उध्दवगीता - अध्याय पांचवा

अध्याय पांचवा

श्री भगवान म्हणतात, मी जो स्वधर्माचा उपदेश केला आहे, त्यावर श्रध्देने लक्ष ठेऊन आणि माझ्यावरच निष्ठेने अवलंबून मद्भक्ताने आपल्या वर्णाचे, आश्रमाचे व स्वकुलाचे आचार निष्काम वृत्ती धारण करुन यथासांग चालवावे. ॥१॥
विषयलोलुप जीव, विषयोपभोगच परम पुरुषार्थ आहे, विषय सत्य आहेत असे मानतात. (म्हणजे ते उद्योग व ती कर्मे दु:ख देणारी होतात. ) ज्याचा शुध्द झाला आहे, त्या माझ्या भक्ताने हे संसारी पुरुषाचे चित्र लक्ष लावून पाहावे व त्यापासून बोध घ्यावा. ॥२॥
स्वप्नसृष्टीत अथवा मनोराज्याच्या सृष्टीत उत्पन्न- विनष्ट होणारे विषय व त्यांचे दर्शन एकात्मक नसल्यामुळे जसे फलशून्य, त्याचप्रमाणे जागृतकालीही विषयवैचित्र्य व इंद्रियवैचित्र्यामुळे उत्पन्न होणारी भेदात्मक बुध्दी ही विफल अथवा मिथ्या असते. ॥३॥
माझ्या भक्ताने विषयत्याग सांगणारे विहित कर्म वैराग्यवृत्तीने करावे, आणि सकाम कर्मांचा त्यागच करावा. आत्मविचार एकनिष्ठेने करणार्‍या पुरुषाने श्रुतिकथित सकाम कर्मसंबंधींच्या आज्ञांवर लक्ष देऊ नये. ॥४॥
अहिंसा - सत्यप्रभृती यम आदराने पाळावे, नियमांचेही पालन करु नये असे नाही. परंतु शांत, मला श्रेष्ठ मानणार्‍या गुरुला शरण जाऊन त्याची सेवा भक्तिपूर्वक त्याच्या शिष्याने करावी. हा शिष्य निरभिमानी , निर्मत्सर, दक्ष, परिग्रहशून्य, दृढप्रेमी, सावध, तत्वजिज्ञासू , असूयारहित, सत्यवक्ता, भार्यापुत्र- घर- जमीन-आप्त- धन इत्यादींविषयी उदसीन म्हणजे काळजी न करणारा, सम, वृत्तीने सर्वत्र आत्मस्वरुप पाहणारा, असा असावा. शिष्यवृत्तीला हे गुण अत्यंत आवश्यक आहेत. ॥५-७॥
अग्नी हा दाह्यांहून (लाकडे, गोवर्‍या वगैरेहून ) निराळा असून त्या दाह्यांचा प्रकाशक असतो. त्याप्रमाणे जीवाच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही देहांहून निराळा असा त्यांचा साक्षी असा आत्मा असतो. ॥८॥
अग्नी हा लाकडामध्ये अंत:प्रविष्ट असतो आणि अग्नीनेच लाकडामध्ये उत्पन्न केलेले नाश, उत्पत्ती, लहानमोठेपणा, अनेकत्व इत्यादी गुण अग्नी ग्रहण करतो. त्याप्रमाणे देहाच्या आंत प्रविष्ट होऊनही नित्य, निर्गुण, मुक्त , देहात्पर असणारा आत्मा, स्वत: आपणच देहादिकांमध्ये उत्पन्न केलेले जन्ममरणादी गुण घेतो, असा भास होतो. ॥९॥
पुरुषोत्तमाच्या माया- विलासाने, सूक्ष्म व स्थूल असे जे देह निर्माण केले आहेत ते, व हा सारा संसार, ही जीवाच्या अध्यासाने (आज्ञानाने) उत्पन्न झाली आहेत. हा जीवाचा अभ्यास छेदून नाहीसा करण्याला एक आत्मविद्या मात्र समर्थ आहे. ॥१०॥
म्हणून जिज्ञासूने आपल्या ठिकाणीच स्थित असणार्‍या अशा केवल (निर्गुण) व सर्वश्रेष्ठ आत्म्याची मात्र संगती दृढ धरावी आणि ‘विषय सत्य नित्य आहेत’ हा बुध्दिभ्रम क्रमाक्रमाने नाहीसा करावा. ॥११॥
यज्ञाचा अग्नी, दोन काष्ठे एकावर एक ठेऊन घासल्यानंतर प्रकट होतो, हा दृष्टांत घेऊन भगवान्‍ म्हणतो, गुरु ही आधार देणारी अरणी म्हणजे खालचे लाकूड आणि शिष्य हा वरची अरणी होय. (खालच्या अरणीला अधरारनी व वरचीला उत्तरारणि म्हणतात. गुरुजींचे प्रवचन म्हणजे उपदेश हे दोन अरणींमधील मध्यम काष्ठ होय. या प्रवचनरुपी संधानापासून स्वयंप्रकाशक विद्या प्रकट होते. हाच संधि होय. ही  विद्या सुख देणारी असते. ॥१२॥
ती संधीने उत्पन्न झालेली स्वयंप्रकशी शुध्द विद्या प्राप्त झाली म्हणजे अर्थात् च गुणप्रसूत अविद्या आणि तिचे गुणांनी उत्पन्न केलेला हा संसार दग्धच होतो. कुंडांतील सर्व समिधा जळून खाक झाल्या म्हणजे त्यांचा दाहक जो अग्नी तोही शांत होतो, त्याच प्रमाणे संसार हा दाह्य पदार्थ संपला म्हणजे त्याला जाळणारी विद्याही अदृश्य होते. ॥१३॥
आता तू समजत असशील की, हे सर्व कर्म करणारे व सुखदु:खांचा उपभोग घेणारे जीव स्वतंत्र व अनेक आहेत आणि हे लोक ( भुवने व भुवनपती )काल, वेद आणि संसारी जीव वस्तुत: नित्यच आहेत. ॥१४॥
सारांश याप्रमाणे सर्व पदार्थांची (जीवांची) स्थिती, नित्य आहे. आणखी ज्ञान नित्य व एकरुप नसून ते दृश्यदर्शन झाले म्हणजे उत्पन्न होते आणि भिन्न दृश्ये म्हणून ते ज्ञान भिन्न प्रकारचे असते. ॥१५॥
शरीर धारण करणार्‍या सर्व जीवास अनेक जन्ममृत्युप्रभृती भिन्न भिन्न अवस्था प्राप्त होतात. तर त्यांचा शरीरांशी संबंध होऊन व कालाच्या संवत्सरादिकांशी संबंध होऊन वृध्दत्वादि अवस्था उत्पन्न होतात म्हणून नानात्वाचा हेतु (कारण) देहसंबंध व कालसंबंध आहे. जीव नाना नाहीत; देह नाना आहेत. ॥१६॥
शिवाय, येथे कर्म करणार्‍या लोकांस स्वातंत्र्य आहे असे दिसत नाही. आणि कर्मफलाचा भोक्ता सुखदु:खांसंबंधाने स्वतंत्र नाही. परतंत्र जो आहे, त्याला कोणता सौख्याद पुरुषार्थ साध्य करता येईल? ॥१७॥
मोठा शहाणा विव्दान्‍ असला, तरी त्याला नेहमी शुध्द सुख मिळतेच असे नाही. आणि मूर्खाला नेहमी दु:खच भोगावे लागते, असेही नाही. तेव्हा मी कर्म करण्याच्या व सुखदु:ख भोगण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे , असा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. ॥१८॥
आता सुखाची प्राप्ती अथवा त्याचा नाश होणार किंवा दु:खाची प्राप्ती अथवा त्याचा निरास होणार, याचे ज्ञान जीवाला आहे, असेही जरी मानले तरी असा काही उपाय त्यास सापडला नाही की, ज्यायोगे मृत्यूचे येणे त्याला थांबविता येईल ! ॥१९॥
फाशीची शिक्षा झालेल्या अपराध्याला वधस्थानाकडे नेत असता त्या सुखकर भोगाने किंवा त्याच्या इच्छेने सुख होत नाही. तसेच, ‘आपण मर्त्य, खास मरणार’ असे ठाऊक असून त्याचे नित्य स्मरण असेल तर, किंवा आज उद्या मृत्यू येणार असे कळले असेल तर,  कोणत्या पदार्थाच्या प्रत्यक्ष लाभाने किंवा लाभाच्या आशेने जीवाला सुख किंवा समाधान होईल बरे? ॥२०॥
आणखी श्रुती स्वर्गफल सुखकारी आहे असे सांगते ना ? पण ते सुखही येथील सुखासारखेच स्पर्धा, असूया, अपक्षय, नाश इत्यादि अनेक विघ्नकारी प्रसंगांनी व दोषांनी दूषित झालेले असते. शेतकीला जशी अनेक विघ्ने, तशीच येथेही. ॥२१॥
समज की, श्रुतिप्रणीत यज्ञादि धर्मांचे अनुष्ठान यथासांग झाले, आणि त्या पुण्याने तो याज्ञिक स्वर्गाला गेला तर तेथे त्याची स्थिति काय होते ती ऐक. ॥२२॥
देवास प्रसन्न करणारे अनेक यज्ञ करणारा याज्ञिक स्वर्गाला जातो व तेथे स्वपुण्याने संपादित असे दिव्य भोग देवांप्रमाणेंच उभोगितो. पांढर्‍या शुभ्र विमानामध्ये मनोहर वेष धारण करुन तो बसतो. त्याच्या सभोवार अनेक दिव्यांगना बसल्या असून त्यांच्याशी तो हास्यविनोदादि क्रीडा करीत आहे, गंधर्व सुंदर गायन करीत आहेत, आणि मनोहारी नाद करणार्‍या घटिकांनी विभूषित असे ते विमान त्याच्या इच्छेनुसार सुंदर सुंदर वनोपवनांतून जात आहे, अशा प्रकारे पुण्य असेपर्यंत अनेक ऐंद्रिय सुखाचे उपभोगांमध्ये तो रमतो. नंतर त्याचा स्वर्गवास संपून तो खाली येतो. त्याची इच्छा स्वर्ग सोडण्याची नसते. परंतु कालाच्या सामर्थ्यापुढे त्या बिचार्‍या परतंत्र आणि पुण्यशून्य जीवाची मातब्बरी चालत नाही. पुण्य संपतांच तो खाली पडतो ! ॥२३-२६॥
पण जर तो वाईट लोकांच्या संगतीत राहून अथवा स्वत:च इंद्रियवश होऊन (निषिध्द आचरण) अधर्म करण्यांतच निमग्र असेल वासनावश असेल, कृपण असून लोभी, स्त्रीकामुक, जीवांस त्रास देणारा, पशुवध करणारा , भूत, प्रेत, पिशाच यांची आराधना करणारा असेल, तर तो मेल्यावर अति दु:खद नरलोकी जातो. ॥२७-२८॥
याप्रमाणे उध्दवा ! देहव्दारा दु:खपरिणामी कर्मे करणारा मेल्यावर पुन: देह धारण करुन जन्माला येतो. व्यर्थ माणसाला कसले सुख? कारण कल्प कल्पपर्यंत आयुर्दाय असणारे, ‘मह:, जन:’ प्रभृति लोक (भुवने) आणि त्यांचे स्वामी यांसच काय, पण दोन दोन परार्धा आयुष्य असणार्‍या ब्रह्मदेवालाही कालस्वरुप माझे भय असते. ॥२९-३०॥
उध्दवा ! गुण ( म्हणजे इंद्रियेच) कर्म उत्पन्न करतात आणि मायेचे सत्त्व, रज , तम हे गुण विषम झाले म्हणजे इंद्रियांस कर्मप्रवृत्त करतात आणि बिचारा इंद्रियसंपन्न जीव (सुखामक व दु:खा:मक) कर्मफलाचा उपभोक्ता होतो. ॥३१॥
तात्पर्य, जोपर्यंत गुणवैषम्य असते तोपर्यंत जीव ‘नाना आहेत’ असा भ्रम असतो आणि हे नानात्व जीवाच्या पारतंत्र्याला कारण होते. ॥३२॥
पारतंत्र्यांत राहणार्‍या जीवाला ईश्वरभय असते हे सांगणेच नलगे. गुणवैषम्याची आराधना करणार्‍या लोकांना येथे व स्वर्गात शोक आणि मोह यांच्या ताब्यांत सदैव गुलाम होऊन राहावे लागते. ॥३३॥
आणि वस्तुत: कालादी मजहून निराळे नसता गुणांचा व्यतिकर म्हणजे मायेचा विस्तार झाला की काल, आत्मा, वेद, स्वभाव, धर्म अशी नावे मला -ईश्वराला- संसारी लोक देत असतात. ॥३४॥
उध्दव म्हणाला, हे समर्थ  श्रीकृष्णा ! देहांतच उत्पन्न होणार्‍या गुणांमध्ये वास्तव्य करणारा व वास्तव्य करुनही , स्वतंत्र व स्वयंप्रकाश देही म्हणजे आत्मा, गुणांनी बध्द होत नाही. तो स्वतंत्र म्हणावा तर त्याला बंध कसा प्राप्त होतो ? आणि तो जर बध्द होत असेल, तर त्या बंधांतून सुटण्यासाठी मुमुक्षूने कसे वागावे ? कोणता आहारविहार करावा? त्याने घ्यावे काय ? ते मला कृपा करुन सांग. नित्यमुक्त आत्माच अनादी गुणसंबंधांमुळे नित्यबध्द आहे असा मला भ्रम आहे, त्याचे निवारण कृपा करुन कर. ॥३५-३७॥
अध्याय पांचवा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP