उध्दवगीता - अध्याय विसावा

उध्दवगीता

श्री भगवान्‍ म्हणाले, प्रकृति अथवा पुरुष एक आहे, म्हणून सर्व दृश्य विश्व एकस्वरुपीच आहे, असे ज्ञान असणार्‍याने दुसर्‍याच्या स्वभावाची म्हणजे स्वभावजन्य गुणाची अथवा गुणजन्य कर्मांची स्तुती वा निंदा करु नये. ॥१॥
कारण  जो दुसर्‍याच्या गुणकर्मांची निंदास्तुती करतो तो असत्याच्या  अभिनिवेशामुळे भ्रष्ट होतो. ॥२॥
नेत्रकर्णादी इंद्रियगण कर्मशून्य होऊन लीन झाल्यावर देहातील जीव चेतनाशून्यच होतो व तो स्वप्नसृष्टीत शिरुन मनोमात्रनिर्मित वस्तू पाहतो म्हणजे अनेक मायानिर्मित्ते पाहतो व पुढ गाढ निद्रेत तरी शिरतो अथवा मृत्युवश होतो. म्हणून आहे तेही पाहण्याला असमर्थ होतो. ॥३॥
परमार्थात: जे व्दैत मुळीच नाही, त्या शून्य स्वरुपात चांगले काय असणार अथवा वाईट तरी  काय असणार ? किंवा कितीसे शुभ वा अशुभ असणार? वाणीनेच सशब्द झालेले वा मनाने कल्पिलेले सर्व अनृत म्हणजे असत्य असते. ॥४॥
हे आभास जरी प्रतिबिंब, प्रतिध्वनी अथवा मृगजलासारखे मिथ्या असतात,  तरी ते सुखदु:खादी कार्ये करण्यास समर्थ असतात. याचप्रमाणे जीवाला जे शरीरादि भाव असतात ते मिथ्या असतात. जोपर्यंत शरीरादी मिथ्या उपाधी आहेत तोपर्यंत जीवाला भ्रांती उत्पन्न करतो. ॥५॥
हे सर्व अंतर्बाह्य दृश्य विश्व आत्माच आपण होतो. ह्या विश्वाचा स्रष्टा तोच, पालक तोच व संहारकर्ता तोच आहे. तो आपणच आपल्यास विश्वरुपाने उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो. ॥६॥
त्या ह्या आत्म्याहून अर्थात्‍ त्यानेच उत्पन्न केलेल्या, आपणच स्वत: असलेल्या विश्वाहून (आत्म्याहून) दुसर्‍या पदार्थांचे निरुपणच करिता येत नाही. दुसर्‍या कशाचीही व्यवस्थित रीतीने स्वरुपता सांगता येणे शक्य नाही. आणि निरुपणच केलेच तर ते निरुपण म्हणजे आत्म्यावर भासणारी भौतिक, दैविक अथवा आध्यात्मिक निर्मूळ (निष्कारण) भ्रांती होय. हे त्रिविध विश्व गुणमय मात्र आहे. आणि हे त्रिगुणात्मक विश्व तीन प्रकारचे दिसत, ते मायेमुळेच होय. ॥७॥
उध्दवा ! हे जे मी तुला ज्ञानविज्ञानाचे यथार्थ निरुपण केले त्यात निपुण असलेला परमार्थज्ञानी कशाची निंदा करत नाही व स्तुतीही करत नाही. सूर्य जसा आवडनिवड न करिता सर्वांना प्रकाश देतो, त्याप्रमाणे ज्ञानी सर्वदा समभावाने वागतो. ॥८॥
म्हणून प्रत्यक्ष, अनुमान, शब्द व स्वत:चा अनुभव, या सर्व प्रमाणाच्या साह्याने हे सर्व दृश्य जन्ममरणात्मक आहे, असत्‍ म्हणजे मिथ्या आहे असे समजून घेऊन साधकाने नि:संग होऊन राहावे. ॥९॥
उध्दव म्हणाला , देवा ! आत्म्याला संसार असणे शक्य नाही, तसाच जड देहालाही संसार असणे शक्य नाही, कारण आत्मा द्रष्टा व स्वयंप्रकाश असतो व देह दृश्य व अनात्मक म्हणजे जडरुप असतो. नि:संग आत्म्याला व अज्ञानी जडाला सु:खदु:ख होणे शक्यच नाही. आणि संसार व तज्जन्य सुखदु:ख तर आहेसे दिसत. ॥१०॥
वस्तुत: आत्मा स्वरुपत: अक्षर म्हणजे निर्विकार, निर्गुण, स्वच्छ स्वप्रकाश आणि आवरण नसणारा असा उघडा अग्नीप्रमाणे आहे. तेव्हा त्याला संसार कसा प्राप्त व्हावा? आणि देह तर लाकडाप्रमाणे जड आहे, त्याला सुखदु:खाचे भान कसे व्हावे? अर्थात्‍ आत्मा व देह जर संसारी असणे शक्यच नाही, तर संसार कोणाला? ॥११॥
श्री भगवान्‍ म्हणतात, उध्दवा ! जोपर्यंत देह, इंद्रिये व प्राण यांच्याशी आत्मा संबध्द आहे, असे अज्ञानी पुरुषाला वाटते, तोपर्यंत वस्तुत: असत्‍ असणारा असा हा संसार, त्या अज्ञानी पुरुषाला, सुखदु:ख देणारा, जन्ममरण आणण्याला कारणीभूत होणार आहे, अशी भ्रांती असते. ॥१२॥
नसणारे पदार्थच स्वप्नस्थ पुरुषाला दिसून सुखदु:खाला कारण होतात. त्याचप्रमाणे विषयांचे अहोरात्र चिंतन करणार्‍या अज्ञानी पुरुषाला नसणाराही संसारी आहे असे वाटते ॥१३॥
जागृतावस्थेत नसणार्‍या स्वप्नस्थ पुरुषाला स्वप्नात दिसणार्‍या पदार्थांपासून अनेक सुखदु:खादि होतात. पण स्वप्न व तीच स्वप्नगत सुखदु:खे जाग्या माणसा मोह उत्पन्न करीत नाहीत. याचप्रमाणे नसणारा संसार अज्ञान्याला सुखदु:ख देतो व ज्ञानी पुरुष सुखदु:खविरहित असतो.॥१४॥
शोक, हर्ष, भय, क्रोध, लोभ , मोह, स्पृहा (मत्सर) इत्यादि सर्व व जन्म आणि मृत्यू हे अहंकाराशी संबध्द असतात. ते अहंकाराचे धर्म आहेत. ॥१५॥
देहादिकांनी आवृत्त होऊन देह, इंद्रिये, प्राण व मन यांच्या ठिकाणीच अहंत्वाचा अभिमान ठेवणारा आत्मा जीवदशेला प्राप्त होतो आणि सत्त्वादि गुण व गुणानुसारी कर्म यांची तो मूर्ती होतो. या जीवदशेला प्राप्त झालेल्या आत्म्याला ‘सूत्रात्मा’ ‘महान्‍ आत्मा’ इत्यादि अनेक नावे उपाधि अनुसार मिळतात, आणि हाच ‘जीव’ कालाधीन होऊन सर्व प्रकारच्या संसारांत भ्रमण करीत राहतो. ॥१६॥
याप्रमाणे वस्तुत:  निर्मूळ असणारे पण मन, वाणी, प्राण, शरीरप्रभृती स्वरुपांनी प्रकट होणारे अहंकारकृत जीवकर्म असते. हा भ्रांतीकृत चमत्काराचा संबंधरुपी वृक्ष, तीक्ष्ण ज्ञानशास्त्राने व दृढ उपासननेने कापून टाकून ज्ञानी भक्त असणारा विरक्त निस्पृह वृत्तीने याच जगत पूर्वीसारखा वावरतो. ॥१७॥
कारण विवेकत: त्याल आपले स्वरुप वेदाध्ययनाने, तपश्चर्येने व प्रत्यक्ष -अनुमान- इतिहास इत्यादि प्रमाणांनी कळलेले असते. तो नि:संदेहत: जाणतो की, या दृश्य विश्वाच्या आधी व विश्वाचा अंत झाल्यावर जे प्रकाशात्मक व कारणात्मक विश्वस्वरुप असते, तेच मात्र स्वरुप मध्ये म्हणजे व्य्वहारकाळी परमार्थत: असते. ॥१८॥
उदारणार्थ, सोन्याचे अलंकार करण्यापूर्वी  व अलंकार मोडल्यावर जसे केवळ सोने मात्र असते, तसेच अलंकाराच्या अवस्थेमध्येही सोनेच असते. याचप्रमाणे विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी व विश्वाचा अंत झाल्यावर जे विश्वप्रकाशक व विश्वकारण ब्रह्म असते, तेच ब्रह्म विश्वाच्या व्यवहारकाळी अनेक नामे धारण करणारे पण स्वरुपत:मीच असणारे असे तत्त्व विद्यमान असते. ॥१९॥
उध्दवा ! वेदांतशास्त्रात जी समन्वयव्यतिरेक पध्दति आहे, त्या पध्दतीने पाहिले असता जे तुर्य म्हणजे शुध्दब्रह्म- जीवाच्या तिन्ही जागृत्यादी अवस्थांचा अनुभव घेणारे मनाला, या तीन अवस्था उत्पन्न करणार्‍या सत्त्वादि तीन गुणांला आणि अध्यात्म, अधिभूत व अधिदैव जगाला प्रकाशित करते ते शुध्दब्रह्मच सत्य आहे. ॥२०॥
जे उत्पन्न होण्यापूर्वी नसते व नष्ट झाल्यावरही नसते. वर्तमानकाळी मात्र असते ते केवळ नामरुप मात्र असते, वस्तुत: नसते. ज्याची उत्पत्ति दुसर्‍याकडून होते व त्याचे अस्तित्व दुसर्‍यावर अवलंबून असते, ते वस्तुत: अन्यरुप म्हणजे कारण रुपच असते असे मला वाटते. ॥२१॥
वस्तुत: नसूनही ज्याची प्रतीती येते, तो हा सर्व कार्यसमूह रजोगुणाने उत्पन्न झाला आहे. ब्रह्म मात्र स्वयंसिध्द, स्वयंभू, सर्वप्रकाशक आहे. म्हणून नेत्रहस्तादि इंद्रिये, सर्व ग्राह्य तन्मात्रा, संकल्प विनिश्चयात्मक अंत:करण आणि सर्व विकार (कार्ये) या चित्रविचित्र रुपांनी ब्रह्मच अवभासते. ॥२२॥
याप्रमाणे ब्रह्माचा व दृश्यांचा भेद स्पष्ट करणार्‍या प्रत्यक्षादी प्रमाणांनी व अनात्म वस्तूंचा समूळ निरास करणार्‍या खंडनाने आत्मसंबंधी सर्व संशय काढून टाकावेत आणि सर्व इंद्रियांचा व विषयवासनांचा त्याग करुन आत्मानंदांतच राहावे. ॥२३॥
आपले शरीर पार्थिव- पंचभूतांचा संघात म्हणून आत्मा नव्हे; त्याचप्रमाणे करणे म्हणून आत्मा नव्हेत. प्राण, मन, बुध्दी, चित्त व अहंकार अन्नाच्या समागमाने वाढणारी व अपगमनाने क्षीण होणारी म्हणून आत्म नव्हेत; आणि प्रकृतीत गुणसाम्य असते म्हणून तीही आत्मा नव्हे. ॥२४॥
आत्मस्वरुपाच्या ज्ञानविज्ञानाने जो स्वलंकृत झाला, त्याची गुणात्मक इंद्रिये स्थिर झाली म्हणून त्याला काही लाभ होत नाही, वा विक्षिप्त झाली तरी त्याची हानी होत नाही. ढग आले गेले म्हणून सूर्याच्या तेजात कमीअधिकपणा होतो काय? ॥२५॥
येणार्‍या जाणार्‍या ऋतूच्या शीतोष्णादिकानी अग्री, जल, पृथ्वी , वायू, या महाभूतांच्या नित्य गुणांनी आकाश केव्हाही विकृत होत नाही, त्याचप्रमाणे अहंवृत्तीहून अत्यंत श्रेष्ठ असणार्‍या ब्रह्माला संसारोत्पादक स्थिर व चंचल सत्त्वादि गुणांचा यत्किंचित्‍ ही स्पर्श होत नाही. ॥२६॥
तथापि, जोपर्यंत परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्तीने मनाचे मालिन्य व विषयासक्त निरस्त होत आहे तोपर्यंत, म्हणजे मन निर्मळ व विषयविरक्त झाले नाही तोपर्यंत; मायोत्पादित विषयांचा संग टाकून देणे हा उत्तम मार्ग होय. ॥२७॥
रोगाची योग्य परीक्षा न झाल्यामुळे माणसांना असलेला रोग वाढत जाऊन त्यांस पुन: पुन: त्रास देतो, त्याचप्रमाणे मनाचा मळ पूर्णत: धुवून न गेल्यामुळे ते कर्मासक्त मन विषयसंग सोडीत नाही. सारांश अर्धवट योग्याला ते मन फारच त्रास देते. ॥२८॥
देव, मनुष्ये व महाभूते यांनी निर्माण केलेल्या विघ्नांमुळे ज्याचा योगाभ्यास अपूर्णच राहिला, ते योगी पुढील जन्मी पूर्वीचा योगाभ्यासच दृढ करतात; ते कर्मांच्या भानगडीत पडत नाहीत. ॥२९॥
कोणत्या तरी पूर्वजन्मार्जित प्रारब्धसंस्काराने प्रेरित होऊन जन्मभर जीव कर्म करतो आणि त्या त्या कर्माने विकृत होतो. परंतु विव्दान्‍ मनुष्याचा प्रकार निराळा होतो. तो या दृश्य जगात रहात असतो, तरी तो आशाशून्य असल्यामुळे व स्वानंदाचा अनुभव घेत असल्यामुळे, त्याला कर्मविपाकाची बाधा होत नाही. ॥३०॥
अन्नग्रहण, मलोत्सर्गादि अथवा श्रवणदर्शनादि कर्मे करणार्‍या तसेच उठणार्‍या, बसणार्‍या किंवा जाणार्‍या व्यक्तीस म्हणजे सर्व प्रकारची कर्मे करणार्‍या स्वत:च्या देहाचीही त्याला खबर नसते. ॥३१॥
शिवाय, जरी त्याला रुप, शब्द, इत्यादि मिथ्या विषय प्रत्यक्ष दिसतात, अनुभवास येतात, तथापि ते अनेक व अनेक प्रकारचे असतात म्हणून ते असत्‍ च ठरतात, हे शुध्द अनुमान तो करतो. अर्थात्‍ आत्मवस्तुव्यतिरिक्त सर्व अवास्तविक,  मिथ्या आहे, असा त्या विव्दानाचा निश्चय होतो. स्वप्नांतून उठून जागृत झालेल्या पुरुषाचे स्वप्नातील पदार्थ जसे स्वभावत:च नाहीसे होतात, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष अज्ञानावस्थेतील सर्व विषय सत्य मानीत नाही. ॥३२॥
उध्दवा ! यद्यपि प्रकृतिजन्य अज्ञानामुळे आत्म्यावर ‘ तो शरीर आहे, इंद्रियवान आहे ’ असे आरोप पूर्वीपासून जीव करतात, तथापि गुरुमुखाने झालेल्या श्रौतज्ञानचिंतनाने ते अज्ञान नाहीसेच होते. कारण, नित्य व निर्विकार असणारा आत्मा कोठून नवीन मिळवावयाचा नसतो, अथवा टाकून देण्यासारखा नसतो. त्याच्यावरील आरोप तेवढे नाहीसे होतात. ॥३३॥
पहा की, सूर्योदय अंधकार मात्र नाहीसा करुन पदार्थ प्रकट करतो. तो काही उत्पन्न करीत नाही. ते असतातच. त्याचप्रमाणे आत्मज्ञान हे जीवबुध्दीचे अज्ञान फक्त नाहीसे करते. अज्ञान नष्ट झाले की, स्वयंप्रकाश आत्मस्वरुप प्रकट होते. ॥३४॥
हा आत्म स्वयंप्रकाश, अजन्मा, अज्ञेय, निर्विकार, प्रत्यक्ष अनुभवरुप, एक , अव्दितीय, वाणीस अगोअचर, पण वाणी व प्राण यांचा प्रवर्तक आहे. ॥३५॥
तिन्ही प्रकारचे भेद मुळीच नसणार्‍या आत्म्यात भेद पाहणें ही मूढ मनाची भ्रांतीला सुध्दा आश्रय देणारा जो एकजिनसी आत्मा तो असल्याशिवाय, अस्तित्वच नसते. ॥३६॥
प्रत्यक्षावर श्रध्दा ठेवणारे व्दैताभिमानी म्हणतात की, हे नामरुपव्दारा प्रकट होणारे पांचभौतिक विश्व सत्यच आहे. वेदांतांतील वाक्ये निव्वळ अर्थवादात्मक नुसती कर्मस्तुति करणारी आहेत. पण हे त्यांचे म्हणणे खरे नाही. ॥३७॥
उध्दवा ! ज्याचा योगाचा अभ्यास पूर्ण झाला नाही, त्या योगाभ्यास करणार्‍या साधकाचे शरीर जेव्हा रोगादिकांनी क्षीण होते तेव्हा त्याने पुढील उपाय योजावा, असे शास्त्र म्हणते. ॥३८॥
कित्येक विघ्ने योगधारणेने, कित्येक धारणायुक्त वायुस्तंभाने, काही विघ्ने तपाने, मंत्रांनी व औषधींनी साधकाने नाहीशी करावीत. ॥३९॥
मीच ईश्वर आहे, माझे ध्यान, माझे नामसंकीर्तन इत्यादि उपायांनी योगेश्वर माझी व सिध्दांची सेवा करुन ही कल्याणकारी विघ्ने नाहीशी करावीत. ॥४०॥
आता कित्येक ज्ञानी भर तारुण्यामध्येच आपले शरीर निरोगी आणि चिरकाल टिकणारे असे करुन मग कित्येक सिध्दींचे संपादन करतात खरे, परंतु. ॥४१॥
उध्दवा ! जो साधक कुशल आहे, त्याने ह्या देहालाच सुदृढ करणार्‍या योगमार्गाचा आश्रय करुच नये. कारण, ह्या योगाला मोक्ष नामक पुरुषार्थ साध्य करुन देण्याचे सामर्थ्यच नाही. वृक्षाला दरवर्षी फळे येतात आणि नष्ट होतात, त्याप्रमाणे हा देह नश्वरच आहे. ॥४२॥
नित्य योगाभ्यास करणार्‍या देह कदाचित्‍ पुष्कळ कालपर्यंत सुदृढ राहतो, म्हणून ज्ञानयोगाचा अनादर करुन शरीर सुदृढ ठेवणे अथवा ते सुदृढ राहील असो श्रध्दा ठेवणे, हे साधकाचे कर्तव्य नव्हे. ॥४३॥
असो; एकनिष्ठेने मला शरण येऊन आताच सांगितल्याप्रमाणे जो ज्ञानयोगाचा अभ्यास करतो अशा मद्भक्तिपूर्ण ज्ञानयोग्याला विघ्ने बाधा करुच शकत नाहीत. कारण विषयांसंबधी विरक्त होऊन आत्मनंदाचा अनुभव घेणारा तो योगी असल्या विघ्नांच्या पलीकडेच गेलेला असतो. ॥४४॥
अध्याय विसावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP