उध्दवगीता - अध्याय तिसरा

उध्दवगीता

अवधूत म्हणाले राजा ! स्वर्गामध्ये काय किंवा नरकलोकी काय, कोणतेही इंद्रियजन्य सुख दुख:प्रदच असते. म्हणून शहाण्या पुरुषाने इंद्रियजन्य सुखाची इच्छा करु नये. ॥१॥
यदृच्छेने हाताशी आलेले भक्ष्य गोड असो वा नसो, थोडे असो बहुत असो,  स्वस्थ पडलेला अजगर समाधानाने त्याचा स्वीकार करतो. ॥२॥
नाहीच काही मिळाले तर तो स्वस्थ पडून राहतो. पण अजगर स्वत: उठून कधी भक्ष्य मिळवीत नाही. भोंगासंबंधाने ही निरलस उदासीनता अजगरापासून शिकावी. ॥३॥
इंद्रिये सतेज असून, मन:शक्ती व शारीरिक शक्ती खंबीर असूनही मुमुक्षू इंद्रियशांतीसाठी काही एक न करता अजगरासारखा स्वस्थ पडून राहतो, पण झोप घेत नाही. मुनी आत्मध्यानांत निमग्र असतो. ॥४॥
समुद्र सर्वदा प्रसन्न, गंभीर, इंद्रियांस अगोचर, दुस्तर, अनंत,अपार, निर्विकार, शांत असतो. नद्यांच्या पुरांनी समुद्रात पाणी आले नाही तरी तो रोडावत नाही तसेच नारायण भक्ताने असावे. सारांश समुद्राप्रमाणे मुनीने रहावे ॥५-६॥
स्त्रियांचे सौदर्य व त्याचे हावभाव पाहून लुब्ध होणारा कामवश कामुक पतंग ज्याप्रमाणे अग्निकडे झेप घेतो त्याप्रमाणे तो तिकडे झेपावतो आणि स्त्रीसौदर्य , सोने, अलंकार, वस्त्रे, द्रव्य इ. मायामोहात उभोग वृत्तीने गुरफटून पतंगाप्रमाणे नष्ट होतो. ॥७-८॥
मधुकर फुलांतील मधाचा एक एक (कण) थेंब मात्र घेतो. पण तो कोणत्याही फुलाला दुखवीत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीरधारणेसाठी थोडे थोडे अन्नसेवन करीत जावे. घराचा नाश न करण्याचा गुण मधुकराक- पासून मुनीचे घ्यावा. ॥९॥
त्याचप्रमाणे पुष्प लहान असो , मोठे असो, मधुकर यांतून सार तेवढे काढून घेतो. शास्त्र लहान असो , मोठे असो, त्यातून सार जे  असेल तेवढेच घ्यावे. ॥१०॥
(भविष्यकाळासाठी मधुमक्षिका मधाचा संग्रह करते, पण अखेरीला फसते. कोणी तरी तिच्या संग्रहावर हल्ला करतो आणि तिला ठार करुन तिचा संग्रह घेऊन जातो ! ) मुनीने दुसर्‍या दिवसासाठी फार तर काय, पण संध्याकाळसाठीसुध्दा काही शिल्लक ठेवू नये. त्याच्याजवळ भांडे सुध्दा असू नये. करतलभिक्षा (तळहातावर राहील इतकीच भिक्षा ) त्याने घ्यावी. तात्पर्य संग्रह करु नये. मधमाशीप्रमाणे संग्रह इतकीच भिक्षा) त्याने घ्यावी. तात्पर्य संग्रह करु नये. मधमाशीप्रमाणे संग्रह करीत गेले, तर त्यासह माणसाचा नाश होतो. ॥११-१२॥
मुनीने लाकडी बाहुलीलासुध्दा स्पर्श करु नये. स्पर्श केला असता हत्ती जसा लाकडी हत्तिणीशी अंगसंग करुन बंदीत सापडतो त्याप्रमाणे तो फसतो. ॥१३॥
प्राज्ञ मुनीने केव्हाही स्त्री- समागम करु नये.  अन्यथा हत्ती ज्याप्रमाणे दुसर्‍या हत्तीकडून मारला जातो तसा तो बलवानाकडून नष्ट होतो. ॥१४॥
कृपण कष्ट सोसून धनसंग्रह करतो. तो कोणाला कांही देत नाही; स्वत:ही उपभोग घेत नाही ? पण परिणाम काय ? दुसराच कोणी चोर अथवा राजा ते धन घेऊन जातो. मधाची पोळी धुंडणारा भिल्ल. मधमाशांनी न खाता व न देता जमविलेली मधाची पोळी लुटून  नेतो. (हे मी पाहिले; आणि आपल्यास मिळाले असेल, त्यांतील काही भाग दुसर्‍या अनाथाला द्यावा असे ठरविले.) तसेच कोणी गृहस्थ कष्टार्जित द्रव्य खर्चून मोठया आसोशीने आवडीचा पाक सिध्द करतात; पण अतिथि येतो आणि कल्याणेच्छु गृहपति तो पाक त्या आगंतुकाला अर्पितो. सारांश , कांही खटपट न करिता अतिथीला अन्न मिळाले. ॥१५-१६॥
पारध्यांचे गीत ऐकून नादलुब्ध हरिण बंदीत पडतो. मृगीचा मुलगा ऋष्यशृंग ऋषि वेश्यांची असली मोहक गाणी व सुस्वर वाद्ये ऐकून व त्यांचे हावभावयुक्त नृत्य पाहून त्यांच्या हातातले खेळणे झाला. तात्पर्य, विकारोत्तेजक गाणे बजावणे वनात राहणार्‍या यतीने केव्हाही ऐकू नय (हा धडा मी हरिणापासून शिकलो.) ॥१७-१८॥
आमिष लावलेला गळ आमिषाच्या आशेने मासा पकडतो व गळात सापडून पुढे मरतो. राजा ! रसनेंद्रिय मोठे अनावर आहे.जिह्वालौल्याच्या स्वाधीन जीव झाला की मेलाच समज. रसनेशिवाय बाकीची सर्व इंद्रिये वश होतात. पण जीभ वश होणे कठिण . इतर इंद्रियांस त्यांचे विषय दिलेच नाहीत, तर ती क्षीण होतात, पण जीभेचे सर्व उलट ! निराहार करणार्‍यांची जीभ फारच वळवळते ! म्हणून रसना जोपर्यंत हाती आली नाही, तोपर्यंत जितेंद्रियत्व मिळत नाही. रसना जिंकली की सर्व इंद्रिये वश होतात. रसना ताब्यात ठेवली नाही तर मरण येते,( हे मी जळांतील माशापासून शिकलो.) ॥१९-२१॥
अध्याय तिसरा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP