मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८०१ ते ५८१०

जनांस शिक्षा अभंग - ५८०१ ते ५८१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८०१॥
साखरेचा आळा लाविला लिंबारा । कोण त्या गव्हारा बुजाविना ॥१॥
सोन्याची चवई बैसवून दासी । काय शोभा तिसी वरमायेची ॥२॥
आणुनी माकड बैसवी पालखी । दाखवितो शेखी आपुला गुण ॥३॥
तुका ह्मणे किती सांगावें खळासी । आपुले ब्रीदासी न सांडिती ॥४॥

॥५८०२॥
हरीजागरासी । कांरे जातांना मरशी ॥१॥
कोठें पाहशील तुटी । आयुष्य वेंचे उठाउठी ॥२॥
तुज आहे ज्यांची गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥३॥
तुका ह्मणे अगा खरा । लाभ विचारी तूं बरा ॥४॥

॥५८०३॥
नकरे पंढरीची वारी । आह्मी केली मुलुखगिरी ॥१॥
ह्मणे यांतील आहे त्यांत । मूर्खा न कळे संदेह ॥२॥
उपवासी माता पिता । पोशी बायलेच्या गोता ॥३॥
उपवासी गाई मारी । गोग्रास महीषीस चारी ॥४॥
श्राद्ध पक्ष जो न करी । करी पितरांची कंदोरी ॥५॥
तुका ह्मणे ऐसा लंड । फोडा पैजारानें तोंड ॥६॥

॥५८०४॥
श्रीहरीची कथा नावडे हो जया । अधम ह्मणों तया वेळ लागे ॥१॥
हीनदेही तया नाट पैं लागेल । अघोर सोसिल कुंभपाक ॥२॥
कासया जन्मासीं आला तो पाषाण । जंतू कां होऊन पडला नाहीं ॥३॥
उपजे मरोनियां वेळोवेळीं भिडे । परी लाज लंड न धरी कांहीं ॥४॥
जन्मोनन्मींचा तो होईल नरकीं । तुका म्हणे चुकी नाहीं बोला ॥५॥

॥५८०५॥
नरदेहा येउनी न करी भजन । धिक्‍ तो पाषाण भूमीवरी ॥१॥
मेरुतुल्य पृथ्वी दिधलें सुवर्ण । न मिळे एक क्षण नरदेह ॥२॥
हातो गमाविला वोढीं । बुडविली जोडी आयुष्याची ॥३॥
तुका ह्मणे शाहाणा होयींरे गव्हारा । चौर्‍यांशीं येरझारा फिरुं नको ॥४॥

॥५८०६॥
कांरे शिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥१॥
करुनियां तीर्थाटण । वाढविला अभिमान ॥२॥
वांटियेलें धन । केली अहंता जतन ॥३॥
मान दंभासाठीं । केली अक्षराची आटी ॥४॥
तुका ह्मणे चुकला वर्म । तेणें अवघाचि अधर्म ॥५॥

॥५८०७॥
ब्राह्मणा दक्षणा देतां रडे रुका । वेश्येहातीं फुका लुटवी धनें ॥१॥
वितभरी चिंधोटी नेदी अतीताला । बहुरुपियाला खिरमे टाकी ॥२॥
पान फुलें नेतो वेश्येसी उदंड । ब्राह्मणासी खांड एक नेदी ॥३॥
तुका म्हणे त्यानें केली नर्कजोडी । पुढील परवडी विपत्तीची ॥४॥

॥५८०८॥
बहुत गेलीं वायां । न भजतां पंढरीराया ॥१॥
करी कामिनीची सेवा । लागोन मागो खात्या देवा ॥२॥
अवघियांचा धणी । त्यासी गेलीं विसरुनी ॥३॥
तुका ह्मणे अंतीं । पडती यमाचिये हातीं ॥४॥

॥५८०९॥
न होतां सावचित्त । तेणें अंतरिलें हित ॥१॥
नामासी विसर पडिला । तेणें संसार वाढविला ॥२॥
लटिकि याचे पुरीं । वाहोनियां गेला दुरी ॥३॥
तुका ह्मणे माव । असा सांपडला देव ॥४॥

॥५८१०॥
नलगे जीव देणें सहज जाणार । आहे तो विचार करा कांहीं ॥१॥
मरण मागतो गाढवाचा बाळ । बोलतो चांडाळ शुद्ध याती ॥२॥
तुका ह्मणे कई होईल याचें हित । निधान ही तेथें सांडिताती ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP