उध्दवगीता - अध्याय आठवा

उध्दवगीता

उध्दव म्हणतो, हे कृष्णा ! ब्रह्मचर्चा करणारे विव्दान्‍ अनेक प्रकारचे मोक्ष व त्यांची अनेक साधने सांगत असतात. तेव्हा ते मोक्ष व तत्साधने विकल्पाने सर्वच मुख्य आहेत की त्यांतील एक मात्र मुख्य असून बाकीची सर्व गौण आहेत? ॥१॥
तू तर ज्यायोगे तुझ्याठायी मन एकचित होते व सर्व आसक्ती दूर होतात असा निष्काम भक्तियोगच ‘मुख्य’ म्हणून सांगितलास. ॥२॥
श्रीभगवान्‍ म्हणतात उध्दवा ! वेद नावाची ही वाणी कालाच्या ओघांत नष्ट झाली. तेव्हा या सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाला वेदवाणीला अनुरुप असाच उपदेश मी केला. ॥३॥
पुढे तो वेद्रप्रणीत धर्म ब्रह्मदेवाने आपल्या पुत्राला म्हणजे मानवांचा पूर्वज अशा मनूला सांगितला. त्या मनूपासून भृगुप्रभृती सप्तर्षींना त्यांस हा धर्म प्राप्त झाला. ॥४॥
त्यांपासून परंपरेने देव, दानव. गुह्यक, मनुष्य, सिध्द, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, किंपुरुष, नाग, राक्षस इत्यादिस हा धर्म प्राप्त झाला . पण सत्त्व, रज, तम या गुणांच्या वैषम्यामुळे या सर्वांच्या प्रकृती व स्वभाव बनेल. ॥५-६॥
या प्रकृतीच्या व स्वभावांच्या वैचित्र्यामुळे त्यांच्या बुध्दीतही फरक पडला म्हणून अर्थातच प्रकृतीच्या भिन्नतेमुळे तशा भिन्न भिन्न वाणीही उदयास आल्या. ॥७॥
याप्रमाणे प्रकृतिवैचित्र्यामुळे मतिवैचित्र्य परंपरेने वाढत गेले. कित्येक पाखंडी म्हणजे नास्तिक बुध्दीचेही झाले. ॥८॥
नरश्रेष्ठ उध्दवा ! माझ्याच मायेने मूढ झालेले पुरुष नाना प्रकारची श्रेये सांगतात. कारण त्यांचे कर्म व त्यांच्या आवडीनिवडी भिन्न असतात. ॥९॥
पहा की, कोणी सकाम धर्माला, कोणी यशाला, दुसरा वासनेला, तिसरा सत्याला, दयेला किंवा शमाला, कोणी स्वार्थाला , कोणी ऐश्वर्याला ,कोणी संन्यासाला, कोणी विषयांच्या उपभोगाला, तर कोणी यज्ञाला,  तपाला, दानाला, व्रताला, नियमाला, यमालाच महत्त्व देतात. ॥१०॥
परंतु उध्दवा ! ध्यानात ठेव की, आताच सांगितलेल्या मार्गांनी उत्पन्न होणारे जे फलप्रद लोक (स्वर्गादि) ते नित्य नाहीत, त्यांना आरंभ अंत आहे. कारण ते कर्मान उत्पन्न झालेले, दु:खस्वरुप , तम:प्रधान , क्षुद्र आनंद देणारे आणि शोकांनी दूषित असतात. ॥११॥
सच्छींल उध्दवा ! ज्याने सर्वथा निष्काम होऊन मला आत्मसर्वस्व अर्पण केले, मदात्मकच जो आनंदरुप झाला , त्याला जे उत्तमोत्तम सुख मिळाले ते विषयोपासकांस केव्हाही मिळत नाही. ॥१२॥
शुध्द चित्त, मद्भक्तीतच संतोष मानणारा माझा भक्त, जरी दरिद्री असला, तरी त्याला सर्वत्र व सर्वदा हे विश्व सुखमयच दिसते; ॥१३॥
माझ्याशिवाय त्याला दुसरे कांही नको असते. तो ब्रह्मदेवाच्या , महेंद्राच्या भुवनांस व तेथील सुखास  तुच्छ मानतो. अर्थात्‍ त्याला पृथ्वीचे चक्रव्रर्तित्व किंवा पाताळाचे आधिपत्य कुच किंमतीच वाटते. तो योगीसिध्दीकडे ढुंकून सुध्दा बघत नाही. फार काय? जन्ममरण नाहीसे व्हावे असे सुध्दा याकडे सुध्दा तो लक्ष देत नाही का हांच माझा परमभक्त होय. मीच त्याला श्रेय सर्वस्व वाटतो. ॥१४॥
उध्दवा ! तू परमभक्त म्हणून मला जसा प्रिय आहेस, तसा माझा मित्र शंकर नाही, माझा पुत्र ब्रह्मदेव नाही,  माझा बंधु बलराम नाही, अर्धांगी लक्ष्मीही नाही. फार काय, माझा आत्माही मला तुझ्याइतका प्रिय नाही. ॥१५॥
बा उध्दवा, निष्काम (काही न मागणारा) , शांत, अव्देष्टा, समदृष्टि अशा माझ्या भक्ताच्या मागे मी नित्य असतो. हेतु हा की, त्याच्या चरणधुलीने मी स्वत: पवित्र व्हावे. ॥१६॥
अत्यंत दरिद्री , परंतु माझ्यावर एकचित्त एकाग्र करणारे शांत, निरभिमानी उदार सर्व लोक मित्र, ज्यांच्या बुध्दीवर कामवासनाचा पगडा नसतो. अशा माझ्या अनन्य भक्तास जे माझे निरपेक्ष- स्वतंत्र -सुखसर्वस्व मिळते, ते इतर बापुडयांस काय ठाऊक? ॥१७॥
इंद्रिये ताब्यात नसलेला माझा भक्त जरी इंद्रियविषयांनी त्रस्त असला तरी प्रगल्भ अशा भक्तीमुळे तो विषयांच्या अधीन होत नाही. ॥१८॥
इंद्रियसुखानी अग्रि चांगल पेटला म्हणजे जसा सर्पणाची राखरांगोळी करतो, त्याप्रमाणे मव्दिषयक भक्ति सर्व पापांची सर्वथा राखच करते. ॥१९॥
निष्काम व ज्ञानयुक्त अशी माझी उज्ज्वल भक्ति माझ्या भक्ताला माझे स्वरुप प्रकट करुन त्याला मद्रूप करते. तसे सामर्थ्य योगाला नाही, सांख्याला नाही, धर्मात, स्वाध्यायात, तपात, त्यागात, कशातही  नाही.॥२०॥
संतांची प्रिय आत्मा आहे. मी श्रध्दायुक्त भक्तीला मात्र वश होतो. माझी एकनिष्ठ भक्ति जन्मानें चांडाळ असणार्‍याला सुध्दा शुध्द करते. ॥२१॥
परंतु माझी भक्ति ज्याला नाही, त्याला सत्य व दया यांनी अलंकृत असलेला धर्म किंवा तप:सिध्द विद्या ह्यापैकी कोणीही पूर्णत:शुध्द करीत नाही. ॥२२॥
उध्दवा ! भक्तीच्या उत्कर्षाने उत्पन्न होणारा सर्वांगावर रोमहर्ष चित्तांचे विरघळणे, नेत्रांतून अश्रुप्रवाह  वगैरे वगैरे अंत:करण प्रेमार्द्र झाल्याची चिन्हे नसतात, त्यांची भक्तिविना वित्तशुध्दि होणार तरी कशी ? ॥२३॥
वाणी सद्रदित झाली आहे, चित्त प्रेमार्द्र झाले आहे, जो प्रेमातिशयाने पुष्कळसा रडत आहे, केव्हा हसत आहे, लज्जा टाकून देऊन गात आहे, नाचत आहे, बागडत आहे , असा माझा एकनिष्ठ भक्त, उध्दवा ! सर्व जगाला शुध्द करतो; ॥२४॥
अग्रीत तापवलेले सुवर्ण आपला मळ टाकून देते, आणि आपले स्वरुप पुन: धारण करते, त्याप्रमाणे माझा भक्त माझ्यावरील भक्तीने आत्मा व कर्मानुशय धुवून मला भजतो. ॥२५॥
माझ्या पवित्र कथांच्या अखंड श्रवणाने माझ्या भक्ताचा आत्मा शुध्द होत जातो,  यांना अंजन घातले म्हणज डोळ्यांस जशा अदृष्ट वस्तू दिसतात, तसेच ज्ञानयुक्त भक्तीचे अंजन मिळाले म्हणजे मनाला व डोळयांनांही अज्ञेय आत्मदर्शन प्रत्यक्ष होते. ॥२६॥
विषयचिंतकांचे चित्त विषयासक्त होते. माझे चिंतन करणार्‍यांचे चित्त नित्य माझ्यातच लीन होऊन मद्रूप होते. ॥२७॥
म्हणून स्वप्नगत मन:कल्पित पदार्थांप्रमाणे मिथ्या असणार्‍या विषयांचे ध्यानभजन सोडून दे; आणि माझीच भावना केल्यामुळे पवित्र झालेले आपले मन माझ्या ठिकाणी स्थिर कर. ॥२८॥
स्त्रियांची व स्त्रैणांची संगती दुरुनच सोडून देऊन मनोजय केलेल्या मद्भक्ताने सुरक्षित अशा एकांतस्थळी उत्साहपूर्वक माझे ध्यान करावे. ॥२९॥
स्त्रियांचा व स्त्रैणांचा समागम पुरुषाला जितके क्लेश देतो व जसा बध्द करतो, तसे क्लेश व तशी बंधने दुसर्‍या कोणत्याही संगतीने होत नाहीत. ॥३०॥
उध्दव म्हणाला , हे कमलनेत्र श्रीकृषणा ! तुझ्या मुमुक्षु भक्ताने तुझे ध्यान कशा पध्दतीने, कोणत्या रुपाने करावे, हे कृपा करुन मला सांग. ॥३१॥
श्रीकृष्ण म्हणतात, उध्दवा , सम पातळीवरील सुखासनावर बसून (शिर, नेत्र व छाती एका रेषेत आणावी.) हात मांडीवर ठेवावेत व दृष्टी नाकाच्या शेंडयावर लावावी. ॥३२॥
नंतर पूरक, कुंभक,रेचक करुन अथवा रेचक, कुभक व पूरक करुन प्राणाच्या गमनाचा मार्ग शुध्द करावा; जितेंद्रिय असावे. ॥३३।
नंतर हृदयामध्ये ऊँकाराचा घंटेच्या नादाप्रमाणे जो अखंड नाद होत असतो, त्याला शुध्द मार्गाने वर चढणार्‍या प्राणाने प्रकट करावे, ऊँ कारध्वनी स्पष्ट करावा आणि वर आज्ञाचक्रापर्यत प्राण नेऊन (कमलनालाप्रमाणे) तेथे ऊँकाराला स्वरयुक्त करावे. ॥३४॥
अशा प्रकारे प्रणव म्हणजे ओंकारयुक्त प्राणायामाचा चांगला अभ्यास करावा. चांगला म्हणजे प्रत्येक संधिकाळी (प्रात:काल, मध्याह आणि सायंकाळी) दहा वेळा ऊँ सह  प्राणायाम (पुरक, कुंभक आणि रेचक आणि फिरुन रेचक , कुंभक आणि पूरक मिळून एक आपल्या ताब्यांत येईल. ॥३५॥
याप्रमाणे प्राण ताब्यांत आल्यावर आपल्या देहांत जे हृत्कमल आहे, त्याचा नाल म्हणजे दांडा ऊर्ध्वगामी आहे आणि ते कमल अधोमुख आहे,  अथवा नाळ अधोगामी आहे व कमळ ऊर्ध्वमुख असून ते पूर्ण उमललेले आठ दळांचे आणि सकर्णिक आहे असे पीठाचे ध्यान ठरवून त्या कमलाच्या कर्णिकेत सूर्य, सोम, अग्नी, यांची क्रमश; स्थापना करावी. नंतर त्या अग्नीमध्ये माझ्या मंगलस्वरुपाचे ध्यान करावे. ॥३६-३७॥
जे स्वरुप देदीप्यमान आहे व जे समप्रमाण अवयवी, प्रशांत, प्रसन्नमुख असून ज्यास चार हात आहेत, ज्याची ग्रीवा रम्य असून ज्याच्या सुवर्णासारखा पितांबर धारण केला असून ज्याचा वर्ण मेघाप्रमाणे श्याम आहे, आणि ज्याची छाती श्रीवत्स चिन्हाने शोभते, लक्ष्मीचे जो निवासस्थान आहे, ज्याने आपल्या हातांत शंख, चक्र, गदा , पद्म, वनमाला इत्यादी धारण केली आहेत, ज्याच्या चरणामध्ये नूपर रुणझुणत आहेत, ज्यांचे कंठांत्य कौस्तुभ रत्न विलसत असून तेजस्वी मुकुट, कडी, कटिसूत्र , बाहुभूषणे इत्यादी भूषणांनी ज्याचे सर्वांग भूषित झाले आहे, ज्याचे मुखावर हास्य विलसत असून ज्याची दृष्टी प्रसन्न आहे. अशा या कोमल, सुकुमार स्वरुपांतील प्रत्येक अवयवावर मन एकाग्र करावे. पण प्रथम इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रिये निवृत्त करुन घ्यावीत . नंतर बुध्दीला सारथी करुन तिच्या साह्याने हे आपले मन, योगभक्ताने माझ्या स्वरुपाचे ध्यानात स्थिर करावे. ॥३८-४२॥
ते सर्वांगव्यापक चित्त त्या त्या अंगापासून निवृत्त करुन दुसर्‍या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सुहास्यवदनाचे ध्यान करावे. ॥४३॥
हे मुख ध्यानात ठीक ठसले म्हणजे त्यावरुन चित्त काढावे आणि शून्याकाशाचे ध्यान करावे. नंतर तेही मागे टाकून द्यावे आणि माझ्या स्वरुपी तल्लीन झालेल्या ज्ञानपूर्ण भक्तियोगाने काही सुध्दा चिंतू नये. ॥४४॥
याप्रमाणे समाधिस्थितीतील योग्याला ‘मी परमेश्वर व जीवात्मा हे सर्वात्मक परमात्मस्वरुपामध्ये समरस झाली की ब्रह्मात्मैक्य झाले. ॥४५॥
अशा प्रकरच्या शुध्द व कडकडीत ध्यानाने आपले मन युक्त केले म्हणजे लवकरच द्रव्य, ज्ञान , कर्म याविषयी संसारस्थितीत जो भ्रम असतो, तो निघून जातो. ॥४६॥
अध्याय आठवा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP