मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८२१ ते ५८३०

जनांस शिक्षा अभंग - ५८२१ ते ५८३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८२१॥
नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥
अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥२॥
पाहिजे तें आलें रुची । काचाकुची काशाची ॥३॥
तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥४॥

॥५८२२॥
नामाविण काय वाउगी चावट । वांया वटवट हरीविण ॥१॥
फुकटची सांगे लोकांचियां गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥२॥
मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥३॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥४॥
बळें यम दांत खाय तयावरी । जंब भेरी दोरी आयुष्याची ॥५॥
तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥६॥

॥५८२३॥
हरीची हरिकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लाग ॥१॥
मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोंर साधिलें कुंभपाक ॥२॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं ॥३॥
उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परि लाज लंड न धरी कांहीं ॥४॥
ऐशियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी ॥५॥
देवधर्माविण चांडाळ हा नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥६॥
राम ह्मणतां तुझें काय तें वेचलें । कां हित आपुलें न विचारिसी ॥७॥
जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥८॥

॥५८२४॥
स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसी रुका गांठीं नाहीं ॥१॥
तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी । ज्ञान पोटासाठीं विकुनियां ॥२॥
बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेवूनियां तृप्त कोण झाला ॥३॥
कागदीं लिहिली नांवाची साकर । चाटितां मधुर केवीं लागे ॥४॥
तुका ह्मणे जळो जळो त्याचें ज्ञान । यमपुरी कोण दंड साहे ॥५॥

॥५८२५॥
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥
आला डोळ्यासी कवळ । तेणें मळलें उजळ ॥२॥
अंगाचें भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥३॥
तुका ह्मणे नाड । पाप ठाके हिता आड ॥४॥

॥५८२६॥
सिंदळीचें चित्त परपुरुषावरी । पति चरमुरी रात्रदिवस ॥१॥
ऐसी ते वोंगळी जाय वो नरका । तिच्या दोषा देखा पति जाय ॥२॥
आपण बुडती पती बुडविती । दोन्ही कुळें नेती अध:पाता ॥३॥
तुका ह्मणे तिची न करावी संगती । होईल फजिती मागें पुढें ॥४॥

॥५८२७॥
आंगीं भरला ताठा । वळणी नये जैसा खुंटा ॥१॥
किती सांगावें त्या डेंगा । हित आदळेना आंगा ॥२॥
तुका ह्मणे अनु । मुसळांचें नव्हे धनु ॥३॥

॥५८२८॥
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण ॥
तयां देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥
तैसें झालें दोघांजणां । मागतिया यजमाना ॥
जालियलें वना । आपणासहित कांजणी ॥२॥
घडितां दगडाची नाव ॥ मोल क्लेश गेले वाव ॥
तरता नाहीं ठाव । बुडवी तारुं तरतीया ॥३॥
चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा ॥
तुका ह्मणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥४॥

॥५८२९॥
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥
अग्रपुजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमाघरीं ॥२॥
उभयकुल समवेत । नर्की प्रवेश अद्भुत ॥३॥
तप्तलोहें भेटी । तुका म्हणे कल्प कोटी ॥४॥

॥५८३०॥
लटिकी ग्वाही सभे आंत । देतां पतित आगळा ॥१॥
कुंभपाकीं वस्ती करुं । होय धुरु कुळेंसी ॥२॥
रजस्वला रुधिर स्त्रवे । तें चि घ्यावे तृषेसी ॥३॥
तुका म्हणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP