उध्दवगीता - अध्याय सहावा

उध्दवगीता

श्रीभगवान्‍ म्हणतात, उध्दवा ! बध्द व मुक्त हे शब्द माझ्या संबंधाने उच्चारितात. परंतु ‘ आत्मा बध्द आहे, तो मुक्त होतो’ हे म्हणणे माझ्या स्वाधीन असलेल्या मायागुणांनी उत्पन्न होते. वस्तुत: मी (आत्मा) बध्दही नाही व मुक्तही नाही. कारण , हे सर्व गुण मायेचे होत, आत्म्याचे नव्हेत. (अर्थात्‍ त्याला बांधमोक्ष मुळीच नाहीत. ) ॥१॥
शोक-मोहांची जोडी, सुख , दु:ख, देहाची उत्पत्ती आणि मरण, ही सर्व मायेने उत्पन्न होतात. स्वप्नांतील शोक- मोहादी जसे मायिक, मिथ्या, तसेच जागृतीतीलही होत . हा सर्व संसार आत्म्यावर आरोपित आहे. हा संसार वास्तविक पाहतां सत्य नाही. ॥२॥
उध्दवा, माझ्याच मायेने निर्माण केलेली विद्या व अविद्या ही जोडी म्हणजे माझ्या आविर्भावाच्या दोन शक्ती होत. या संसारी दृष्टीने
आद्य, परंतु आत्मदृष्टीने अनिर्वचनीय म्हणून अनादी आहेत. अविद्या व विद्या यांची जोडी बंधमोक्ष उत्पन्न करिते व अज्ञानी व ज्ञानी देहधारी जीव बध्द व मुक्त होतात. ॥३॥
हे बुध्दिमान उध्दवा, माझ्याच एका मात्र अंशाने स्थित असणार्‍या या जीवाला अविद्येमुळे अनादी बंध असतो व विद्येमुळे जीव नित्यमुक्त असतो. ॥४॥
आता विरुध्दधर्मी असणारे हे बध्द व मुक्त एकाच जडांत म्हणजे देहांत राहून परस्परांहून किती विलक्षण्स , निराळे असतात, आणि उभयतांच्या शरीराचा धर्म एकच, परंतु विद्या व अविद्या यांनी विलक्षणता उत्पन्न केल्यामुळे मुक्त व बध्द दक्षिणोत्तर ध्रुवांप्रमाणे परस्पर कसे विलक्षण होतात, ते हे मद्भक्ता वत्सा उध्दवा, तुला सांगतो. ॥५॥
शरीरत: एकासारखे एक असणारे, नित्य एकत्र रहाणारे हे दोन पक्षी (एक जीव व दुसरा ब्रह्म) स्वेच्छेने एकच वृक्षावर घरटी करुन राहतात. त्यांतील एक (जीव० पिप्पलान्नाचा (वृक्षफलाचा ) उपभोग घेतो व दुसरा (शिव) ब्रह्म काही खात नाही तरी बळाने अधिक असतो. ॥६॥
अन्न भक्षण न करणारा विव्दान्‍ आपण ( आत्मस्वरुपत:) निराळे आहो, अन्नाचा आपला संबंध नाही असे जाणतो व अज्ञानी जीव आपण अन्नसंबंधी आहो असे समजतो. अर्थात्‍ जो विव्दान्‍ असतो तो नित्यमुक्तच असतो; परंतु जो अविव्दान्‍ मायावश असतो तो मात्र नित्यबध्द असतो. ॥७॥
स्वप्नातून जागा झालेल्या पुरुषाला ठाऊक असते की, स्वप्नात जो देह आपण पाहिला, त्या देहांत आपणच होतो, असे स्वप्नांत जरी वाटत होते, तथापि तो देह आपला नव्हता. याप्रमाणेच विव्दान्‍ पक्केपणी समजतो की देहात आपण असलो, तरी आपले  देही हे स्वरुप नसून आपण स्वरुपत: अशरीरीच आहो. परंतु कुमति जो आहे, त्याला वाटते की आपण देहीच आहो. ॥८॥
आपली इंद्रिये आपापले विषय घेत असता व सत्त्व, रज व तम हे गुण सुखज्ञान, दु:ख, कर्म , आळस व अज्ञान , ही उत्पन्न करीत असता जो विव्दान्‍ म्हणून निर्विकार आहे त्याने अहंभाव धरु नये, व तो या इंद्रियविषयांचे व सुखदु:खाचे ठिकाणी अहंभाव धरीत नाही. तो अनासक्त असतो किंवा अहंभाव न धरल्यामुळे अविकृत, शुध्द राहतो. ॥९॥
दैवाने म्हणजे पूर्वजन्मार्जित प्रारब्धामुळे जे शरीर प्राप्त झाले, त्यात राहणारा अज्ञानी, गुणजन्य म्हणजे गुणानी मात्र उत्पन्न झालेल्या कर्मांचा आपणच कर्ता आहो असे समजतो. ॥१०॥
विरक्त पुरुष निजणे, बसणे, फिरणे, स्नान करणे इत्यादि कर्मांमध्ये व पहाणे. स्पर्श करणे- गंध -भोजन- श्रवण इत्यादि इंद्रियजन्य ज्ञानांमध्ये अज्ञानी मनुष्याप्रमाणे आसक्त असत नाही. संसारी जीवाप्रमाणेच जीवन्मुक्तही विषयांचा उपभोग घेतो, परंतु घटामध्ये राहूनही आकाश जसे परिच्छिन्न होत नाही, पाण्यात प्रतिबिंबित होऊनही जलतरंगाबरोबर सूर्यबिंब हालत नाही, किंवा जाईजुईच्या ताटव्यावरुन येणारा वाराही स्वरुपत: गंधयुक्त होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष प्रकृतीत राहून विषयसेवन करित असताना, मनाला सुखदु:ख होते, मला नाही असे जाणतो. म्हणून तो बध्द होत नाही.॥११-१२॥
(वासनाक्षय आणि अभिमानशून्यता प्राप्त झाल्यामुळे) निर्मळ व स्वच्छ झालेली जी बुध्दिशक्ती तिच्या सामर्थ्याने मुमुक्षु अनेकपणापासून निवृत्त होतो. जागा झालेला पुरुष जसा स्वप्नांतील विषय खोटे असा निश्चय करतो, तसाच अज्ञानांतून बाहेर आलेला मुमुक्षु ‘एकच एक अव्दितीय आत्मा आहे, देहादि विषय व विश्व मुळीच नाहीत’ असा निश्चय करतो. ॥१२-१३॥
याप्रमाणे बुध्दिप्रभृति सर्व इंद्रियें संकल्पशून्य झाली, या इंद्रियांच्या वृत्तीही विषयशून्य झाल्या म्हणजे मुमुक्षु जीवन्मुक्त होतो. तो देहात राहतो व जगात वावरतो खरा; परंतु देहादी दृश्याचे गुण त्याला मुळीच बाधक होत नाहीत. ते त्याला सोडून जातात. ॥१४॥
त्याला कोणी दुष्टांनी त्रास दिला, तरी त्याला त्या निंदास्तुतीपासुन मुळीच विकार होत नाही. कोणी इजा केली किंवा निंदिले तरी विषाद नसतो व कोणी वंदिले म्हणून तो आनंदीही होत नाही. ॥१५॥
कोणी त्याला चांगले केले किंवा काही दिले, तर तो कोणाची स्तुति करित नाही; किंवा कोणी वाईट केले वा निंदिले, तर त्या दुष्टाची निंदाही करीत नाही. ॥१६॥
जो खरा मुनी आहे, तो निजानंदात लीन असतो म्हणून तो काही भले- बुरे करीत नाही, बोलत नाही, चिंतीतही नाही. जसा अचल पदार्थ असतो, त्याप्रमाणे जीवन्मुक्ताने नि:संगवृत्तीने असावे. ॥१७॥
वेदवेदांताची शाब्दिक चर्चा करणारा मोठा पंडित झाला, पण ह्या पंडिताने कर्मयोग ज्ञानयोग वगैरे चित्तशोधक साधनांनी व पुढे श्रवणादिकांनी ब्रह्मसाक्षात्काराची खटपट केली नाही, तर त्याची ही सर्व तयारी, त्याचे बोलघेवडे पांडित्य व्यर्थ  आहे. एखाद्याने दुधासाठी जर भाकड गाय पाळली तर त्याच्या पदरी तिला पाळण्याच्या श्रमावांचून दुसरे कोणते फल पडावयाचे आहे ! ॥१८॥
भाकड झालेली गाय किंवा दुष्ट भार्या किंवा सर्वथा पराधीन झालेला देह, दुष्ट संतती, कृपणाचे धन किंवा ईश्वराचे गुणसंकीर्तन न करणारी वाणी, ह्यांचे जतन करण्याने, ह्या सर्व गोष्टी दु:खाला मात्र कारण होतात. ॥१९॥
माझी पवित्र चरित्रे अथवा जगत्कल्याणकारी माझे अवतार भक्तिपूर्वक अखंड संकीर्तन करण्यात जी वाणी रममाण होत नाही, ती वंध्या स्त्रीप्रमाणे व्यर्थ होय. ॥२०॥
असो: याप्रमाणे आत्मज्ञानाची इच्छा करणार्‍या मुमुक्षु भक्ताने शास्त्राभ्यासाने विश्वांतील अनेकत्वाचा निरास करावा, चित्त शुध्द (निर्मळ) करावे, सर्वगामी अशा मला मन समर्पित करुन बाह्य विश्वापासून निवृत्त होऊन आत्मस्थितीमध्ये सदैव असावे. ॥२१॥
जर चंचल मनाला ब्रह्मामध्ये मन स्थिर करता येत नसेल, तर कर्मे करशील ती निरपेक्ष बुध्दीने मला अर्पण कर. ॥२२॥
माझी जी पापहारक मंगल चरित्रे आहेत; त्यांच्या कथा श्रध्दावान्‍ होऊन ऐकत जा. माझी चरित्रे गात त्यांचे ध्यान निरंतर कर आणि मी कसे अवतार घेतले, काय कार्ये केली हे सर्व प्रकट कर. ॥२३॥
मला अनन्यशरण ये , मलाच तुझी धार्मिक, ऐच्छिक व आर्थिक कृत्ये समर्पण कर, माझ्यासाठी तू ही धर्मादी तीन पुरुषार्थांचीं कर्मे कर, म्हणजे उध्दवा ! पुराणपुरुष जो मी त्या माझ्या ठिकाणी तुला अढळ भक्ती प्राप्त होईल्ल. ॥२४॥
साधुसमागमाने माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती नित्य स्थिर झाली , जो माझीच दृढ उपासना करु लागला, त्याला संतांनी अत्यंत प्रेमाने गाईलेले (वैकुंठ, मोक्ष) सहज म्हणजे सुलभतेने मिळते. ॥२५॥
उध्दव म्हणाले, हे उत्तमश्लोका ! पुण्यश्लोका ! जगदीश्वरा ! तुला मान्य असलेला साधु असतो कसा आणि त्या त्या संताने आदराने  स्वीकारलेली भक्ती कोणत्या प्रकारची असली म्हणजे तुझ्या प्राप्तीला उपकारक होते, ते हे भगवन्‍, पुरुषोत्तमा, कृपा करुन तुला शरण आलेल्या तुझ्यावर अनुरक्त असलेल्या नम्र अशा मला सांग. ॥२६-२७॥
तू शुध्द अव्यक्त व अक्षर ब्रह्म, आकाशच, प्रकृति नव पुरुष यांच्या पलीकडचा व प्रकृति -पुरुषांचा स्वामी आहेस आणि तू आपल्या स्वेच्छेनेच अवतार घेऊन हे व्यक्तिस्वरुप धारण केले आहेस. ॥२८॥
श्री भगवान्‍ म्हणतात, दयाळू सहनशील, समवृत्तीचा, लोक संग्राहक निष्काम म्हणून निर्मळ बुध्दीचा, इंद्रियदमन केलेला , मृदू, शुध्दाचारी, दारासुतांचा परिग्रह नसणारा, निरिच्छ, अल्पाहारी, शांत, स्थिर, सावध, गंभीर, धैर्यवंत, कमी खाणारा, ज्याने सहा गुणावर विजय मिळविलेला आहे असा, मान देणारा निरभिमानी, जगन्मित्र,  करुणाहृदयी, साक्षात्कारी श्रुतिप्रणीत सर्व वर्णाश्रमधर्मांचे गुणदोष जाणून त्यांचा यथाप्रसंग त्याग करणारा व माझी आराधना अढळ चित्ताने व अनन्य भावाने करणाराच साधू माझा उत्तम भक्त होय. ॥२९-३२॥
मी (परमेश्वर) कोण, कसा, केवढा आहे हे जाणणारे असोत अथवा नसतो अथवा वारंवार जाणून किंवा न जाणूनहि जे माझी मात्र आराधना अनन्य भावाने करतात, ते खरे भक्तोत्तम मला आवडतात. ॥३३॥
उध्दवा ! माझ्य मूर्तीचे व माझ्या भक्तांचे सादर दर्शन घेणे, त्यांचे चरणांवर मस्तक ठेवून त्यांस आलिंगण देणे, त्यांची सेवा, स्तुती करणे, नम्रतेने त्यांचे गुणकर्मांचा (चरित्रांचा) जप करुन संकीर्तन करणे, माझ्या कथा श्रध्देने ऐकणे, माझे ध्यान करणे, मला सर्व अर्पण करणे, माझे दासत्व पत्करुन आत्मनिवेदन करणे, माझ्या जन्माच्या व चरित्रांच्या कथा सांगणे,  गीत , नृत्य, वादन, कथा यांच्या साह्याने माझ्या देवालयांत जन्मकाळचे उत्सव करणे, आणि मी पवित्र केलेल्या तीर्थांची सर्व पर्वकाळी यात्रा करणे, मला फुले, तुळसी, नेवेद्य अर्पण करणे, वेदविहित दीक्षा घेऊन माझे व्रत धारण करणे ही भक्तीची लक्षणे होत. ॥३४-३७॥
माझी पूजा अर्चा करण्याविषयी श्रध्दा ठेवून अशी स्थळे निर्माण करणे, क्रीडांगणे -नगरे -मंदिरे करण्याच्या कामी स्वत: व दुसर्‍यांच्या  साह्याने उद्योग करणे,- ॥३८॥
सडासंमार्जन व सारवण यांच्या योगे आणि सुंदर कारंजी, सुंदर रांगोळ्या इत्यादिकांच्या योगे माझ्या देवालयांची सेवा करणे निष्कपटपणे माझे दास्य पत्करण, - ॥३९॥
निरभिमानता, भोंदूपणाचा सर्वस्वी अभाव, स्वकृतीसंबंधाने मौनव्रत, मला अर्पिलेल्या कोणत्याही वस्तूचा, फार काय पण दिव्याच्या प्रकाशाचाही आपल्या कामी उपयोग न करणे, -॥४०॥
सारांश जे जे प्रिय म्हणून प्रसिध्द आहे, जे जे स्वत:ला अत्यंत प्रिय असत, ते मला परमेश्वराला- निष्काम भक्तीने अर्पण केले असता मोक्षासारखे अनंत काल परमानंद (चिदानंद) देणारे फल मिळते. ॥४१॥
उध्ववा ! सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गायी, वैष्णव, आकाश, वायू, जल , भूमी, आत्मा व सर्व भूते (प्राणिमात्र) ही माझ्या मंगलपूजेची स्थाने होत. ॥४२॥
तिन्ही वेदांतील वेदमंत्रांच्या साह्याने सूर्यामध्ये, हविर्भाग देऊन अग्नीमध्ये, स्वागत करुन ब्राह्मणश्रेष्ठांच्या मूर्तीत, चार घालून धेनूंत, बंधुप्रेमाच्या सत्काराने वैष्णवंत, नैष्ठिक ध्यानाने हृदयकाशांत प्राण हाच मुख्य वायू असे समजून वायूंत, तीळतांदूळ घालून जलाच्या तर्पणरुपाने जलाशयांत रहस्यपूर्ण मंत्रसाह्याने स्थंडिलांमध्ये (भूमीत), आत्म्याला भोग्य विषय अर्पून स्वत:च्या आत्म्यांत, सर्व वस्तूचे ठायी क्षेत्रज्ञ परमेश्वर आहे असे जाणून सर्व भूतमात्रांत मला पहा; आणि माझे पूजन कर. ॥४३-४५॥
‘या स्थानांमध्ये’ शांत वृत्ती ठेवून ज्याच्या चारही हातांत शंख, चक्र , गदा व पद्म अशी चार आयुधे आहेत, व ज्याचे स्वरुप शांत आहे, असे ध्यान करावे व याप्रमाणे माझी पूजा करावी. ॥४६॥
याप्रमाणे इष्टापूर्तीने म्हणजे यज्ञ व सामाजिक कार्य असे जे समाधान, त्या समाधानाने जे माझे अहर्निश यजन करतात, त्या सर्वांस माझ्या ठिकाणी उत्तमोत्तम भक्ती उत्पन्न होते. आणि साधु- सेवा केली असता माझे स्मरणही त्यांस अखंड रहाते. ॥४७॥
उध्दवा ! सत्संगतीमुळे भक्तियोग साध्य होऊन दृढ होतो आणि तदनुसार एकनिष्ठेने आचरण केले असता भवसागर तरण्याचा मार्ग सुलभ होतो. अन्य चांगला उपायच नाही. संतांस माझा सतत आश्रय असतो म्हणून संतसंगती अवश्य हवी. कारण मी तेथे असतोच. ॥४८॥
यानंतर अत्यंत गुप्त असे एक रहस्य, उध्दवा ! यादवा ! तुला सांगतो, ते ऐक. हे रहस्य यद्यपि प्रकट करण्यासारखे नाही, तथापि तुला मी ते सांगतो, याचे कारण तू माझा अनन्य भक्त, माझा मित्र आणि माझा प्रिय अनुयायी आहेस. ॥४९॥
सहावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP