TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५५५१ ते ५५६०

जनांस शिक्षा अभंग - ५५५१ ते ५५६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


जनांस शिक्षा अभंग - ५५५१ ते ५५६०
॥५५५१॥
आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीन देखावेखो ॥१॥
नकळ संतत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥२॥
वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥३॥
तुका ह्मणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥४॥

॥५५५२॥
संत मागे पाणी नेदी एक चुळी । दासीस आंघोळी ठेवी पाणी ॥१॥
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥२॥
संतासी देखोनि करितो ढवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥३॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥४॥

॥५५५३॥
सोइरियासि करी पाहुणेरु बरा । काढितो ठोंबरा संतांलागीं ॥१॥
गाईसि देखोनी बदबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥२॥
पानफुल वेश्येसी नेतसे उदंद । देखों नेदी खांड ब्राह्मणसी ॥३॥
बाईलेच्या गोता आवडिनें पोसी । माता पितयासी दवडितो ॥४॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥५॥

॥५५५४॥
नाहीं निर्मळ जीवन । काय करीळ साबन ॥१॥
तैसी चित्तशुद्धि नाहीं । तेथें बोध करील काई ॥२॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करी वसंतकाळ ॥३॥
वांजे न होती लेकरें । याय करावें भ्रतारें ॥४॥
नपुंसक पुरुषांसी । काय करील बाईल त्यासी ॥५॥
प्राण गेलीया शरिर । काय करील व्यवहार ॥६॥
तुका ह्मणे जिवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥७॥

॥५५५५॥
करी संध्या स्नान । वारी खाऊनियां अन्न ॥१॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥२॥
मजुराचें धन । विळा दोरचि जतन ॥३॥
तुका ह्मणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥४॥

॥५५५६॥
वाखर घेऊनि आलें । त्यासी तरवारेनें हालें ॥१॥
नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥२॥
अंगुळिया मोडी । त्यासी काय सिलें घोडीं ॥३॥
नपुंसकासाठीं । तुका ह्मणे नलगे जेठी ॥४॥

॥५५५७॥
आधींच आळशी । वरी गुरुचा उपदेशी ॥१॥
मग कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥२॥
नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥३॥
तुका ह्मणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥४॥

॥५५५८॥
शूकरासी विष्टा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥
तेवीं अभक्तांसी आवडे पांखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥२॥
श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि ॥३॥
तुका ह्मणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष झालें ॥४॥

॥५५५९॥
रासभ धुतला महा तीर्थामाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥
तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचें ॥२॥
सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरीचें विष जाऊं नेणे ॥३॥
तुका ह्मणे श्वाना क्षिरीचें भोजन । सवेंचि वमन जेंवीं तया ॥४॥

॥५५६०॥
जेवीं नवज्वरें तापले शरीर । लागे तया क्षीर विषतुल्य ॥१॥
तेंवी परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥२॥
कामिनी जयाच्या जाहली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥३॥
तुका ह्मणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T19:59:45.7030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

forced distribution method

  • सक्तीची विभाजन पद्धति 
RANDOM WORD

Did you know?

चित्त आणि मन एकच आहे काय?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.