TransLiteral Foundation

उध्दवगीता - अध्याय दहावा

अध्याय दहावा


अध्याय दहावा
उध्दव म्हणाला, कृष्णा तू प्रत्यक्ष परब्रह्म आहेस तू अनादी , अनंत, मायेचे आवरण नसणारा, स्वतंत्र आहेस. तूच सर्व विश्वाचे जन्मकारण, स्थितिकारण आणि संहारकारण आहेस. ॥१॥
जे अकृतात्मे म्हणजे अज्ञानी व मलिन चित्ताचे लोक आहेत, त्यास तू लहानमोठ्या पदार्थांत कोठेही दिसत नाहीस. परंतु जे श्रुतींचा इत्यर्थ जाणणारे ज्ञानी असतात, ते मात्र तुझी उपासना तुझे यथार्थ स्वरुप जाणून करीत असतात. ॥२॥
म्हणून ज्या ज्या स्वरुपांमध्ये तुझी भक्ती करणारे महर्षी तुझी उपासना करुन मोक्ष मिळवितात ती ती स्वरुपे, त्या तुझ्या विभूती मला सांग . ॥३॥
हे भूतभावन म्हणजे जीवांस (जडासही) उत्पन्न करुन त्यांचे कल्याण, करणार्‍या भगवंता ! तू भूतांचा नियंता आहेस. तू भूतांमध्ये नित्य वागतोस. तथापि प्राणी तुला ओळखीत नाहीत. तथापि तू  मात्र सर्वांस मोहित झालेले पाहतोस. ॥४॥
म्हणून या लोकी स्वर्गात व पाताळांत , सारांश दाही दिशांमध्ये ज्या ज्या तुझ्या विभूति (स्वरुपे) प्रकट झाल्या आहेत, त्या विभूति व त्यांचे विशेष मला सांग. तुझ्यामुळेच त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व पुण्यतीर्थांचे माहेरघर असणारे हे जे तुझे चरणकमल त्याला मी सर्व भावांनी नमस्कार करतो. ॥५॥
श्रीकृष्णा म्हणतात, संशयांचा उच्छेद करणारे प्रश्न कोणते व ते कसे करावे, हे जाणण्यात कुशल असणार्‍या उध्दवा, कुरुक्षेत्रांत शत्रू बनलेल्या कौरवांचा विरुध्द लढू इच्छिणार्‍या अर्जुनाने हाच प्रश्न मला विचारला होता. ॥६॥
स्वजातीचा म्हणजे बंधुबांधवांचा वध करणे निंद्य आहे अधार्मिक आहे, असे अर्जुनास वाटले आणि तो युध्दापासून पराडमुख झाला . उध्दवा ! अर्जुन, त्यावेळी ‘ माझा आत्मा इतर आत्म्यास मारणारा व इतरांचे आत्मे मरणारे’ यांत मग्र झाला होता. ॥७॥
त्या प्रसंगी त्या नरश्रेष्ठाची समजूत मी अनेक युक्तिप्रयुक्तींनी घालून त्याचे अज्ञान दूर केले. युध्दाच्या अग्रभागी असे म्हणाला. ॥८॥
उध्दवा ! मी या सर्व स्थावरजंगम भूतांचा आत्मा आहे. त्यांचा उपकारक मित्र आहे, त्यांचा नियंता -स्वामी आहे. मीच सर्व प्राणिमात्र आहे. आणि त्यांच्या उत्पत्ति- स्थिती- लयांचे कारणही मीच आहे. ॥९॥
जे वेगवान्‍ आहेत, त्यांचा वेग मी आहे. कालादी सर्व सत्ताधार्‍यांचा स्वामी मीच आहे. सत्त्वादी गुणांत साम्य असणारा व गुणवंतांचा स्वाभाविक गुणही मीच आहे. ॥१०॥
या गुणवंतांमधील सुत्र (हिरण्यगर्भ प्राण) मी, महत्तत्त्वातील महान्‍ मी, सूक्ष्मातील अतिसूक्ष्म जीव मी, आणि अजिंक्य वस्तूत श्रेष्ठ मनही मीच. ॥११॥
तसेच (श्रुतीचा उत्पादक व अध्यापक जो ) हिरण्यगर्भ आहे. मंत्रांतील श्रेष्ठ ऊँ, अक्षरांतील श्रेष्ठ अक्षर अ व छंदांतील पद.. मीच आहे. ॥१२॥
सर्व देवांमधील इंद्र, अष्टवसूंमधील श्रेष्ठ जो अग्नी , बारा अदित्यांतील श्रेष्ठ विष्णू व अकरा रुद्रांमधील श्रेष्ठ शंकरही मीच. ॥१३॥
मी ब्रह्मर्षींमधील भृगू आहे, राजर्षींमधील श्रेष्ठ मनू, देवर्षिश्रेष्ठ नारद व यज्ञोपयोगी धेनुश्रेष्ठ कामधेनुही मीच आहे. ॥१४॥
सिध्दश्रेष्ठांमध्ये मी कपिल, पक्षांमध्ये गरुड, प्रजापतींमध्ये दक्ष व पितरांमध्ये अर्यमाही मीच आहे. ॥१५॥
दैत्यांमध्ये असुरपति प्रल्हाद तो मी, नक्षत्रे आणि वनस्पतींमध्ये सोम मी व यक्षराक्षसांमध्ये मी कुबेरहि. गजेंद्रश्रेष्ठ ऐरावत, जलचरांचा ईश्वर वरूण, उष्णता व प्रकाश देणार्‍या भूतांमध्ये मी श्रेष्ठ सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजाही मीच आहे. ॥१६-१७
अश्वांमध्ये उच्चै:श्रवा, धातुंमध्ये सुवर्ण, दंडधारी लोकांमध्ये मी यम, सर्पश्रेष्ठ वासुकी, नागोत्तमांमध्ये अनंत,श्वपदांमध्ये सिंह आणि आश्रमांमध्ये चौथा संन्यासाश्रम, वर्णांतील प्रथम ब्राह्मण वर्ण मीच आहे. पवित्र नद्यांत गंगा , सरोवरांमध्ये मी सागर, आयुधांमध्ये धनुष्य मी, श्रेष्ठ धनुर्धार्‍यांमध्ये मी त्रिपुरघ्न म्हणजे शंकर, वास्तव्याचे उत्तम स्थान मेरु, अत्यंत दुर्गमांमध्ये मी हिमाचल, वृक्षांमध्ये मी पिंपळ (अश्वत्थ), औषधीमध्ये यव ही सर्व माझीच रुपे आहेत. ॥१८-२१॥
त्याचप्रमाणे पुरोहितांमध्ये मी वसिष्ठ, ब्रह्मज्ञान्यांमध्ये मी बृहस्पती, सेनापतींमध्ये मी स्कंद (षडानन), नायकांमध्ये मी अज (ब्रह्मा),  यज्ञांमध्ये मी ब्रह्मयज्ञ, व्रतांमध्ये मी अहिंसा आणि वायू, अग्नी, सूर्य, जल वाणी या शुध्द करणार्‍या पदार्थांचा आत्मा जी शुध्दता, ती मीच होय. ॥२२-२३॥
अष्टांगयोगामध्ये समाधी, विजयाकांक्षीचे रहस्य जो मंत्र ( मसलत) तो, विवेक्यांच्या विवेकाचा राजा आन्वीक्षिकी नामक विवेक (आत्मनात्मविवेकविद्या) आणि अख्याति, अन्यथाख्याति इत्यादिक संशयवाद करणारांमध्ये विक्लप मीच होय.॥२४॥
स्त्रियांमध्ये मी शतरुपा (सरस्वती किंवा मनुपत्नी अथवा विद्युत्‍ ), पुरुषांमध्ये स्वायंभुव मनु, मुनींमध्ये नारायण, ब्रह्माचार्‍यांमध्ये सनत्कुमार, धर्मात मी संन्यास,  निर्भरहस्य आत्मश्रध्दा, गुह्यांमध्ये प्रियवचन व मौन, दांपत्यांमध्ये ब्रह्मा , अप्रमत्तांचा संवत्सर, ऋतूंमध्ये वसंत (मधु व माधव ही अनुक्रमे चैत्र व वैशाख या महिन्यांची नावे), मासांमध्ये मी मार्गशीर्ष आणि नक्षत्रांत अभिजित्‍ मीच आहे. ॥२५-२७॥
तसेच युगांत कृतयुग, बुध्दिवंतांत कृष्ण देव, व्यासांत व्दैपायन व्यास, कवींमध्ये सूक्ष्मबुध्दि काव्य (शुक्र) मी होय. ॥२८॥
भगवंतांत वासुदेव, भागवतांत तू (उध्दव), किंपुरुषांत हनुमान व विद्याधरांतील सुदर्शन मीच होय. ॥२९॥
त्याचप्रमाणे रत्नांत मी पद्मराग, सुंदर कोशांत मी पद्मकोश , दर्भांत मी कुश, हवींमध्ये मी गाईच तूप, व्यावहारिकांत मी लक्ष्मी, लबाडांतील मी छलग्रह (खोटया फाशांनी खेळणारा किंवा खोटा फांसा), तितिक्षूंची सहनशीलताशक्ती , सात्त्विकांचे सत्त्व, बलवंताचे ओज व सह (ओजस्‍= चढाईची शक्ति, सहस्‍ = बचावाची शक्ति), आणि सात्त्वत म्हणजे भगवद्भक्त भावगत त्यांची भक्ति व नऊ सात्त्वांचा आदि व सर्वश्रेष्ठ मीच आहे. ॥३०-३२॥
गंधर्वांमध्ये मी विश्वावसू, अप्सरामध्ये मी पूर्वचित्ति, पर्वतांचे स्थैर्य, भूमीचा गुण गंध जलांचा रस,तेजतत्त्वाचा अग्रि किंवा सूर्य, सूर्यचंद्रतारा यांची प्रभा, आकाशाचा गुण जो शब्द तो मी, ब्रह्मण्यांतील (पवित्र वस्तूंतील) मी बलि= हव्यद्रव्य अथवा दानशूरांतील शुक्रशिष्य बलि, वीरांत मी अर्जुन, भूतांची उत्पत्ति स्थिति व संहार करणारी शक्ति मी; हस्तपादादि कमेद्रियांचे गति-उक्ति - प्रभृति, ज्ञानेद्रियांचे श्रवण- दर्शनादि, इंद्रियांचें इंद्रिय (मन?) पंचमहाभूतांच्या तन्मात्रा, अहंकार, महत्‍ ( महाभूतांच्या तन्मात्रा, अहंकार व महत्‍ हे प्रकृतीचे विकार असून हे सात महाभूतांच्या ज्ञानकमेंद्रियांच्या प्रकृति होतात), विकार (५ महाभूते, ११ इंद्रिये = १६ विकार ) मी, जीव मी प्रकृति मी, सत्त्वादी गुण मी, व परब्रह्म मी होय. ॥३३-३७॥
या गुणांचे परिगणन, ज्ञान आणि तत्त्वनिश्चय मी आहे. मी जो सर्वात्मा तद्‍व्यतिरिक्त जीव -शिव , गुण- गुणी वगैरे काही नसते. मी आहे म्हणून सर्व आहे. ॥३८॥
त्याचप्रमाणे परमाणूंची मला मोजदाद केव्हातरी करिता येईल. परंतु कोटयावधी जीव निर्माण करणार्‍या माझ्या विभूतींची संख्या मलाही करता येणार नाही. ॥३९॥
तथापि तेज, शोभा, कीर्ति, ऐश्वर्य ही ( मर्यादा प्रकट करणारा गुण) सौंदर्य, भाग्य, वीर्य, विज्ञान, तितिक्षा, हे धर्म जेथे जेथे दिसतात, ते ते माझेच अंश आहेत असे समज. ॥४०॥
उध्दवा, याप्रमाणे संक्षेपत: सर्व विभूती तुला सांगितल्या. ह्या विभूती म्हणजे मनाचे अथवा मनाने उत्पन्न केलेले विकार आहेत. कारण,  वाणी मात्र ह्या विकारांस प्रकट करु शकते. ॥४१॥
म्हणून वाणी , मन , प्राण, इंद्रिये, बुध्दि, अहंकार या सर्वावर ताबा ठेव म्हणजे तुझे जन्ममरण संपेल. ॥४२॥
जो यति सद्‍बुध्दिपूर्वक,  वाणी व मन यांचा संयमरुप त्याग करीत नाही, त्याचे व्रत (दीक्षा), त्याची तपश्चर्या, त्याचे ज्ञान, ही सर्व पाणी पाझरणार्‍य माठातील पाण्याप्रमाणे नाहीशी होतात. ॥४३॥
म्हणून माझा जो अनन्य भक्त आहे, त्याने भद्भक्तीने प्रेरिलेली जी बुध्दी, तिच्या साह्याने अर्थात्‍ बुध्दिपूर्वक मनाचा, वाणीचा व प्राणांचा संयम करावा. हा सिध्द होऊन ब्रह्मात्मैक्य झाले की तो मद्भक्त कृतकृत्य होतो. ॥४४॥
अध्याय दहावा समाप्त.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-03-14T19:46:23.6630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

without being informed

 • माहितीसूचना न देता 
RANDOM WORD

Did you know?

वैराग्यबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.