उध्दवगीता - अध्याय दुसरा

उध्दवगीता

भगवान्‍ म्हणाले, दैवशाली उध्दवा ! तू म्हणालास तेच खरे. (स्वलोकगमन करण्याचाच माझा संकल्प आहे.) शिवाय ब्रह्मा, शंकर, सर्व लोकपाल यांची इच्छा मी स्वर्गात जावे अशी आहे. ॥१॥
देवांनी जे कार्य मला करावयास विनविले होते, ते मी समग्र पार पाडिले आहे.ब्रह्मदेवाने प्रार्थना केली होती म्हणून  ते देवकार्य करण्यासाठी मी माझ्या एकाच अंशाने अवतीर्ण झालो व अवतारकार्य सिध्दीस नेले. ॥२॥
आपले यादवकुल (ब्राह्मणांच्या शापामुळे) बहुतेक दग्धच झाल्यासारखे आहे. यादवांमध्ये यादवी (भावाभावांमध्ये भांडण) होऊन सर्व कुलक्षय लवकर होईल. आणि आजपासून सातव्या दिवशी ही आपली नगरी समुद्रामध्ये बुडून जाईल. ॥३॥
ज्या दिवशी मी हा लोक सोडून जाईन त्यानंतर लवकरच भूलोकाचे सौभाग्य नष्ट होइल. शिवाय, कलीचा प्रादुर्भाव झाला म्हणजे सौभाग्याची गोष्टच रहाणार नाही. ॥४॥
याकरिता, मी गेल्यानंतर तू या लोकी राहू नयेस. कारण कलियुगातील लोकास अधर्माचरण करण्याची भारी आवड असणार. करिता आप्तेष्ठ मित्रांवरील तुझे प्रेम काढून टाक, माझ्या ठिकाणी आपल्या शुध्द मनाची स्थापना कर, समदृष्टि हो आणि कुडीत प्राण आहे तोपर्यंत खुशाल रहा. ॥५-६॥
इंद्रियांनी व मनाने तू ग्रहण करतोस, ते ते विश्वगत सर्व विषयात्मक म्हणजे जड असल्या कारणाने मनोत्पादित आहे, मायामय आहे, नश्वर आहे, असे जाण. ॥७॥
उध्दवा ! आत्म्याचे ठिकाणी ज्या पुरुषाने आपले मन युक्त केले नाही त्यालाच अनेकत्वाचा भ्रम होतो. विहित कर्म कोणते, अकर्म म्हणजे विहिताकारण कोणते आणि विकर्म म्हणजे निषिध्दाचरण कोणते, याचा विचार असा गुणदोषाचा वाटेकरी होऊन, हे चांगले , हे वाईट, अशी भेदबुध्दी तो धारणा करतो. ॥८॥
म्हणून उध्दवा ! इंद्रियांस व चित्तास माझ्या ठिकाणी युक्त कर. म्हणजे हे सर्व विस्तीर्ण ब्रह्मांड तुझ्या जीवात्म्यामध्ये आहे व तुझा आत्मा माझ्यामध्ये आहे, असे अव्दितीय एकत्वाचे सम्यक्‍ ज्ञान तुला होईल. ॥९॥
याप्रमाणे शास्त्रोक्त ज्ञानाला शुध्द अनुभवज्ञानाची (विज्ञानाची) जोड मिळून जगदात्मा होशील व स्वानुभव झाल्यामुळे (आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे) तुला अखंड समाधान होईल. अर्थात्‍ तुझ्यावर विघ्नांची मात्रा चालणार नाही. ॥१०॥
जो प्राणी जीवन्मुक्त आहे, तो गुणदोषांच्या फार पलीकडे गेला असल्यामुळे त्याला विधि किंवा निषेध नसतात. लहान बालकाला तरी विधिनिषेधांची बाधा असते  काय ? नाही. त्याला दोषाची भीति नसते व गुणाची मातब्बरी नसते. ॥११॥
उध्दवा ! जीवन्मुक्त जगताचा मित्र, शांतीचा सागर, ज्ञानविज्ञानांत निपुन म्हणून नि:संदेह असतो. ‘हे सर्व ब्रह्मांड एकरस ब्रह्मच आहे ’हे ज्ञानविज्ञान त्याला असते म्हणून त्याला जन्ममरणाचा प्रसंग केव्हाही येतं नाही. ॥१२॥
श्री शुकाचार्य म्हणतात, राजा, हा श्रीकृष्णाचा उपदेश महाभागवत उध्दवाने ऐकला, त्याने श्रीकृष्णास साष्टांग प्रणिपात केला आणि तत्त्व जाणण्याचा संकल्प मनात धरुन श्रीकृष्णास त्याने विचारले. ॥१३॥
उध्दव म्हणाला, हे योगस्वामी, योगरहस्याच्या निधाना , योगरुपा, योगजनका मला मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून तू मला ‘ संन्यासरुपी त्याग कर’ असा उपाय सांगितला. ॥१४॥
परंतु देवा ! विषयलोलुपांना असला दुष्कर वासनात्याग साधणे शक्य नाही. त्यातही हे जगदात्मन , तुझ्याविषयी ज्याची आदर-बुध्दि नाही, त्यास तर हा संन्यास-योग सर्वथा कठीण आहे. ॥१५॥
तुझ्या मायेने निर्माण झालेल्या देहावर ‘ ही माझी’ असा भाव ठेवून आणि त्याच मायेने उत्पन्न केलेल्या पुत्रमित्रादिकांवर ‘ ही माझी’ असा भाव ठेवून मी मूर्ख झालो आहे. तेव्हा माझ्यासारख्या मूर्खाच्या हातून सहज सिध्द होईल असा एकदा मोक्षदाताअ योग सांग. मी तुझा दास तुला शरण आलो आहे. ॥१६॥
श्रीकृष्णा ! तू सत्याची मूर्ती आहेस. तू स्वयंप्रकाश आहेस. तुझ्यासारखा योग्य गुरु मला देवदेवतांत सुध्दा सापडणार नाही. कारण ते सर्व ब्रह्मादि तुझ्या मायेच्या सपाटयांत सापडल्यामुळे वेडे होऊन जन्ममरणाच्या प्रवाहात गटांगळ्या खात आहेत. जगत्‍ सत्यच होय असे मानणारे आहेत. ते मला काय उपदेश करु शकणार? ॥१७॥
देवा ! तू शुध्द, बध्द, नित्य, मुक्त, अनंत आहेस. दयाळा ! या घोर संसाराच्या तापत्रयाने मी पोळून निघालो आहे,  निराश झालो आहे. म्हणून तुला शरण येऊन प्रार्थितो. तूच नरनारायण , जगन्मित्र, जगदुध्दारक आहे. तेव्हा मला सुकर होईल असा उपदेश कृपा करुन कर; मी एकचित्ताने तो ऐकतो. ॥१८॥
श्री भगवान्‍ म्हणाले, उध्द्वा ! आपण कोण, हे विश्व काय , धरावे काय, टाकावे काय, आपला परम पुरुषार्थ कोणता, इत्यादि प्रश्नांचा उलगडा करण्यामध्ये प्रवीण असलेले लोक बहुधा विषयवासनांचा त्याग करुन  स्वत:च स्वोध्दार करण्याला बुध्दिव्दारे समर्थ असतात. ॥१९॥
सर्व जीवांस, पण विशेषत: मनुष्यास उत्कृष्ट गुरु म्हणजे स्वत:चा आत्माच होय. प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणांनी विचिकित्स करणार्‍या विवेकी मनुष्याला मोक्षमार्ग ठरविता येतो. ॥२०॥
पुरुषार्थसिध्दीचा संकल्प करणारे सांख्य पंडित सर्वशक्तिसंपन्न मी परमेश्वर सर्व विश्वरुप व्यापून उरलो आहे असे प्रत्यक्षच पाहतात. या विश्वात एक, दोन , तीन, चार पाय असणार्‍या तसेच मुळीच पाय नसणार्‍या अनेक योनी आहेत. त्यांत मनुष्ययोनी मला अत्यंत प्रिय आहे. ॥२१-२२॥
या मानव योनीत रहाणारे एकनिष्ठ विव्दान्‍ पुरुष अनुमान - प्रमाणाच्या आधारे माझे स्वरुप निश्चित गुण व लिंग (चिन्ह) ही अनुमान प्रमाण ठरविणारी जी साधने त्या साधनांच्या व्दारे मला शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. ॥२३॥
उध्दवा ! या संदर्भात एक पुरातन घटना सांगितली जाते, अवधूत आणि अत्यंत तेजस्वी अशा यदु राजाचा संवाद त्यात आहे. ॥२४॥
यदुराजाने निर्भय अवधूतास पाहिले. अवधूत तरुण होता, तरी ज्ञानसंपन्न आणि विरक्त होता. त्याने त्या ब्राह्मणाला वंदन करुन प्रश्न केला. ॥२५॥
यदुराज म्हणाले, हे ब्राह्मणा ! तुझ्यामध्ये ही उत्तम अशी निरिच्छ बुध्दि कशी निर्माण झाली? तिच्यामुळेच तू विव्दान असूनही जगात लहान मुलाप्रमाणे वावरत आहेस? ॥२६॥
हे बालमुने ! या जगांत ‘ मला दीर्घायुष्य असावे, माझी कीर्ति व्हावी, मला संपत्ति मिळावी’ हाच पुरुषार्थ साधणारी माणसे  दिसतात. धर्म , अर्थ, काम साधावे, हीच बहुतेक लोकांची इच्छा असते. ॥२७॥
पण तू मात्र लोकोत्तर दिसतोस. तुझे कर्म बुध्दी, तुझी दक्षता, तुझी तेजस्विता, तुझे मधुर भाषण, सर्व विलक्षण आहे. तरीही तू निर्बुध्द, वेडा किंवा पिशाचाप्रमाणे कशाचीही इच्छा करीत नाहीस ? ॥२८॥
सर्व लोक कामलोभादी राजस विकारांच्या असह्य तापाने वणव्यात पोळत असता तू असा गंगाजलांत स्नान करणार्‍या हत्तीप्रमाणे शांत कसा ? ॥२९॥
हे महाभागा, तेव्हा कृपा करुन मला सांग की, जीवन्मुक्ती सिध्द करणारा जो तुझा आनंद आहे, त्याचे कारण काय ?॥३०॥
भगवान्‍ म्हणाले, उध्दवा ! मोक्ष इच्छिणार्‍या त्या बुध्दिवान्‍ विनीत राजाचा प्रश्न ऐकून प्रसन्न झालेला अवधूत राजास म्हणाला. ॥३१॥
अवधूत म्हणाले, राजा विचिकित्सा करणार्‍या माझ्या बुध्दीने मला मोक्षमार्गी चोवीस गुरु दाखविले. त्यांच्य़ा बुध्दीच्या बळावरच मी नि:संग होऊन सर्व पृथ्वीवर भ्रमण करतो. ॥३२॥
अवधूत म्हणतात, हे राजा ! पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य , कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधहरण करणारा, हरिण, मासा, पिंगला वेश्या, कुरर, बाल, कुमारी, बाण करणारा , साप, कांतीण आणि भिंगुरटी असे हे माझे चोवीस गुरु होत. ॥३३-३४॥
यांतील प्रत्येकाचे वर्तन पाहून त्यांच्याव्दारा, मला उपयोगी पडणारे वर्तनाचे धडे मी शिकलो. नहुष राजाच्या पौत्रा, त्यांजपासून मी जे शिक्षण घेतले आहे ते हे वाघासारख्या शूर राजा, मी तुला सांगतो तू नीट समजून  घे. ॥३५-३६॥
मायेच्या अथवा निसर्गाच्या नियमानुसार वागणार्‍या पंचमहाभूतांनी सतावून सोडले तरी क्षमावृत्ती धारण करुन आपला ठरलेला मार्ग योग्याने सोडू नये. स्वमार्ग न सोडणे, हा नियम मी पृथ्वीपासून शिकलो. तो ही पृथ्वीप्रमाणेच आपला ठरलेला मार्ग सोडीत नाही. ॥३७॥
पर्वत व वृक्ष हे सर्वदा परकार्यासाठी विनित इच्छा बाळगून निर्माण होतात व त्यांचे मरण दुसर्‍यांसाठी असते. ही परोपकारी वृत्ती पर्वताकडून साधूने शिकावी. ॥३८॥
प्राणाचे संरक्षण होईल इतकेच आहारविहारादि उपभोग मुनीने घ्यावेत. इंद्रियांची आवडनिवड बघू नये. त्यांच्या आवडीप्रमाणे आहारादि सेवन केले असता ज्ञाननाश अ मनोविक्षेप होतो. म्हणून ज्ञान नष्ट न होईल एवढे तसेच वाणी व मन शुध्द राहील असाच आहार असावा. ॥३९॥
बाह्यवायूपासून मी शिकलो की नाना धर्म असणार्‍या विषयांमध्ये शिरुनही विषयाच्या गुणदोषांनी वायू जसा लिप्त होत नाही, तसेच आपण देहामध्ये राहूनही देहगुणांपासून अलिप्त राहावे. ॥४०॥
वायू पुष्पगंधाला आश्रय देतो, तरी स्वत: लिप्त होत नाही. हा निर्लेपपणाचा गुण वायूपासून आत्मवेत्ता घेतो व विश्वात संचार करतो. ॥४१॥
सर्व चराचराचे आंत व बाहेर व्यापून असणारे अनंत नभ म्हणजे आकाश असंग असते. याचप्रमाणे सर्वांतर्यामी असून सर्व विश्व व्यापणारा परमात्मा आपणच आहो अशी समन्वयाने ब्रह्मात्मैक्यभावना करुन नभाप्रमाणे नि:संग राहावयास मी शिकलो. उदाहरणार्थ,  वायूने प्रेरिलेले मेघ आकाशाला स्पर्श करीत नाहीत, त्याप्रमाणे कालोदरात उत्पन्न झालेले तेज- जल पृथ्वीमय पदार्थ ज्ञानी पुरुषाला- आत्म्याला स्पर्श करु शकत नाहीत. तात्पर्य आत्मा असंग आहे हे मी आकाशापासून शिकलो. ॥४२-४३॥
जल हे स्वरुपत: स्वच्छ, मधुर आणि तीर्थ म्हणून शुध्द करणारे आहे. मुनीने निर्मळ, दयाशक्ति मधुर आणि पवित्र असावे.॥४४॥
अग्नि हा तेजस्वी, शीतनिवारक, अजित, उदरच ज्याचे भक्षणपात्र असते असा अग्नि वाटेल ते खातो, तरी निर्मळ असतो. तो केव्हा गुप्त व केव्हा प्रकट असतो. कल्याणेच्छू त्याची उपासना करतात. आपले भक्त जे काय देतील ते भक्षून तो भक्तांची पातके जाळून भस्म करतो. भक्त जे अर्पण करतील तत्स्वरुप अग्रि होतो. ज्ञानी मुमुक्षूने हे अग्रिव्रत धारण करावे. म्हणजे तेजस्विता, परपीडानिवारकता, निर्मूढता, परिग्रहशून्यता, निर्मलता, लोकसंग्राहकता, पावकता, सर्वांतर्मामिता हे गुण जीवन्मुक्ताचे ठिकाणी असतात. मुमुक्षूने हे गुण अग्नीपासून घ्यावेत.॥४५-४७॥
चंद्रकला वाढतात, कमी होतात. ही वृध्दिक्षयाची अवस्था कलांची आहे, चंद्राची नव्हे. जन्म, अस्तित्व, वृध्दि, तारण्य, वार्धक्य, मरण हे सहा विकार देहाचे आहेत, आत्म्याचे नव्हेत. (हे चंद्राने स्वत:च्या उदाहरणाने मला शिकविले) ॥४८॥
अग्नीच्या ज्वाळांचा किंवा दीपशिखेचा क्षणोक्षणी उत्पत्तिविनाश होत असताही रुपांतरे दिसत नाहीत, ज्वाळा नित्य वाटतात. त्याप्रमाणे पंचमहाभूतांचा व तद्रचित जगाचा क्षणोक्षणी उत्पत्तिविनाश नित्य होत असताही तो दिसत नाही. हा भ्रम आहे, हे मी अग्नीपासून शिकलो. ॥४९॥
सूर्य किरणांनी आणलेल्या ‘गां’ चा म्हणजे जलांचा स्वीकार यथाकाली करुन त्यास योग्यवेळी टाकून देतो; जलांनी संपृक्त होत नाही. योगी असे करतात. ॥५०॥
आणखी, सूर्यावर ढग येऊन त्यात तो प्रतिबिंबित झाला असता निरनिराळ्या आकारांचा दिसतो. सूर्य अनेक आकारांचा आहे, असे मंदमतींना वाटते.पण स्वरुपत: सूर्य एकच असतो. उपाधीमुळे निरनिराला वाटतो. सूर्य जसा निर्विकार असंग आहे तसा आत्मा आहे, हेच मुमुक्षूने शिकावे.॥५१॥
कोणीही कोणावर अतिस्नेह करु नये. फाजील लाडही करुन नयेत. प्रेम करणारा मंदमती कपोतप्रमाणे दु:ख भोगतो. ॥५२॥
एक कबूतर व त्याची पत्नी घरटे बांधून रहात होती. ती जोडी अशी काही वर्षे राहिली. ॥५३॥
दोघांचेही मन स्नेहाचे फुलत होते. दोघेही गृहस्थधर्म नीट पाळीत असत. दृष्टीला दृष्टी देऊन शरीरास शरीर लावून मनाने मनास चिकटून ती स्नेहाने बांधली गेली होती. ॥५४॥
त्यांचे परपस्परांवर अत्यंत प्रेम होते. ते सर्वदा एकत्र वास्तव्य व एकत्र संचार करीत व एकमेकांस ती उभयतां विश्वासाने रानात हिंडत असत. ॥५५॥
अशा स्थितीत ती कपोती पहिल्यांदाच गर्भवती झाली, तिच्यावर आसक्त असलेला कपोत ती जेजे मागेल ते सर्व मोठया कष्टाने आणीत असे. कपोतीने घातलेली अंडी त्यांनी उबविली. ॥५६-५७॥
पुढे त्या अंडयांतून पिले बाहेर पडली. तेव्हां तेथे हजर असणार्‍या कपोताला व त्याच्या मादीला फारच हर्ष झाला. ॥५९-५९॥
हळू हळू त्यांस पंख फुटले. त्यांचे इकडे तिकडे बागडणे, त्यांची किलबिल इत्यादि बालचेष्टांनी त्या जोडप्याचा आनंद दिवसेंदिवस वाढतच गेला. ॥६०॥
अर्थात्‍ त्यांची पुत्रांवरील माया वाढत गेली.पुत्रप्रेमाने मोहित होऊन उभयतांनी बालकांचे पोषणही उत्कृष्ट केले.॥६१॥
नित्याप्रमाणे एकदा त्यांना भक्ष्य आणण्यासाठी ते दोघेजण अरण्यांत गेली. तेथे त्यांस बराच वेळ लागला. ॥६२॥
इकडे ती पिले एकटीच आपल्या घरटयाच्या आजुबाजूला फिरतांना एका वनात भटकणार्‍या पारध्याने पाहिली. त्याने जाळे टाकले. पिले त्या जाळयांत अडकली ! ॥६३॥
पुढे  लवकरच ती कपोत व कपोती पिलांसाठी चारा घेऊन झपाटयाने परत आली. पुत्रांस खाद्य द्यावे, म्हणून ती दोघे आतुर झाली होती. ती झपाझप घरटयापाशी आली. ॥६४॥
प्राणाहूनही प्रियकर असणारी ती पिले पारध्याच्या जाळ्यांत सापडली आहेत हे पाहून त्या कपोतीस परमावधीचे दु:ख झाले. ॥६५॥
मायेने  बध्द झालेली ती कबूतरी वेडी झाली. तिला पुत्रविरह सहन होईना. ती रडली, ओरडली आणि शेवटी तिने जाळ्यांत उडी टाकली ! ॥६६॥
प्राणप्रिय पिल्ले व लाडकी भार्या जाळ्यात अडकलेली पाहून तो कपोत दु:खाने मनस्वी विलाप करु लागला. ॥६७॥
देवा, किती मी अभागी ! इतके दिवस संसार केला, पण तृप्ती झाली नाही. धर्म, अर्थ, काम साध्य करुन देणारे माझे घरच आज बसले ना ? मी अकृतार्थ बनतो. ॥६८॥
माझी अनुरुप,  अनुकूल पतिव्रता भार्या मला एकटयाला मागे ठेवून गेलीना ! पिलांसह ती स्वर्गास जाईल. तेव्हा पत्नी नाही, पिले नाहीत असा विधुर होऊन मी दु:खांत काळ कंठूच कशाला ? असे विलापत राजा ! त्याने जाळ्यांत उडी टाकली  ! काय चमत्कार आहे पहा. ती जाळ्यांत सापडून मरणाच्या दारांत उभी राहिलेली व धडपड करणारी बायकामुले प्रत्यक्ष पाहत असताही त्या मंदबुध्दीने त्या मारक जाळ्यांत उडी टाकली ! ॥६९-७१॥
त्या पारध्याला हर्ष झाला. आपल्या बायकापोरांसाठी तो पारधी हे आयतेच सांपडलेले घबाड संपादून घरी गेला. ॥७२॥
तात्पर्य हे ज्याचा आत्मा अशांत आहे, पुत्रकलत्रांच्या संगतीतच जो सुख मानणारा आहे, कुटुंबपोषण हाच अंतिम पुरुषार्थ असे ज्याला वाटते, तो गृहस्थाश्रमी पुरुष त्या कपोताच्या सर्व कुटुंबाप्रमाणे सर्वनाश पावतो. राजा ! मोक्षाचा दरवाजा खुला करण्याचे सामर्थ्य ज्या मनुष्यजन्मांत आहे, असा मनुष्यजन्म सुदैवाने प्राप्त झाला, असता जो पुत्रकलत्रांवर मात्र आसक्त राहील, त्याचा केव्हांतरी त्या कपोताप्रमाणे नाश होईल . अशालाच ‘आरुढच्युत’ म्हणजे ‘पढतमूर्ख ’ हे नांव शोभते. ॥७३-७४॥
अध्याय दुसरा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP