TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५७२१ ते ५७३०

जनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


जनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०
॥५७२१॥
अधमाचें चित्त अहंकारी मन । उपदेश शीण तया केल ॥१॥
पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥२॥
अधमाचें चित्त दुश्चित ऐकेना । वांयां सीण मना करुं काय ॥३॥
गर्दभासी दिली चंदनाची उटी । केशर ललाटीं शुकराच्या ॥४॥
पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥५॥
तुका म्हणे तैसें अभाविका सांगतां । वाउगाचि चित्ता सीण होय ॥६॥

॥५७२२॥
पाया झाला नारु । तेथें बांधला कापुरु ॥
तेथें बिबव्याचें काम । अधमासी तों अधम ॥१॥
रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ॥
तेथें चाकराचें काम । अधमासी तों अधम ॥२॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसी ॥
तेथें बटकीचें काम । अधमासी तों अधम ॥३॥
देव्हार्‍यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ॥
तेथें पैजारेचे काम । अधमासी तों अधम ॥४॥
तुका म्हणे जाती । जातीसाठीं खाती माती ॥५॥

॥५७२३॥
झाली गाढवी दुधाळ । महिमा गाईची पावेल ॥१॥
श्वान झालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥२॥
झाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता झाली ॥३॥
तुका म्हणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥४॥

॥५७२४॥
एक ब्रह्मचारी गाढवा झोंबतां । हाणोनियां लाता पळालें तें ॥१॥
गाढवीहि गेलें ब्रह्मचर्य गेलें । तोंड काळें झालें जगामाजी ॥२॥
होणार तैसें झालें हें ना तैसें केलें । तुका म्हणें गेलें वांयां चि तें ॥३॥

॥५७२५॥
भक्ति ज्याची थोडी । पूर्ण विषयाची गोडी ॥१॥
तो नरचि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥२॥
भजन पूजनही नेणे । काय स्वरुपासी जाणे ॥३॥
तुका म्हणे त्याला । भोवंडूनी बाहेर घाला ॥४॥

॥५७२६॥
कुटल्याविण नव्हे भांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥
राम नको धरुं मनीं । गांडमणी सांगतों ॥२॥
तरटापुढें बरें नाचे ॥ सुतकाचें मुसळ ॥३॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥४॥

॥५७२७॥
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥
तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥२॥
दावितिया वाट । वेठी धरुं पाहे चाट ॥३॥
पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥४॥

॥५७२८॥
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें ॥१॥
कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥२॥
केली गांठोळीची नासी । पुढें भीक चि मागसी ॥३॥
तुका म्हणे ठाया । जाई आपल्या आलिया ॥४॥

॥५७२९॥
पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दांतखीळ ॥१॥
हरिचें नाम कदाकाळीं कांरे नये वाचे । म्हणतां राम राम तुझ्या वाचें काय वेचे ॥२॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥३॥
तुका म्हणे ऐशा जीवा काय करुं आतां । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥४॥

॥५७३०॥
नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापाचा ॥१॥
हेचि ओळख तयाची । खूण जाणा अभक्ताची ॥२॥
ज्यासी विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥३॥
नाम न म्हणे ज्याचें तोंड । तेंची चर्मकाचें कुंड ॥४॥
तुका म्हणे त्याचे दिवशीं । रांड गेली महारापाशीं ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T21:19:08.7100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Langerhans cells

  • लँग हान पेशी 
RANDOM WORD

Did you know?

ईश्वराची रुपे किती व कोणती
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.