मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५७३१ ते ५७४०

जनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५७३१॥
जळालें तें बाह्य सोंग । अंतर व्यंग पडिलिया ॥१॥
कारण तें अंतरलें । वाइट भलें म्हणवितां ॥२॥
तांतडीनें नासी । तांतडीनेंच संतोषी ॥३॥
तुका म्हणे धीर । नाहीं बुद्धि एक स्थिर ॥४॥

॥५७३२॥
वाघाचा कालभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥
बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपोआप ॥२॥
सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥३॥
तुका ह्मणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥४॥

॥५७३३॥
सिंदळीचे सोर चोराची दया । तो ही जाणा तया संवसर्गी ॥१॥
फुकासाठीं भोगे दु:खाचा तो वाटा । उभारोनि कांटा वाटेवरी ॥२॥
सर्प पोसूनियां दुधाचा ही नास । केलें थीता विष अमृताचें ॥३॥
तुका ह्मणे यासी न करितां दंडण । पुढिल्या खंडण नव्हे दोषा ॥४॥

॥५७३४॥
देवाचें भजन कांरे न करिसी । अखंड हव्यासीं पीडतोसी ॥१॥
देवासी शरण कांरे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं ॥२॥
देवाचा विश्वास कांरे नाहीं तैसा । पुत्रस्नेहें जैसा गुंतलासी ॥३॥
कांरे नाहीं तैसी देवाची हे गोडी । नागवूनि सोडी पत्नी जैसी ॥४॥
करि नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजना ॥५॥
कांरे भय वाहासी लोकांचा धाक । विसरोनि एक नारायण ॥६॥
तुका ह्मणे कांरे घातलें वांयां । अवघें आयुष्य जाया भक्तिविण ॥७॥

॥५७३५॥
दुबळें सदैवा । ह्मणे नागवेल केव्हां ॥१॥
आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥२॥
मूढ उभे आंत । इच्छी पंडितांचा घात ॥३॥
गांढें देखुनि शुरा । उगें करितें बुरबुरा ॥४॥
आणिकांचा हेवा । न करीं शरण जाई देवा ॥५॥
तुका ह्मणे किती । करुं दुष्टाची फजिती ॥६॥

॥५७३६॥
ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥१॥
साच आपुल्या पुरतें । करुन नेघेती कां हितें ॥२॥
कांहीं वेचितील वाणी । निरर्थक चि कारणीं ॥३॥
तुका ह्मणे देवा । कांहीं समर्पुनि सेवा ॥४॥

॥५७३७॥
चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥१॥
काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥२॥
कांहीं सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥३॥
चालिले अगळे । हळु च कान केश डोळे ॥४॥
वोसरले दांत । दाढा गडवडल्या आंत ॥५॥
एकली तळमळ । जिव्हा भलते ठायीं लोळे ॥५॥
तुका म्हणे यांणीं । तुझी मांडिली घालणी ॥७॥

॥५७३८॥
सरे आम्हांपाशीं एक शुद्धभाव । नाहीं तरी वाव उपचार ॥१॥
कोण मानी वरी रसाळ बोलणें । नाहीं झाली मनें ओळखी तों ॥२॥
तुका म्हणे आम्हां जाणीवेचे दु:ख । न पाहों त्या मुख दुर्जनाचें ॥४॥

॥५७३९॥
लांव धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥
आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥२॥
खाय ओकी बेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥३॥
तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥४॥

॥५७४०॥
प्रपंचाची पीडा सोसीतो अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥१॥
नाम नाठवितो आत्मया रायाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥२॥
मूळ तें पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥३॥
स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूत ॥४॥
चिंतन रामाचें न करी दोषी । एकांत तयासी बोलो नये ॥५॥
नये त्याचा संग धरुं म्हणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP