मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५७५१ ते ५७६०

जनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५७५१॥
कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥
कासया जीऊन झाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥२॥
निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥३॥
तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥४॥

॥५७५२॥
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥
शत्रु तो म्यां केला न ह्मणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥२॥
जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका ह्मणे ॥३॥

॥५७५३॥
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥
अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥२॥
जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥३॥
तुमची व्याली माझे डाइ हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥४॥
दुष्टवृत्ति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥५॥
भावा दीर कांही धड हा न बोले । नांदो कोणां खालें कैसी आतां ॥६॥
माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥७॥
ठाकते ठमकते जीव मुठी धरुनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥८॥
वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥९॥
तुकां ह्मणे झाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥१०॥

॥५७५४॥
कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित निरंतर ॥१॥
माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥२॥
त्याचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥३॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥४॥
वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥५॥
ताईत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥६॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरुं सीण मनीं कांहीं ॥७॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुलें ॥८॥
तुका ह्मणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥९॥

॥५७५५॥
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥
वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥२॥
कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । स्त्रियेचे कीर्त्तनीं प्रेमें जागे ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥४॥

॥५७५६॥
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥२॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥३॥
तुका ह्मणे कुचर दाणा । तैसा ह्मणा डेंग हा ॥३॥

॥५७५७॥
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥२॥
वर्णाभिमानें कोण झाले पावन । ऐसें या सांगून मजपाशीं ॥३॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट झालीं ॥४॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥५॥
कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥६॥
कान्होपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥७॥
चोखामेळा वंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥८॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥९॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥१०॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥११॥
तुका ह्मने तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥१२॥

॥५७५८॥
पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वरारीं द्रव्यराशी ॥१॥
सोइर्‍यासी करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥२॥
बाइलेचों सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥३॥
श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राह्मण । गोवार मागून सावडीतो ॥४॥
नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड नेदी एक ॥५॥
हातें मोर्‍या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥६॥
सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां चि ॥७॥
हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगलाचि ॥८॥
पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥९॥
देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पावनथा नेत्रभिक्षा ॥१०॥
गाईला देखोनी बदबदां मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥११॥
ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा ।  प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥१२॥
तुका ह्मणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥१३॥

॥५७५९॥
आपुल्या पोटासाठीं लोकांची प्रौढी वाणी । संतांची वदनीं निंदा करी ॥१॥
पोटा घातलें जेणें अन्न । न ह्मणे पतितपावन ॥२॥
जेणें घातलें संसारीं । विसरला तया हरी ॥३॥
मी कोठील आणि कोण । हें न कळे जयालागून ॥४॥
तुका म्हणे नरस्तुती । करितो भाट त्रिजगतीं ॥४॥

॥५७६०॥
नीत सांडोनि अवनीत चाले । भंड उभंड भलतें चि बोले ॥१॥
त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥२॥
ज्यासि वंदावें त्यासीं निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी ॥।३॥
आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे ॥४॥
केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥४॥
करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥५॥
तुका ह्मणे कांहीं नित्यनेम । चित्तीं न धरी तो अधम ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP