे मंदमती । कैसी करुं भावभक्ति ॥१॥
नेणे विठोबाचें नाम । भ्रम लावी क्रोध काम ॥२॥
लोभ मद अंगिकारी । यमपाश मैंद करी ॥३॥
तुका ह्मणे आलें । व्यर्थ वय वांयां गेलें ॥४॥

॥५९२५॥
गाई मारी बदबदा । दोष सदा विप्राचा ॥१॥
सूर्यमंडळ पाहे डोळां । क्रोध चांडाळा नावरे ॥२॥
करी भाविकासी द्वेष । सांची दोष पदरीं ॥३॥
तुका ह्मणे ऐशियाचा । संग साचा न व्हावा ॥४॥

॥५९२६॥
नेणे स्वहिताचा लेश । राशी सांचियले दोष ॥१॥
त्याची न करिती कींव । नाहीं नारायणीं भाव ॥२॥
पराव्याचे गुण दोष । पाहे निंदी सावकाश ॥३॥
तुका म्हणे ऐशा नरा । यमपुरी वस्ती थारा ॥४॥

॥५९२७॥
चित्त अधर्मी ओंगळ । घात करिती कावळ ॥१॥
मुखें बडबडी नर्क । दुष्ट छळिती भाविक ॥२॥
कीर्तनाचा राग । करी मनोदयभंग ॥३॥
तुका ह्मणे पापें । जाती नरका अकल्पें ॥४॥

॥५९२८॥
सोसुनियां घोर तप । जोडी पाप सांचिलें ॥१॥
छेदी भाविकांचे प्रेम । बोले वर्म दाटूनीं ॥२॥
मांडी छळुनियां भक्ति । जना युक्ति दावितो ॥३॥
तुका ह्मणे नर्का जात । चित्तीं घात पराचा ॥४॥

॥५९२९॥
मुखीं वदे अमंगळ । छळी खळ भाविकां ॥१॥
सदा अविचारी मस्ती । पाप वस्ती सांचिली ॥२॥
कुष्ट मुखें बडबडी । बुद्धी कुडी न सांडी ॥३॥
वाटे जनाचिया भये । केश डोये वाढवी ॥४॥
तुका ह्मणे व्हावें दुरी । तोंडावरी थुंकोनी ॥५॥

॥५९३०॥
लांच घेऊनियां ग्वाही । देती पाही सभेंत ॥१॥
धर्म न विचारी नीत । अध:पात साधिला ॥२॥
गेलें यश सत्व धीर ॥ ते अघोर जोडिती ॥३॥
नये पूर्वजांसी वस्ती । अधोगती हिंडती ॥४॥
तुका ह्मणे कुलांगार । जोडी खर वांयां तें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP