उध्दवगीता - अध्याय सातवा

उध्दवगीता

श्री भगवान्‍ म्हणाले, उध्दवा ! योग, सांख्य, स्ववर्णाश्रमाचरण , वेदाभ्यास, तपश्चर्या, इष्टापूर्त, दक्षिणा, ही मला वश करु शकत नाहीत. ॥१॥
त्याचप्रमाणे व्रतवैकल्ये, यज्ञ, मंत्रतंत्रादि, तीर्थयात्रा, यमनियमांचे पालन यांच्या योगेही माझा अनुग्रह प्राप्त होत नाही.परंतु सर्व आसक्तींचा उच्छेद करणारी सतसंगतीच मला भक्तांचा दास करिते. सत्संगाव्यातिरिक्त सर्व व्यर्थ आहे. ॥२॥
निष्पाप  उध्दवा ! वृत्र, प्रल्हाद, वृषपर्वा, बलि, बाण, मयासुर, विभीषण यांसारखे दैत्य- राक्षस, सुग्रीव, हनुमान  यांसारखे वानर व जाबुवंतासारखे अस्वल जटायुसारखे गिधाड, पक्षी, तुलाधारासारखे वैश्य, धर्मव्याधासारखे अंत्यज (अस्पृश्य), कुब्जा दासी, गोकुळांतील गोपी, याज्ञिकांच्या बायका, गंधर्व, अप्सरा नाग, सिध्द, चारण, गुह्यक, विद्याधर, हे व आणखी दुसरेही रजोगुणी व तमोगुणी जीव त्या त्या युगांत संतसंगती करुन संतांच्या कृपेमुळे मत्पदाला येऊन पोहोचले. ॥३-६॥
ह्या वर सांगितलेल्या महाशयांनी वेदाध्ययन केले नव्हते किंवा कोणा शास्त्रवेत्त्या गुरुची अथवा अतिश्रेष्ठ देवदेवतांची उपासनाही केली नव्हती; त्यांस उपयोगी पडला ते मुक्त झाले. ॥७॥
गाई, गोप, वृक्ष , मृग, सिध्द आणि दुसरे अनेक जडबुध्दीचे जीव केवळ एका सत्संगाने प्रेमश्रध्देने माझ्याजवळ सहज येऊन राहिले. ॥८॥
उध्दवा ! मोठया दीर्घप्रयत्नाने सांख्य व योग यांत नैपुण्य मिळविले, दाने दिली, व्रते केली, तपस्या केली, यज्ञ संपादले, प्रवचने केली, वेदाभ्यास केला,  संन्यासही घेतला, तरी जे पद मिळत नाही, ते पद एका सत्संगतीने मिळते. ॥९॥
अक्रूराने मला बलरामासह मथुरेस नेण्यासाठी रथात बसविले, त्यावेळी माझ्या ठिकाणी प्रेमसर्वस्वाने आपले पूर्ण चित्त ज्या गोपींनी अर्पण केले होते त्या गोपींना माझा वियोग होणार हे पाहून त्यांना दारुण शोक झाला. त्यांना वाटले की , श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणीही आपणास सुखसाधन होणे शक्य नाही. ॥१०॥
वृदावनात राहणार्‍या व गोपींच्या मनात अत्यंत प्रेमाचे स्थान असणार्‍या गोपींना माझ्यासह रासक्रीडा करतानाच्या अर्ध्या क्षणासारख्या वाटलेल्या रात्री माझा विरह झाला तेव्हा अनेक युगांप्रमाणे भासल्या. ॥११॥
त्या गोपींचे अंत:करण माझ्यावरील उत्कट प्रेमामुळे इतके समरस झाले होते की, त्यांस जवळ दूर हा भेद राहिलाच नव्हता. समाधीत असणारे मुनी जसे किंवा सागराशी समरस झाल्यानंतर नद्या जशा आपले नाव व स्वत:चे रुप टाकून देतात. ॥१२॥
त्या गोपींना काही आत्मज्ञान नव्हते. मी ब्रह्मरुप; पण त्यांनी माझ्यावर मी त्यांचा रमण , त्यांचा उपपती अशी प्रेमपूर्ण नैष्ठिक दृष्टी अखंड ठेवली म्हणून माझ्या नित्य संगतीने; हजारो प्रकारांनी माझी संगती होऊन त्यांस ब्रह्मपद मिळाले. ॥१३॥
म्हणून उध्दवा ! तू कर्म करण्यास सांगणार्‍या श्रुतीचा, विधिनिषेधांचा, श्रवणश्राव्यांचा सर्वथा त्याग कर. ॥१४॥
आणि सर्व जीवांचा नियंता जो मी त्याला सर्व तन- धन- मनाने आणि पूर्ण श्रध्देने शरण ये. म्हणजे तुला मग मुळीच भय उरणार नाही . ॥१५॥
उध्वव म्हणाला, हे योगेश्वरांच्या प्रभो ! मी तुझे भाषण लक्षपूर्वक ऐकले; पण माझ्या मनातील संशय काही जात नाही. त्यामुळे माझे मन गोंधळून गेले आहे. ॥१६॥
श्री भगवान्‍ म्हणाले, अव्यक्त व अक्षर ब्रह्म स्वसृष्ट शरीरात शिरुन ते प्रकट होताना त्याने नाद व प्राण या उपाधींचे ग्रहण केले होते. असो; त्या जीवाला वाणीचे व प्राणापानादिकांचे उपाधियोगे व्यक्त म्हणजे स्थूलरुप प्राप्त झाले. ॥१७॥
आकाशामध्ये अति सूक्ष्म- अव्यक्त स्वरुपाने असणारी जो अग्री त्याला ‘ऊष्मा’ म्हणता. तोच अग्री लाकडातही उष्म्यारुपाने असतो. दोन लाकडे एकमेकांवर जोराने घासली व त्यांचा सखां जो वायू त्याचे थोडेसे उपकारक साह्य मिळाले म्हणजे स्फुलिंगाच्या रुपाने तो अव्यक्त अग्री (ऊष्मा) व्यक्त म्हणजे प्रकट होतो. त्या स्फुलिंगाला आहुतींचे खाद्य मिळाले म्हणजे तोच ज्वालारुपी होतो. अशाच प्रकारे माझी वाणी व्यक्त होते. तसेच कर्मेद्रियांच्या , शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध हे विषय अनुक्रमे असणार्‍या कर्ण, त्वचा, नेत्र, जिह्वा, नाक या ज्ञानेद्रियांच्या, तसेच संकल्पात्मक मनाच्या, विज्ञानात्मक बुध्दीच्या, अभिमान धरणार्‍या अहंकाराच्या, सूत्रात्मकत्व असणार्‍या प्रधानाच्या उत्क्रांतीसंबंधाने वरील प्रकारे आहेत. हे सर्व मीच उत्क्रांत होऊन विश्वरुप धारण केले आहे. आणि विश्व सत्त्व, रज आणि तम यांच्या विकारांनी नामरुपाला येऊन प्रकट झाले आहे. ॥१८-१९॥
उध्दवा ! एकच शुध्द जीव (आत्मा) सत्वादी तीन गुणांचा आश्रय झाला म्हणजे जो एकच एक अव्दितीय अव्यक्त अनादी अनंत होतो तो गुणाश्रित होताच कालभावाने ब्रह्मांडाचा जनक होऊन ब्रह्मांड झाला. भिन्न भिन्न शक्ती आविर्भूत होऊन तो अनेक झाला आहे.एकाच बीजाला क्षेत्र सुपीक मिळाले अनेकत्व प्राप्त होते ते आपण पाहतोच. ॥२०॥
तंतूच्या ताणाबाणांमध्येच जसे वस्त्र असते, त्याचप्रमाणे ह्या एका जीवामध्येच (ब्रह्मामध्येच) हे निखिल विश्व ओतप्रोत भरलेले आहे. आत्मव्यतिरिक्त ते नाही. वस्तुत: ब्रह्मस्वरुपी असताही हा व्यक्त आणि क्षर संसारवृक्ष, पुरातन, कर्मजन्मा व कर्मफली आहे. ॥२१॥
संसारवृक्षाची पुण्य व पाप ही दोन बीजे, शेकडो वासना या मुळ्या, सत्त्व - रज- तम ही कांडे (नाळ), महाभूते हे स्थाणु, शब्द- स्पर्श-रुप-रस-गंध हे या संसारवृक्षापासून पाझरणारे रस, पांच ज्ञानेंद्रिये, पांच कर्मेंद्रिये व मन ह्या अकरा फांद्या, जीव आणि शिव या दोन पक्ष्यांची या वृक्षावरील दोन घरटी, त्वचेच्या आत असणारी वात- पित्त-कफ या आतल्यासाली आणि सुख व दु:ख ही फळे असून हा संसारवृक्ष अंतर्बाह्य व्यापून सर्व ब्रह्मांडभर पसरलेला आहे. ॥२२॥
त्यातील एक म्हणजे दु:खात्मक फल अरण्यवासी ग्राम्य, लोभी (अधाशी प्राकृत लोक) खातात, आणि दुसरे शुध्द सुखात्मक फळ अरण्यवासी संन्यासी, खातात.  असो; उध्दवा ! स्वरुपत: एकच एक अव्दितीय असून जो मायेमुळे अनेकरुपी, त्याचे परमार्थ्त: शुध्द आत्मस्वरुप जपणारा, तोच वेदांचा खरा अभिप्राय म्हणजे त्यांचे तात्पर्य समजतो. ॥२३॥
हे ज्ञान -विज्ञान सद्‍गुरुचा आश्रय करुन त्याच्या एकनिष्ठ सेवेने , परमेश्वरभक्तीने आणि आत्मविद्येने उध्दवा समजून घे. विद्या (आत्मविद्या) ही कुर्‍हाड जीवाच्या सूक्ष्म - स्थूल देहांस (अज्ञानास) समूळ छाटून टाकून आणि बुध्दिवंत धैर्याचा जो दक्ष पुरुष आहे, त्याला आत्मस्वरुप मिळवून देते. हे आत्मस्वरुप प्राप्त झाल्यानंतर विद्यारुपी अस्त्र सुध्दा टाकून दिले पाहिजे. ॥२४॥
अध्याय सातवा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP