मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५७७१ ते ५७८०

जनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५७७१॥
काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥
आजि दुखवले मन । कथाकाळीं झाला सीण ॥२॥
पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥३॥
तुका ह्मणे कानीं । घालुं आले दुष्टवाणी ॥४॥

॥५७७२॥
विठ्ठल मुक्तिदाता कानीं । नव्हे मरो हें बोलता ॥१॥
मज न साहावे कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥२॥
हरिकथेतें धिक्कारी । शत्रु माझा तो वैरी ॥३॥
सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा ॥४॥
अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥५॥
तुका ह्मणे क्षण । नको तयाचें दर्षण ॥६॥

॥५७७३॥
तोडुनी पुष्पवटीका फळवृक्ष याती । बाभळी राखिती करुनी सार ॥१॥
कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख कायी ॥२॥
धान्यें बीजें जेणें जाळिलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥३॥
मोडोनियां वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेऊनि लोकां ॥४॥
विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥५॥
तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥

॥५७७४॥
अवघ्या कोल्ह्यांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥१॥
भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥२॥
कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥३॥
दुर्जनासी पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥४॥

॥५७७५॥
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा झाली धणी ॥१॥
अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोई दाढी ॥२॥
बोडिलें तेंनिवालें । काय पालटलें सांग वहिलें ॥३॥
पाप गेल्याची काय खूण । नाहीं पालटले अवगुण ॥४॥
भक्तिभावें विण । तुका ह्मणे अवघा सीण ॥५॥

॥५७७६॥
घालुनियां मापीं । देवभक्त बैसले जपीं ॥१॥
तैसी होते सांडउलंडी । निजनिजची मुर्कुडी ॥२॥
अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥३॥
देव आतां झाला । उगवे संकोच वहिला ॥४॥
अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठीं ॥५॥
आडकिला झोंपा । रिता कळिवराचा खोंपा ॥५॥
गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड ॥७॥
तुका ह्मणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥८॥

॥५७७७॥
ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण ॥१॥
साधु कैंचा पापीयासी । काय चांडाळासी काशी ॥२॥
काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥३॥
तुका म्हणे निरंजनी । शट कैंचा ब्रह्मज्ञानी ॥४॥

॥५७७८॥
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥
त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥२॥
कोटिगोहत्यापातक । त्यासी घडेल निष्टंक ॥३॥
मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥४॥
तुका ह्मणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥५॥


॥५७७९॥
गायत्री विकोन पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकापाता ॥२॥
नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥३॥
आमुचा सांगाती आहे जो श्रीहरि । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥४॥

॥५७८०॥
साधूच्या दर्शना लाजशी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥
वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥
तुका म्हणे आतां लाज धरी बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP